कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक तथा रसायन शास्त्रज्ञ डॉ. सागर डेळेकर यांच्यासह डॉ. क्रांतिवीर मोरे, डॉ. तुकाराम डोंगळे, भारती विद्यापीठाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल कदम, डॉ. प्रमोद कोयले, डॉ. अनंत दोडामणी (एस.जी.एम. कॉलेज, कराड), डॉ. दीपक कुंभार (ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी) यांनी या संशोधन प्रक्रियेत सहभाग घेतला.
हे संशोधन सौरऊर्जा निर्मिती क्षेत्राला गती देणारे ठरेल, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला. तयार केलेली वेगवेगळी नॅनोसंमिश्रे आणि त्यापासून तयार करावयाचे उपकरण कमीत कमी तापमानात आणि अत्यल्प वेळेमध्ये बनवता येते, तसेच ते सुलभतेने हाताळता येते. हे उपकरण तसेच ते तयार करण्याची पद्धत सौरऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
सौरऊर्जेचे उत्पादन त्या उपकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक घटकांवर अवलंबून असते. तसेच ते उपकरण बनवण्यासाठी वापरली जाणारी पद्धतही महत्त्वाची ठरते. विद्यापीठातील संशोधकांनी वेगवेगळ्या नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी पद्धत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार केली आहे. यामध्ये कॅडमियम सल्फाइड क्वांटम डॉट, नैसर्गिक रंग, टायटॅनियम डायऑक्साईडच्या नॅनोमूलद्रव्यांचा वापर केला आहे. या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे सौर ऊर्जा क्षेत्राला नवीन चालना मिळेल.
या संशोधनाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे सर यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.