September 16, 2024
All India Institute of Ayurveda soon on the lines of AIIMS PM Comment
Home » एम्सच्या धर्तीवर लवकरच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – पंतप्रधान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एम्सच्या धर्तीवर लवकरच अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – पंतप्रधान

नवव्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र स्थापन केले आहे.  सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे आयुर्वेदाबद्दल उत्सुकता, उत्साह आणि विश्वास वाढला आहे.  एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या धर्तीवर अखिल भारतीय आयुर्वेद संस्था देखील स्थापन केली जात आहे.  पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात भारताच्या प्रयत्नांची, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा प्रशंसा केली आहे .

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवव्या जागतिक आयुर्वेद संमेलनाच्या समारोप समारंभात मार्गदर्शन केले. तसेच, तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे त्यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. या तीन संस्था म्हणजे- अखिल भारतीय आयुर्वेद (AIIA),गोवा, राष्ट्रीय युनानी औषधशास्त्र संस्था (NIUM), गाजियाबाद, आणि राष्ट्रीय होमियोपॅथी संस्था (NIH), दिल्ली अशा असून या संस्थामुळे, या वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट होण्यास मदत होईल.तसेच, यामुळे परवडणाऱ्या दरांमधे आयुष सेवा लोकांसाठी उपलब्ध होतील. 970 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या तिन्ही संस्थांमध्ये, 400 विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मिळू शकेल, तसेच 500 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवव्या जागतिक आयुर्वेद संमेलनासाठी जगभरातून निसर्गसंपन्न गोव्यात आलेल्या सर्व  प्रतिनिधींचे स्वागत केले. तसेच, हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. भारताचा स्वातंत्र्यासाठीचा अमृतकाळ सुरु असतांना, ही जागतिक परिषद भरवली जात असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. अमृतकाळाचा एक महत्वाचा संकल्प, भारताचे विज्ञान, ज्ञान आणि सांस्कृतिक अनुभव  तसेच आयुर्वेद या बळावर, जागतिक कल्याण सुनिश्चित करणे हा आहे. जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी  या परिषदेची संकल्पना- “ एक देश, एक कुटुंब, एक भविष्य.”असल्याचे सांगितले.

जगातील 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदाला पारंपरिक औषध पद्धती म्हणून मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आयुर्वेदाची ओळख आणखी  व्यापक  करण्यासाठी  अधिक जोमाने निरंतर कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.  ते म्हणाले की, आज उद्घाटन झालेल्या तीन राष्ट्रीय संस्था, आयुष आरोग्य सेवा प्रणालीला नवी गती देतील.

आयुर्वेदाच्या तात्विक पायावर जोर देत पंतप्रधान म्हणाले, “आयुर्वेद ही पद्धत उपचारांच्याही पलीकडे जात निरोगी आरोग्याला पूरक ठरते”. आपल्या या मताच्या पुष्ट्यर्थ  त्यांनी याकडे लक्ष वेधले की विविध उपचारपद्धतींमधले बदल आजमावत, जग आज या प्राचीन जीवनशैलीकडे वळत आहे.  भारतात आयुर्वेदाच्या संदर्भात बरच काम याआधीच सुरू आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकीर्दीचे स्मरण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित संस्थांना प्रोत्साहन दिले आणि गुजरात आयुर्वेदिक विद्यापीठाच्या वृद्धीसाठी काम केले.

पंतप्रधान म्हणाले, “ याचा परिणाम म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र स्थापन केले”.  सध्याच्या सरकारचा संदर्भ देत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की या सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे आयुर्वेदाबद्दल उत्सुकता, उत्साह आणि विश्वास वाढला आहे.  ते पुढे म्हणाले की एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या धर्तीवर अखिल भारतीय आयुर्वेद संस्था देखील स्थापन केली जात आहे.  या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ग्लोबल आयुष इनोव्हेशन अँड इन्व्हेस्टमेंट समिट या जागतिक आयुष नवोन्मेष आणि गुंतवणूक परिषदेचे स्मरण करून देत, पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात भारताच्या प्रयत्नांची, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा प्रशंसा केली आहे ही बाब पंतप्रधानांनी  अधोरेखित केली.   आरोग्य आणि निरोगीपणाचा जागतिक महोत्सव म्हणून, जग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.  “एक काळ असा होता जेव्हा योग तुच्छ मानला जात असे, मात्र आज तो संपूर्ण मानवजातीसाठी आशा आणि अपेक्षांचा स्रोत बनला आहे”, अशी टिप्पणी मोदी यांनी केली.

आज जगात आयुर्वेदाबाबत  जागतिक सहमती ,सहज स्वीकृतीला झालेल्या विलंबाबाबत खेद  व्यक्त करत पंतप्रधानांनी प्रगत विज्ञान केवळ पुरावा हे प्रमाण मानते  याकडे लक्ष वेधले. ‘डेटा आधारित पुराव्याच्या ‘ दस्तऐवजीकरणासाठी सातत्याने काम करण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की, आयुर्वेदाचे निष्कर्ष आणि  परिणाम आपल्या  बाजूने आहेत, मात्र पुराव्याच्या बाबतीत आपण  मागे आहोत. आधुनिक वैज्ञानिक मापदंडाच्या प्रत्येक  दाव्याची पडताळणी करण्यासाठी आपला  वैद्यकीय डेटा, संशोधन आणि जर्नल्स एकत्र आणायला हवेत यावर त्यांनी भर दिला. या संदर्भात केलेल्या कामाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी पुरावा  आधारित संशोधन डेटासाठी आयुष संशोधन पोर्टल निर्मितीचा  उल्लेख केला. आतापर्यंत सुमारे 40 हजार संशोधनपर अभ्यासांचा डेटा उपलब्ध आहे आणि कोरोना काळात आपल्याकडे आयुषशी संबंधित सुमारे 150 विशिष्ट संशोधन अभ्यास होते अशी माहिती पंतप्रधानांनी  दिली . “आता आपण ‘राष्ट्रीय आयुष संशोधन व्यवस्था ‘ स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असे ते पुढे म्हणाले.

आयुर्वेद ही एक जीवन पद्धती देखील आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.  वापरकर्त्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे  बिघडलेले यंत्र  किंवा संगणकाशी साधर्म्य नमूद करत पंतप्रधान म्हणाले की आपले शरीर आणि मन सुदृढ आणि एकमेकांशी सुसंगत असायला हवे असे आयुर्वेद आपल्याला शिकवते.  आयुर्वेदाची  वैशिष्ट्ये अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, ‘योग्य झोप’ हा आज वैद्यकीय शास्त्रासाठी  चर्चेचा मोठा विषय आहे, मात्र भारतातील आयुर्वेद तज्ञांनी अनेक शतकांपूर्वी यावर विस्तृत  लिहिले होते. अर्थव्यवस्थेतील आयुर्वेदाचे महत्व विशद करताना पंतप्रधानांनी  वनौषधींची शेती, आयुष औषधांची निर्मिती आणि पुरवठा तसेच डिजिटल सेवा यांसारख्या आयुर्वेदाच्या क्षेत्रातील नवीन संधींचा उल्लेख केला. या क्षेत्रांमध्ये  आयुष स्टार्टअपना मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या क्षेत्रात सर्वांसाठी  संधी आहेत . आयुष क्षेत्रात सुमारे 40,000 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत  आहेत. 8 वर्षांपूर्वी आयुष उद्योग सुमारे 20 हजार कोटी रुपये होता , तो आज सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे असे पंतप्रधान म्हणाले. .

याचा अर्थ  गेल्या 7-8 वर्षात 7 पटीने वाढ झाली आहे,” असे ते म्हणाले.  या क्षेत्राच्या जागतिक वाढीबद्दलही  वितृतपणे सांगताना ते म्हणाले की,  हर्बल औषधी आणि मसाल्यांची सध्याची जागतिक बाजारपेठ सुमारे 120 अब्ज डॉलर्स किंवा 10 लाख कोटी रुपये आहे. “पारंपारिक औषधाचे हे क्षेत्र सतत विस्तारत आहे आणि आपल्याला त्याच्या प्रत्येक शक्यतेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी शेतीचे एक संपूर्ण नवीन क्षेत्र खुले होत आहे, ज्यामध्ये त्यांना खूप चांगला भावही मिळेल. यामध्ये तरुणांसाठी हजारो आणि लाखो नवीन रोजगार निर्माण होतील,”असे त्यांनी सांगितले.

विशेषत: गोव्यासारख्या राज्यासाठी आयुर्वेद आणि योग पर्यटनातील संधींचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, गोव्यातले हे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए)  त्या दिशेने एक महत्त्वाची सुरुवात ठरू शकते.

भारताने जगासमोर ठेवलेली “वन अर्थ वन हेल्थची” भविष्यकालीन संकल्पना पंतप्रधानांनी स्पष्ट केली. “’एक पृथ्वी, एक आरोग्य’ म्हणजे आरोग्याची सार्वत्रिक दृष्टी. सागरी प्राणी असोत, वन्य प्राणी असोत, मानव असोत की वनस्पती, त्यांचे आरोग्य एकमेकांशी निगडीत असते. त्यांना अलिप्तपणे पाहण्याऐवजी आपण त्यांना एकत्रितपणे पहावे. आयुर्वेदाची ही सर्वसमावेशक दृष्टी भारताच्या परंपरा आणि जीवनशैलीचा एक भाग आहे,” असे ते म्हणाले. आयुष आणि आयुर्वेदाला संपूर्णपणे पुढे नेण्याचा आराखडा कसा तयार करता येईल यावर चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी आयुर्वेद काँग्रेसला केले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो. नाईक व विज्ञान भारतचे अध्यक्ष डॉ.शेखर मांडे यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

जागतिक आयुर्वेद काँग्रेस (WAC) आणि आरोग्य एक्स्पोच्या 9 व्या आवृत्तीत 50 हून अधिक देशांचे प्रतिनिधीत्व करणारे 400 हून अधिक विदेशी प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि आयुर्वेदातील इतर विविध भागधारकांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. WAC च्या 9व्या आवृत्तीची संकल्पना “एका आरोग्यासाठी आयुर्वेद” आहे.

आज उद्घाटन झालेल्या तीन संस्था – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), गोवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन (NIUM), गाझियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी (NIH), दिल्ली – संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांना अधिक बळकट देतील आणि जनतेला परवडणाऱ्या आयुषच्या सेवा सुविधा प्रदान करेल.  सुमारे 970 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या, या संस्था सुमारे 500 रूग्णालयीन खाटांच्या वाढीसह सुमारे 400 विद्यार्थ्यांची  प्रवेश संख्या वाढवतील.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह

गरबा नव्हे, गर्भ दीप आणि गंमतीदार दांडिया !

राजर्षी शाहू अभ्यासकांसाठी अमुल्य असा ठेवा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading