September 16, 2024
Growth Harmons to promote production
Home » संप्रेरकांच्या मदतीने उत्तम वाढ, भरघोस उत्पादन
विश्वाचे आर्त

संप्रेरकांच्या मदतीने उत्तम वाढ, भरघोस उत्पादन

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्नवाढीस यामुळे मदत होते. घरच्या घरी तयार करणाऱ्या या पद्धतींचा विचार व वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्तम वाढ होईल तेव्हाच उत्तम रस पिकात भरेल. साहजिकच भरघोस उत्पन्न मिळेल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसां ।
देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ।। 279 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ – त्यावेळी ज्याप्रमाणे, उसाची जी वाढ असते, तीच आतल्या रसाची वाढ असते. त्याप्रमाणे हिने आश्रय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल, तशीच ही आंत वाढत असते.

उसाची वाढ जोमदार झाली तर त्यातील रसात वाढ होईल. साहजिकच साखरेचे प्रमाण वाढेल. उसाचे वजनही वाढेल. उत्पन्नही वाढेल. जोमदार वाढीसाठी आता संप्रेरकांचा वापर केला जात आहे. पण ही संप्रेरके बऱ्याचदा आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. यासाठी सेंद्रिय संप्रेरकांचा वापर आवश्यक आहे. आरोग्यास अपाय करणाऱ्या उत्पादनांचा वापर हा शेतकऱ्यांनीच टाळायला हवा.

सेंद्रिय पद्धतीने संप्रेरके तयार करण्याच्या पद्धती या सोप्या व कमी खर्चाच्या आहेत. सहज घरी करता येण्यासारखी ही पद्धत सोडून महागडी संप्रेरके खरेदी करण्यामागे शेतकरी धावत आहे. यात उत्पादन खर्चात वाढ होते हे त्याच्या लक्षात येत नाही. यासाठीच शेतीचा खर्च मांडण्याची सवय शेतकऱ्यांनी लावून घ्यायला हवी. खर्च किती झाला हे लक्षात आल्यानंतर आपोआपच यावर आळा बसेल. नफा-तोट्याचा विचार करायला हवा.

संप्रेरके ही घरी करता येऊ शकतात यावर अनेक शेतकऱ्यांचा विश्वास नाही. पण हे करून तर पाहा. सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना देण्यासाठी आंबवलेल्या फळांचा रस फवारला जातो. हे तयार कसे करायचे. यासाठी पपई, केळी, चिकू, आंबा ही चार फळे घ्यावीत. सालीसकट फळांच्या बारीक फोडी कराव्यात. फोडींच्या वजनाइतका गूळ त्यामध्ये मिसळावा. हे मिश्रण एका बाटलीत बंद करून ठेवावे. कुठलेही मिश्रण भरताना बाटली पूर्ण भरायची नाही. त्यामध्ये थोडी रिकामी जागा राहील याची काळजी घ्यावी. रासायनिक प्रक्रियेसाठी त्यामध्ये थोडी मोकळी हवा असणे गरजेचे असते.

बाटलीचे झाकणही घट्ट बंद करून थोडे ढिले करून ठेवावे. सात दिवसांनंतर तयार झालेले हे मिश्रण एक लिटर पाण्यात दोन मिली मिश्रण या प्रमाणात मिसळून फवारावे. पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये यातून मिळतात व पिकांची वाढ जोमदार होते. केळीच्या कोंबापासूनही संप्रेरक तयार केले जाते. केळीचे कोंब दोन ते तीन इंच जमिनीतून काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत. या तुकड्यांच्या वजनाइतका गूळ त्यामध्ये मिसळावा. हे मिश्रण दहा दिवस बाटलीत बंद करून ठेवावे. एक किलो केळीचे तुकडे घेतल्यास एक किलोच गूळ वापरावा. दहा ते पंधरा दिवसानंतर दोन मिली मिश्रण एक लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. पिकांची जोमदार वाढ होते.

शेंगदाण्याचे बी व एरंडीचे बी दोन्ही एक एक मूठभर घेऊन ते जमिनीत पेरावे. दहा ते पंधरा दिवसानंतर ते उगवून आलेले बी मुळासकट काढावे. ते न धुता तसेच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. ही तयार झालेली पेस्ट एक लिटर पाण्यात पाच मिली पेस्ट या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावी. यामुळेही पिकाची वाढ जोमदार होते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये व संप्रेरके यांचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. उत्पन्नवाढीस यामुळे मदत होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे….!

मुक्त होणे म्हणजे तरी काय ? 

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading