June 17, 2024
Article on Bramhdnyn by rajendra ghorpade
Home » साक्षात शिष्याजवळ येते ब्रह्मज्ञान विश्रांतीला
विश्वाचे आर्त

साक्षात शिष्याजवळ येते ब्रह्मज्ञान विश्रांतीला

ब्रह्मज्ञान साक्षात विश्रांतीला येते असा शिष्य आपण व्हायला हवे. अर्जुन आपण व्हायला हवे. अर्जुन होऊनच आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्जुनासारखे स्थितप्रज्ञ, सदैव जागरूक, दक्ष असे आपले सामर्थ्य असायला हवे. अनेक गुरु शिष्याला अनुभुती देतात. मला भेटायला येऊ नको मी तेथे नसणार असा अनुभव देतात. बोलतात तसे ते वागतातही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु ।
सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ।। ३३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे.

स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । स्वामींचा, सद्गुरुंच्या मनाप्रमाणे व्यवहार करणे. त्यांच्या इच्छेनुसार वागणे हीच खऱ्या अर्थाने त्यांची सेवा असते. अर्जुन हा कृष्णाच्या मनासारखे वागणारा त्याचा सोबती आहे. गुरु शिष्यातील नाते हे असे असते. त्यामुळे शिष्यही गुरुच्या मनातील मनोभाव ओळखू शकतो. गुरुंना काय अभिप्रेत आहे याची जाणिव शिष्याला होते. आत्मज्ञानी संत ही अनुभूती शिष्याला, भक्ताला देत राहातात. सदैव त्या शिष्याला जागृत करतात. जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेमुळे घडते. हा स्वामींचा प्रसाद आहे असे समजून शिष्य त्यांचा स्वीकार करतो. घटना घडणार आहे याची अनुभुती खऱ्या भक्ताला दिली जाते. जे घडणार आहे ते कसे रोखणार ? भविष्य तुम्ही जाणू शकता पण घडणारे आहे ते कसे टाळणार ? विधिलिखित आहे ते तुम्ही कसे बदलू शकणार. घडणारी घटना बदलता येणे शक्य नाही. पण ते घडणार आहे म्हणून गप्प बसूनही चालणारे नाही. त्या घटनेच्या अनुशंगाने आपण आपली तयारी ठेवायची असते. जे आहे ते नित्य कर्म आपण करतच राहायचे आहे.

सद्गुरुंच्यावर विश्वास ठेवून आपण जीवनात कार्यरत राहायचे आहे. हाच स्वामींचा, सद्गुरुंचा मनोभाव आहे. हे ओळखून आपण कार्यरत राहायचे आहे. ज्ञान होते पण आपण जागरूक असायला हवे. आपले अवधान असायला हवे. अवधान ढळता कामा नये अन्यथा मग चुका ह्या होतच राहाणार. स्वामींच्यावर विश्वास ठेवून आपण कार्यरत राहायचे आहे. जीवनात चांगल्या वाईट घटना या घडतच असतात. प्रत्येक व्यक्ती चांगले वागेलच असे नाही. यासाठी चांगले होईल हा विश्वास ठेवून आपण कार्यरत राहायचे आहे. घडणारे आपण टाळू शकत नाही पण निवांतही फक्त पाहात बसणेही योग्य नाही. दैवही फिरू शकते.

ब्रह्मज्ञान साक्षात विश्रांतीला येते असा शिष्य आपण व्हायला हवे. अर्जुन आपण व्हायला हवे. अर्जुन होऊनच आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्जुनासारखे स्थितप्रज्ञ, सदैव जागरूक, दक्ष असे आपले सामर्थ्य असायला हवे. अनेक गुरु शिष्याला अनुभुती देतात. मला भेटायला येऊ नको मी तेथे नसणार असा अनुभव देतात. बोलतात तसे ते वागतातही. पण आपण भोळ्याभाबड्या आशेने त्यांना भेटायला जातोच. भेट होतच नाही पण प्रेमापोटी आपण भेटायला जातो. यातून त्यांना आपणास जागरूक करायचे असते. आत्मज्ञानाची अनुभुती ते देत असतात. या अनुभुतीतूनच आपली प्रगती त्यांना साधायची असते. आत्मज्ञानाची गोडी त्यांना लावायची असते. त्या ज्ञानाची ओळख आपणाला करून द्यायची असते. असे हे ब्रह्मज्ञान साक्षात शिष्याकडे विश्रांतीला येते. हे ज्ञान आपणास असायला हवे. याचे अवधान आपणास असायला हवे तरच आपण आत्मज्ञानी होऊ, ब्रह्मज्ञानी होऊ.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts to your email.

Related posts

आंब्याच्या विविध जाती…

अमरत्वाची अनुभुती देणारे अक्षर

प्रभाती सूरमनी रंगती

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading