झाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे.
लक्ष्मण खोब्रागडे
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
“मजा बाप खराखुरा
महात्मा फुलेंचा ताईत होता!
पंचसिलाचा पाईक होता
राष्ट्रसंताचा माईक होता !!”
‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ।’ माती शुद्ध असल्यावर येणारे पीक अस्सल असणारच. कथनी नव्हे तर करणीतून ग्रामविकासाचा रथ ढकलण्याचा प्रण हाती घेतलेले गडचिरोली येथील ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर. जिथे कोणालाही खंजिरीच्या चामड्यात उठणाऱ्या आवाजाच्या वेदना उलगडता आल्या नाही , तिथे कवी म्हणून नितळ पावन मनाने लोकजागृतीचा विद्रोहनाद आसमंती गुंजवला. त्यासाठी सत्याचा ठाव घेणारा छत्तीस गुणांच्या मधुर मिलनाचा काव्यसंग्रह जन्मास घातला.
प्रस्थापितांच्या बुद्धिभेदात न्यूनगंडाची जळमटे पसरत गेली तरी स्वयंप्रकाशित सूर्याची किरणे अडविण्याची ताकत त्यात नसते . कुजक्या प्रवृत्तीच्या कोळ्याने विणलेले जाळे भेदून सुर्यतेज प्रकाशाची महान परंपरा अजरामर करीत असते . या इतिहासाला उजागर करण्यासाठी झाडीपट्टीचा चमकता तारा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी लिहिलेल्या “खंजरी” काव्यसंग्रहाला झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या प्रस्तावनेतून उत्तम मोजमाप केले आहे .
बोलीचा बंदारा । आमी बांदलुन ।
पूजा घातलून । झाडीबोली ।।
नसे कोना चिंता । अस्या जिंदगीचा ।
सप्पे धुंदाडाचा । मांग लाग ।।
झाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे.
संभाषण रुपात अभिव्यक्त होताना काव्यसंग्रहात प्रत्येक शब्दागणिक विद्रोहाचा सकारात्मक वारा वाहताना दिसतो . आजवरी सुधारणेच्या नावाखाली केलेली आदळआपट पाहता कवीने मांडलेला रचनात्मक आविष्कार संथ वाहणाऱ्या नदीत पापक्षालनासाठी डोहात डुबकी मारणाऱ्याला अलगद धारेवर पोहायला शिकवत असल्याचा भास उत्पन्न करीत जाते .
“गाईढोराइच्या मांग मांग रावून
जो सब्द न सब्द लिवतो !
भाराटीच्या काट्याइत
तपन-तूपन आंगावर झेलते
तोच खरा साईत्तिक !!
ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी कविता लिहिणे म्हणजे लोकांना जादू घडले असे वाटते. पण कवी हा स्वयंप्रकाशित प्रतिभेचा लकलकता अंगार आहे, हे कबूल करावेच लागेल.
राष्ट्रसंताचा विचार घराघरात पोहचवताना पावलागणिक आलेले अनुभव कवीने जेवढ्या ताकतीने शब्दबद्ध केले , तेवढ्या ताकतीच्या कविता दुर्लभ.
या देसात कसाईल काइ कमी नाइ
ते गाईल करतील बकरी अना
बहिणीला मनतील काइबाई !
येती सर्वच चालते उलटा-पुलटा
पतीव्रतेच्या गऱ्यात धोंडा
न पेढे खाइ कुलटा !!
कवी वाऱ्यावर काठ्या मारत नाही. त्यांनी प्रत्यक्ष थोर कर्मयोगी गीताचार्य तुकारामदादा यांच्याबरोबर काम केल्याने सात्विकतेची झोळीच आपल्या काव्यातून मोकळी केली आहे. राष्ट्रनिर्माणाची धुरा गावखेड्याशी जोडणारे कवी गावातील लोकांचा मोठेपणा अलगद उलगडताना दिसतात.
“त्याइन भलाइ नसतील केल्या
लडाया ना फडाया !
पर मारल्याइ नाइ
खोट्या लोकाइच्यावानी बडाया !!
शेताचे धुरे फोडण्याची झेप भारत पाकिस्तान सीमेवर नेण्याची कल्पकता कवीचा प्रगल्भ चिंतन किती मोठा असेल याची प्रचिती देते. व्यसनात बुडालेला समाज कवीला मरणप्राय यातना देऊन जातात, असे तादात्म्य थोडकेच पावतात.
” दुनिया झाली नकटी
घरोघरी वाढल्या बहु कटकटी !
सायकलच्या जागी आल्या फटफटी
अना दुनिया झाली चटपटी !!”
बदलत्या दुनियेच्या प्रवाहात माणुसकी हरवत चालली. देश नोटांसारखा फाटला. साहेबी पोशाखात टेस मिरवणारे जन्मदात्याची विटंबना करायला लाजत नाहीत. स्वर्ग असो की नरक या धरणीवर सर्वांच्या बुडाखाली अंधार असून जो तो स्वार्थात बुडालेला आहे. याचे शल्य कवीच्या कोमल अंतरंगातील निष्पाप भाव दर्शवतात.
“असा कसा रे पोरफेसर तू भुललास माजी वरक
माय आहे घरी मी आलू आशा धरत !
लायन्याचा मोटा केला मुखी भरवलु दाना
सायब बनवलु तुल इकलु दारचा सोना-नाना!!
कवी हातचे काही लावत नाही . ग्रामगीतेची शिकवण असल्याने खरेपणाची अनुभूती काव्यागणिक प्रसवत गेली आहे. विहिरीत नसले तरी बादलीला साजशृंगाराने नटवून तोरा मिरवणारी लबाड टोळी वेगळी आणि खऱ्याच्या कसोटीवर चटक्यात भाजूनही अस्तित्वाच्या शिखरावर शोभेल असे बावनकशी हिरे विरळेच.
“पुन्या मुंबईच्या नट्या आल्या
भाषना नोहता पाट
झाडीतले कलावंत आहेतच खरे
त्याइचाच दिसे चांगला थाट !!”
आजवरी झाडीबोलीत अभिव्यक्त होणारे वाचले . पण आशयाचा मजबूत गाभा पकडून नव्या धाटणीतील सर्जनशील काव्यात्मकता या काव्यसंग्रहातून पाहायला मिळाली. बंडोपंत बोढेकर यांच्या खंजिरी पासून प्रेरणा घेत इतर झाडीच्या नवसाहित्यिकांची लेखन प्रवासाची गाडी सुसाट पळेल , हे त्रिवार सत्य .
काव्यसंग्रह : खंजरी
कवी : बंडोपंत बोढेकर
पुस्तकासाठी मोबाईल – 9975321682
प्रकाशक : झाडीबोली साहित्य मंडळ , चंद्रपूर
किमंत : ७० रुपये