June 19, 2024
monsoon-reach Harnai to Baramati
Home » मान्सून हर्णाई बारामती पर्यन्त
काय चाललयं अवतीभवती

मान्सून हर्णाई बारामती पर्यन्त

१- मान्सून कुठपर्यन्त पोहोचला.

मान्सून महाराष्ट्रातील हर्णाई, बारामती व तेलंगणातील निझामबाद पर्यन्त  पोहोचला असुन मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे.    
                 
२-मुंबईतील पाऊस कसा असेल?

दक्षिण कोकण किनारपट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे, मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दि. १५ जूनपर्यन्त  जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अनुभव मुंबईकरांना ह्या आठवडयात येऊ शकतो, असे वाटते.

३-मध्य महाराष्ट्रात पाऊस कसा?

मुंबईतल्या ह्या पावसामुळे नैरूक्त मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा उर्जीतावस्थेत येऊन मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच संपूर्ण पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो. तेथे म्हणजे ह्या १८ जिल्ह्यात बुधवार दि. १२ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्व मोसमी वा मोसमी पावसाची शक्यता जाणवते.

४- मराठवाडा, विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी?

बंगाल मान्सूनी उपसागरीय शाखा एक आठवडा ओलांडला तरी ३१ मे पासून जाग्यावरच खिळलेली दिसत आहे. त्या शाखेचा मान्सून हिमालयीन प. बंगालच्या प्रवेश द्वारा पर्यन्त पोहोचला. त्याच्यापुढे खरं तर मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची अपेक्षा असते. परंतु त्या पद्धतीने कोसळतांना जाणवत नाही. त्यामुळे त्या शाखेची मान्सूनची प्रगती होतांना दिसत नाही. आणि त्याचा परिणाम विदर्भ मराठवाड्यातील मान्सून च्या प्रगतीवर होतांना दिसत आहे. म्हणून तर विदर्भ मराठवाड्यात सध्या फक्त तूरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते.  मान्सूनच्या चांगल्या हजेरीनंतरच तेथील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा असे वाटते. 
      
५- महाराष्ट्रात खरीप पेरणीची स्थिती काय असु शकते?

महाराष्ट्रात १५ जूनपर्यन्त जो काही पाऊस होईल, त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जेथे १० से. मी.चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजे पेर-उतार नंतर पीक रोप ३० ते ४० दिवस दम धरेल अश्याच खात्रीच्या ठिकाणी, २० जून दरम्यान पेरणी होवु शकते, असे वाटते.
                त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अश्याच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचे धाडस २० जून दरम्यान करावे, असे वाटते. कारण १५ जूननंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फार सावधगिरीने, संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे. असे वाटते.

६-सध्या मान्सूनसाठी वातावरणीय आशादायक चित्र काय आहे?
      
(i) जमिनीपासून ३ ते ६.५ किमी. उंच अश्या साडे तीन किमी. क्षेत्र हवेच्या जाडीत  पूर्वकडून -पश्चिमेकडे व त्याच्या खाली पश्चिमेकडून -पूर्वेकडे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांचा उंचावरील असलेला ‘ शिअर झोन ‘ हा सध्या १६ डिग्री अक्षवृत्त समांतर म्हणजे मान्सून पोहोचलेल्या सीमा रेषेच्या थोडा उत्तरेकडे आहे. शिवाय
(ii)दुसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते केरळ पश्चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दिड किमी.उंचीपर्यंतचा हवेच्या  कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय  आस म्हणजेच त्याला ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘ म्हणतात. त्याचे अस्तित्व जाणवत आहे. खरं तर हवामान शास्त्राप्रमाणे त्याला लगेचच ‘ ऑफ-शोर-ट्रफ ‘  म्हणणे चुकीचे ठरेल कारण अजुन मान्सून पूर्णपणे पोहोचला नाही. तरी देखील त्याच्या सदृश्य स्थिती आहे. अश्या दोन मुख्य व लाभदायी प्रणालीमुळे मान्सून मध्ये ऊर्जा भरली जाऊन सध्या पावसाची शक्यता जाणवते.

माणिकराव खुळे

हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज…

पुढील पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:

• नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि  आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.

• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः

• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.

• कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, रात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

• ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात  8 ते 12 जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .

• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या  भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.

Related posts

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

गीता तत्त्वज्ञान का अभ्यासायचे ? 

फळ व्यापाऱ्यांना एफएसएसएआय‘चा खबरदारीचा इशारा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406