April 5, 2025
Freedom of working women
Home » नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य…
विशेष संपादकीय

नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य…

नोकरी करणाऱ्या महिलांचे स्वातंत्र्य

नोकरी करणारी स्त्री ही दोन वेळा कामावर जात असते. एकदा सकाळी नोकरीवर आणि सायंकाळी नोकरीवरून सुटल्यावर; पुन्हा घरच्या कामासाठी घरात हजर असते ! स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी तिच्या भोवतालचे हे चक्र काही सुटत नाही. आयुष्यभर तिच्या डोक्यावरून नवरा नावाचं भूतही उतरलं जात नाही.

पुरुषसत्ताक समाजात स्त्री कितीही कर्तबगार असली, तरी इथल्या सनातनी परंपरेतून तिला पुरुषासमोर दुय्यम स्थान देण्यात आले. ही खरंतर स्त्रीला आधी माणूस म्हणून समजून घेणाऱ्या समूहाच्या मनात चीड आणणारी गोष्ट आहे. मात्र असे असले तरी नोकरी करणारी, अपार कष्टाने कमवती बाई तिच्या नवऱ्याच्या दृष्टीने एक बाईचं (अपवाद वगळता) असते. म्हणूनच नोकरी करणारी स्त्री ही दिवसाच्या २४ तासात दोन वेळा कामावर जात असते. एकदा सकाळी नोकरीवर आणि सायंकाळी नोकरीवरून सुटल्यावर; पुन्हा घरच्या कामासाठी घरात हजर असते ! आपण स्त्री मुक्तीच्या, तिच्या स्वातंत्र्याच्या गप्पा कितीही मारल्या तरी तिच्या भोवतालचे हे चक्र तिच्या नोकरीच्या निवृत्तीनंतरही बदलत नाही. कारण निवृत्तीनंतर ती पुन्हा घरातच दोन प्रकारच्या कामाला जुंपली जाते. एक घरच्या आणि दुसऱ्या बाजूला उतरत्या वयाला लागलेल्या नवऱ्याच्या सेवेच्या, म्हणजे आयुष्यभर तिच्या डोक्यावरून नवरा नावाचं भूत उतरलं जात नाही.

आयुष्यभर नोकरी करणाऱ्या आणि पुन्हा नोकरीवरून घरी आल्यावर घरात कुटुंबासाठी एकटीने काम करणाऱ्या स्त्रीची मानसिकता काय प्रकारची बनली असेल ? याची नेमकी कल्पनाही आपण करू शकत नाही. पुरुषाने नोकरी करायची; पण संसारात स्त्रीला कोणतीच मदत करायची नाही. उलट तिने नोकरी करून कमावलेल्या पैशावर स्वतःचा हक्क सांगायचा, तिने कमावलेले पैसे एकदा तिच्या अकाउंटला जमा झाले, की ते आपल्या अकाउंटला जमा करून घ्यायचे किंवा तिने ते खर्च केले असतील तर त्या पैशाचा हिशोब तिच्याकडून घ्यायचा. एवढंच काय, तर तिचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित न ठेवता तिला स्वतःला जगण्यासाठी हवे असणाऱ्या वस्तूही आपल्यालाच विचारून तिने घ्यायला पाहिजे असाही नियम तिला घालून द्यायचा. काही अपवाद सोडता नोकरी करणाऱ्या बहुसंख्य महिलांना याच कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी नोकरी करणाऱ्या महिलांच्या स्वातंत्र्यासंदर्भात एक सर्व्हे प्रसिद्ध झाला. त्यात नोकरी करूनही लाखो रुपये महिनाकाठी कमावणाऱ्या महिला स्वतंत्र नाहीत, त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या जोडीदाराचीच परवानगी घ्यावी लागते.असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं.

यातून ती स्वत:च्या आवडीनिवडी विसरते. हळूहळू आपल्या नवऱ्याची आपल्याबद्दल जी आवड असेल तीच तिचीही आवड बनून जाते.मग नवऱ्याला वाटते, की आपल्या पत्नीचा आपल्यावर किती विश्वास आहे, ती आपल्याला विचारल्याशिवाय स्वतः साठी काहीच करत नाही, आपली आवड तीच तिचीही आवड. यातून नवऱ्यामध्ये एवढा अहंगंड निर्माण होतो, की तो मग चारचौघात सांगत राहतो,” माझी पत्नी मला विचारल्याशिवाय काहीच घेणार नाही. साधे कपडे तिला स्वतःला खरेदी करायचे असतील तर ती माझ्याशिवाय कापड दुकानात जाणार नाही आणि मग ती कमावती असणारी पत्नी नवऱ्याच्या इज्जतीखातर नवऱ्याच्या या सांगण्यावर होकारार्थी मान डोलवत राहते. अशा बहुसंख्य स्त्रियांची स्थिती मालकाच्या मागून चालत जाणाऱ्या नंदीबैलासारखी झालेली असते. मात्र हे सगळं झुगारून सगळ्या प्रकारची चौकट मोडून नोकरी करणारी स्त्री स्वतंत्र जगू पाहते, जगत असते तेव्हा अशा स्त्रीचं कौतुक करावं तेवढं थोडंच;पण असं कौतुक अशा स्वतंत्र बाण्याच्या स्त्रीच्या वाट्याला पुरुष वर्गाकडून तर कमीच येतं आणि पुरुष वर्गाच्या वर्चस्वाखाली दबला गेलेला स्त्री वर्गही मग स्वतंत्र विचार आणि स्वातंत्र्य घेऊन जगणाऱ्या स्त्रियांची चेष्टा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत, किंबहुना ती करतातच. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही, की ज्या स्वातंत्र्यासाठी आपण आयुष्यभर मनातल्या मनात कुढत राहिलो तेच स्वातंत्र्य आपली एखादी भगिनी घेऊन जगते आहे, तिचं आपण कौतुक करायला पाहिजे, तिचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवायला पाहिजे. हे विसरूच त्या गेलेल्या असतात.

पती-पत्नीची जोडी ही वरून म्हणजे देवाकडून ठरवून आलेली असते. असा सांगणारा एक वर्ग समाजात मोठा आहे. अशा वर्गाच्या मानसिकतेचा नवरा जर मिळाला तर तो पत्नीने नवरा सांगेल त्याप्रमाणे नाकासमोर चालावं अशी अपेक्षा बाळगतो. मग ती पत्नी नोकरी करणारी असो किंवा गृहिणीही. गृहिणी आणि नोकरी करणारी पत्नी यात खरंतर फरकच करू नये. गृहिणी म्हणून काम करणारी पत्नी हीसुद्धा घरची प्रमुख जबाबदारी उचलत असते. त्यामुळे तिचा नोकरी करणाऱ्या पत्नीएवढाच सन्मान व्हायला हवा;पण समाजात या प्रतिष्ठेने गृहिणीकडे बघितलं जात नाही आणि त्यातही गृहिणी असो किंवा नोकरी करणारी पत्नी असो, ती जर कलासक्त असेल आणि ती आपल्यातील कलेचा विकास करत असेल तर तिला घरातून प्रोत्साहन द्यायचं सोडूनच द्या; पण त्या कलेबद्दल तिचा नवराही तिला प्रेरणा देत नाही. तिने कुठे थोडंफार यश मिळवलं तर त्याबाबत तिचं कौतुकही केलं जात नाही. उलट ज्या दिवशी यश मिळाल्याचे वृत्त येईल त्याच दिवशी घरात तिची मानसिक कोंडी कशी होईल याचाही प्रयत्न कुटुंबातून केला जातो.

मध्यंतरी मराठीतील एका लेखिकेच्या पुस्तक प्रकाशन समारंभात तिला आपल्या आई-वडिलांचा सत्कार करायचा होता. मात्र ते करण्यासाठी तिचं मन धजावत नव्हतं. याचे स्पष्टीकरण देताना ती म्हणाली होती,” माझ्या पहिल्या पुस्तक समारंभातही मला माझ्या आई-वडिलांचा सत्कार करायचा होता. कारण मी जी आज कलेच्या क्षेत्रात पुढे जात आहे त्या सगळ्या मागे माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेले कलेचे संस्कार आणि दिलेली प्रेरणा महत्त्वाची आहे; पण मी आई-वडिलांचा सत्कार केला तर माझ्या सासरच्या लोकांना… काय वाटेल ? हाच विचार पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येतो आणि मला निर्णय घेता येत नाही. लेखिका म्हणून स्वतंत्र विचार करणाऱ्या आणि समाजात प्रतिष्ठेने जगणाऱ्या व महिन्याला चांगला लाखभर रुपये पगार घेणाऱ्या या स्त्रीची ही अवस्था असेल तर सामान्य स्तरावर नोकरी करणाऱ्या स्त्रीची तिच्या घरात तिच्या स्वातंत्र्याबाबत काय अवस्था असेल एवढा विचार केला तरी बस आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading