September 22, 2023
First step of Spirituality article by Rajendra Ghorpade on Dnyneshwari
Home » अध्यात्माची पहिली पायरी
विश्वाचे आर्त

अध्यात्माची पहिली पायरी

जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे का ? आपले नाव, आपला व्यवसाय ही आपली ओळख आहे का ?

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

ॐ नमाे जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। 1 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ – ॐ कार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंथन करतात. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्रीओंकारा तुला नमस्कार असो. स्वतःला स्वतः जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरुपी ओंकारा, तुझा जयजयकार असो. 

स्वतःच स्वतःला ओळखणे ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. येथून अध्यात्माच्या प्रगतीला सुरवात हाेते. स्वतःला ओळखायचे म्हणजे नेमके काय ? मी काेण आहे ? हा प्रश्न स्वतःच स्वतःला विचारावा. मी राजा आहे. मी भिकारी आहे. मी उद्याेगपती आहे. मी कारखानदार आहे. मी राजकीय नेता आहे. अशी एखादी ओळख आपली आहे का ?

जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे का ? आपले नाव, आपला व्यवसाय ही आपली ओळख आहे का ? ही सर्व ओळख देहाची आहे. देह जन्माला आल्यानंतर त्याचे नामकरण केले जाते. ताे काही कर्मे करताे. यातूनही त्याची ओळख निर्माण हाेते. मग मी म्हणजे देह आहे का ?

देह हा पंचमहाभूतांपासून तयार झाला आहे. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि गगन ही पंचमहाभूते आहेत. मृत्यूनंतर देह पंचत्वात विलीन हाेताे. मग आपली ओळख काय ? देह जन्मताे, मृतही हाेताे. पण देह जिवंत कशामुळे असताे ? त्याच्यात चैतन्य कसे येते ? ते काय आहे ? जिवंतपणा म्हणजे तरी काय ?

श्वास आत येताे, बाहेर जाताे ही क्रिया जाेपर्यंत सुरू असते ताेपर्यंत देह जिवंत असताे. ही क्रिया थांबली की देह म्हणजे निर्जीव वस्तू आहे. मग देह ही आपली ओळख कशी असेल. ही सुद्धा आपली ओळख नाही. देहाला जिवंतपणा कशामुळे येताे. देहात आत्मा आल्यानंतर देह जिवंत हाेताे. आत्मा देहातून गेल्यानंतर देह मृत हाेताे. मग मी म्हणजे काेण आहे ?

मी एक आत्मा आहे. आत्मा ही आपली ओळख आहे. मी आत्मा आहे. पण हा आत्मा प्रत्येक देहात आहे. प्रत्येक देहात असलेला आत्मा वेगळा आहे का ? ताे एकच आहे. मग सर्वांच्या ठिकाणी आत्मा हा एकच आहे. तर मग सर्वच जण हे एक आहेत. देहात आल्यानंतर त्यांची ओळख बदलली आहे. मी देह आहे हा अहंकार त्याच्यात आला आहे. या अंहकारामुळे आत्मा हा दिसतच नाही. खरी ओळख ताे विसरला आहे.

स्वतःची खरी ओळख ही आत्मा आहे. ही ओळख सदैव ठेवल्यानंतर आत्मज्ञानाची प्राप्ती हाेते. ही ओळख कायम स्मरणात राहावी, यासाठीच साधना केली जाते. साधनेने ही ओळख दृढ हाेते. पण यासाठी याेग्य मार्गदर्शकाची गरज आहे. सद्गुरू हे मार्गदर्शक असतात.

सद्गुरू आत्मज्ञान विकासासाठी त्याचे बीज अनुग्रहाद्वारे शिष्यामध्ये लावतात. हे बीज हळूहळू विकसित हाेते. ताे शिष्य आत्मज्ञानी हाेताे. त्या नराचा नारायण हाेताे. त्याला देवत्व येते. इतके साेपे, सहज हे अध्यात्मशास्त्र आहे. सद्गुरूंच्या कृपेने हे आत्मसात हाेते. अशा आत्मज्ञानी सद्गुरुंचा जयजयकार असाे.

Related posts

आत्मज्ञानी शिष्य व्हावा यासाठीच संग्राम

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

मनातून मीपणा गेला तरच घडतो खरा त्याग

Leave a Comment