शस्त्र जवळ असेल तर शत्रूचे भय वाटत नाही. अडचणीच्या प्रसंगात हे शस्त्र भवानी माता देते. शस्त्र मग ते खङग असेल किंवा सदविचारांचे अस्त्र असेल. अशावेळी कोणताही शत्रू आला तरी त्याच्याशी लढण्याचे सामर्थ्य देवी देत असते. यासाठी देवीची आराधना आपण करत असतो. सद्गुरू हे देवीसमान आहेत. देवी प्रमाणे साधनेतील सर्व शस्त्रे ते पुरवत असतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – ९०११०८७४०६
तूं गुरू बंधू पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ।। 59 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – तू आमचा गुरू, बंधू, पिता, तूं आमची इष्ट देवता. संकटसमयी तुच आमचे रक्षण करणारा आहेस.
साधना करताना अनेक अडथळे येत असतात. पण या अडथळ्यातून सद्गुरूच मार्ग दाखवतात. इतकेच काय सद्गुरूच साधनेची आठवण करून देतात. प्रत्यक्षात साधनाही सद्गुरूच करून घेत असतात. आपण काहीच करत नसतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. सद्गुरुंच्या समाधीच्या सानिध्यात ही अनुभूती जरूर येते. यासाठीच त्यांची समाधी ही संजीवन आहे असे म्हटले जाते.
सद्गुरुंची नेहमीच शिष्यावर कृपा असते. लहान भावाप्रमाणे ते शिष्यावर प्रेम करत असतात. पित्याप्रमाणे ते शिष्याचा सांभाळ करत असतात. फक्त आपली पाहण्याची दृष्टी तशी हवी. आपण त्या नजरेने पाहातच नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथी कोण होते ? स्वतः भगवान कृष्ण होते. शिष्य हा अर्जुनासारखाच असतो. शिष्याच्या रथाचे सारथी हे सद्गुरूच असतात. फक्त शिष्याला त्याची अनुभूती यायला हवी.
संसाराचा असो की आध्यात्मिक साधनेचा गाडा असो दोन्हीही सद्गुरूच हाकत असतात. मग हा रथ चिखलात रुतो किंवा भरधाव वेगाने धावत असो. या रथाची दोरी सद्गुरुंच्याच हातात असते. त्यामुळे सर्व चिंता बाजूला ठेवून साधना करायला हवी. मनातील सर्व विचार दूर सारून साधनेला बसायला हवे. भीती मनात ठेवून साधना होत नाही. सद्गुरू नित्य आपल्या पाठीशी आहेत. हा भाव मनात ठेवूनच साधना करायला हवी. म्हणजे साधनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात.
शस्त्र जवळ असेल तर शत्रूचे भय वाटत नाही. अडचणीच्या प्रसंगात हे शस्त्र भवानी माता देते. शस्त्र मग ते खङग असेल किंवा सदविचारांचे अस्त्र असेल. अशावेळी कोणताही शत्रू आला तरी त्याच्याशी लढण्याचे सामर्थ्य देवी देत असते. यासाठी देवीची आराधना आपण करत असतो. सद्गुरू हे देवीसमान आहेत. देवी प्रमाणे साधनेतील सर्व शस्त्रे ते पुरवत असतात.
साधनेच्या काळात वासना अधिक बळावतात. या काळात मनावर नियंत्रण ठेवावे लागते. भोगाची इच्छा अधिक तीव्र होत असते. या इच्छेवर ज्याने विजय मिळवला तोच आत्मज्ञानी होण्यासाठी समर्थ होतो. भोग, वासना दूर सारण्यासाठी सद्गुरू सोऽहम चे शस्त्र सांगतात. सोऽहमवर मन नियंत्रित करण्यास सांगतात. मनावर नियंत्रण ठेवणे हे शिष्यांचे कर्तव्य आहे.
ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. विश्वाचे आर्त त्यालाच समजते. त्यालाच उकलते. या वासना, मोहातून सद्गुरूच रक्षण करत असतात. यासाठी सद्गुरुंचे ध्यान करायला हवे. सद्गुरुंनी दिलेल्या सोऽहम मंत्राने सर्व व्याधी दूर होतात. सर्व दुःखे दूर पळतात. सर्व वासना, मोह यांचा नाश होतो. मगच आत्मज्ञानाचा दिप उजळतो.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.