December 14, 2024
A collection of poetry preserving geographical diversity
Home » भौगोलिक विविधता जपणारा काव्यसंग्रह !
मुक्त संवाद

भौगोलिक विविधता जपणारा काव्यसंग्रह !

प्रस्तुत काव्यसंग्रहातील प्रथम कवी आहेत ते रोह्याचे. रायगड जिल्ह्यातील कोकणचे. अजित अनंत पाशीलकर असं त्यांचं नाव आहे. ते कोकणातील असल्यामुळे त्यांना तिथल्या रम्य व हिरव्यागार निसर्गाची भुरळ पडली नाही तरच नवल. गावाचा सार्थ अभिमान बाळगणारे कवी अजित अनंत पाशीलकर हे भविष्यात खूप चांगले निसर्ग कवी म्हणून समोर येतील असं मला वाटतं. त्यांची शब्द शैली साधी सरळ व सोपी आहे. अगदी साधे शब्द घेऊन ते आपली कविता आकारास आणतात. त्यांच्या कवितेत कुठलीच क्लिष्टता दिसत नाही. एक चांगला प्रतिभावान कवी त्याच्यात दडलेला आहे असं यानिमित्ताने म्हणावसं वाटतं.

या संग्रहातील दुसऱ्या कवयित्री आहेत कु मनिषा चिद्दरवार. लेखनीचं बळ सांगणाऱ्या ह्या कवयित्री थेट विदर्भातल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या त्या रहिवासी असून, विदर्भातील माणसाचा रोखठोक स्वभाव तथा थेट लेखनाचा प्रभाव त्यांच्या काव्यात दिसून येतो. कु मनिषा यांची कविता गेय आहे. नेटकी आहे तसेच त्यांच्या कवितेत शब्दांची निवड खूप चपखलपणे केलेली दिसून येते. एक आशयघन कवयित्री म्हणून त्यांचा इथं मला उल्लेख करावासा वाटतो.

तिसरे कवी आहेत रविंद्र सोनावले. हे मुंबईचे कवी आहेत. एक अष्टपैलू कवी म्हणून त्यांचा इथं मी उल्लेख करील. खूप सारी काव्य संपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. काव्याचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. ओवी, अभंग ते चारोळीपर्यंत सर्व प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहात त्यांनी अष्टाक्षरी मध्ये कविता सादर केल्या आहेत. त्यांच्या चौफेर प्रवास करणाऱ्या लेखनीला माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

चौथ्या कवयित्री आहेत आशा सुधिर साठे. आशाताई कवयित्री सोबतच उत्कृष्ट अभिनेत्री सुध्दा आहेत. त्यांनी बऱ्याच लघुपट व बोलपटात काम केलं आहे. त्या एक सैनिक पत्नी असून नगरच्या रहिवासी आहेत. आईचं हृदय मुलासाठी किती व्याकुळ असते हे त्यांनी आपल्या कवितेतून खूप समर्थ पणे मांडले आहे. स्त्री मनाचा प्रेमळ व हळवा संवेदनशील प्रवाह त्यांच्या कवितेत आढळून येतो.

यानंतरचे पाचवे कवी आहेत मुरलीधर रणखांब. ते खूप चांगले कथाकार आहेत. सोबतच नाटककार सुध्दा आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात त्यांचं बामणी हे गाव आहे. कविवर्य मुरलीधर रणखांब यांची कविता अगदी सहजपणे समोर येते. ती समजायला सुलभ आहे. प्रबोधनात्मक बाज असलेली त्यांची कविता खूप काही सांगून जाते, शिकवून जाते. सामाजिक भान व जाण असलेल्या हे कवी आहेत.

यानंतरचे कवी आहेत रत्नाकर अनंत सोहनी. मालवणी बोली भाषेत कविता करणारे सोहनी सर नौसेना अधिकारी होते. आता ते निवृत्त झाले आहेत. त्यांना आपल्या मालवणी भाषेत काव्य रचना करायला आवडते. बोली भाषेत रचलेलं काव्य खूप सकस व अस्सल असतं. त्याची खोली खूप विलक्षण असते. कवी रत्नाकर सोहनी यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यात मालवणी मायबोली आणखी बहरो.

यानंतरचे कवी हे डॉक्टर आहेत. ते रोग्यांना बरं करतात. त्यांचा चांगला इलाज करतात. मग त्याला बरं वाटलं की नंतर त्याला आपली कविता ऐकवतात ! डॉ चंद्रशेखर मुळे हे त्यांचं नाव. डॉ. मुळे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ कार्यरत होते. त्यांना कविता करण्याचा छंद बालपणीच जडला. म्हणजे ते स्वतःच काव्य रोगाने पछाडले आहेत. हा संसर्ग ते वेगाने सर्व लोकांत पसरवून काव्या प्रति आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे ते आंबेडकरी विचारांची कविता रचतात हे खूप खास आहे.

त्यानंतर ऋचा हनुमंत महाबळ या प्रतिभावंत कवयित्रीचा आविष्कार होतो. सौ ऋचा यांनी आजवर खूप दर्जेदार वृत्तपत्रातून लेखन केले आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या अलवार कविता सादर करतात. भावनिक कोमलता जपतात. भावा विषयीचा जिव्हाळा म्हणूनच त्यांच्या भाऊबीज या कवितेत अगदी सहजपणे अवतरीत होतो.

गीता अनिल शेलार ह्या सेवा निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्या दिव्यागांची सेवा करतात. कर्णबधीर मुला मुलींना शिक्षण देतात. कोरोना योध्दा म्हणून त्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या आहेत. कविता करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. एवढ्या मोठ्या सेवा कार्यातून त्या वेळ काढून आपला छंद जोपासतात ही मोठी बाब आहे. गीताताईंना दिव्यांग सेवा कार्यासाठी बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आणि या संग्रहातील शेवटच्या कवयित्री आहेत डॉ वर्षा आनंद हत्ते. त्याही रोगी व रोग बरा करणाऱ्या डॉक्टर आहेत. कविता करायला त्यांना खूप आवडते. त्यांची कविता खूप अभ्यासपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहेत.
अवसेच्या रात्री ही
पुनवेचा वास होता !
हातात बळ नसले तरी
ध्येयाचा भास होता !
अशी ओघवती शैली व आशय घेऊन त्यांची कविता जन्माला येते.

या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवी, कवयित्रींचा समावेश आहे. एक प्रकारे भौगोलिक व भाषिक विविधता जपणारा हा काव्यसंग्रह सर्वांनी जतन करून ठेवावा असा अनोखा झाला आहे.

पुष्पराज गावंडे

पुस्तकाचे नाव – संयुक्त कवितासंग्रह पंचतारका
संपादक – रोहिणी पराडकर
प्रकाशक – रोहिणी पब्लिकेशन्स
किंमत – २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 97677 25552


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading