भारतीय संस्कृतीत अवतारवाद सुद्धा मान्य केला गेला आहे. पण हा अवतारवाद गुरू-शिष्य परंपरेला मानणारा आहे. त्या परंपरेतूनच त्याचे संवर्धन होत असते. अनादी कालापासून या भूमीत ही परंपरा चालत आली आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तरी गुरुदाविलिया वाटा । येऊनि विवेकतीर्थतटा ।
धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ।। १०११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – तर गुरूंनी दाखविलेल्या वाटेनें विवेकरूपी तीर्थांच्या काठावर येऊन तेथे त्या साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुऊन टाकल्यावर.
स्वच्छता आणि उत्तम आरोग्य यासाठी आपण रोज आंघोळ करतो. अंगावरील मळ घालवणे गरजेचे असते. तो अंगावर बसत राहीला तर अंगातून बाहेर निघणारा घाम अंगातच राहील. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत राहातो. मनाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मग मनात साचलेला मळ धुवून टाकायला नको का ? बुद्धीमध्ये मळ साचतो. हा मळातून उत्पन्न होणाऱ्या वाईट विचारामुळेच आपल्या मनाचे आरोग्य बिघडते. याचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. अर्थातच बुद्धीत साचलेला मळही काढणे गरजेचे असते. अंगावरील मळ घालवण्यासाठी आपण रोज आंघोळ करतो. तसे बुद्धीत, मनात साचलेला मळ काढण्यासाठी नित्य उपाययोजना करायला नकोत का ? यासाठीच नित्य साधना, ध्यानधारणा हे आवश्यक आहे. रोज सकारात्मक विचारांची बैठक बसू लागली तर नकारात्मक विचार आपोआपच कमी होऊ लागतात. मनाचे आरोग्य उत्तम राखले जाऊ शकते.
ब्रह्मप्राप्ती होण्यासाठी विविध संस्कारांनी शरीराची तसेच मनाचीही शुद्धीही होणे गरजेचे आहे. अशा या विविध संस्कारांनी शुद्धी मिळवलेल्या शरीरातच पवित्र आत्मा हा वास करत असतो. अशुद्ध शरीरात पवित्र आत्मा राहात नाही. बाह्य संस्कारांनी संपन्न झालेली व्यक्ती ही ऋृषीपदी बसू शकते. तर दैव संस्कारांनी संपन्न झालेली व्यक्ती ही देव पदावर विराजमान होते अर्थात त्या व्यक्तीला देवत्व प्राप्त होते. भारतीय संस्कृतीत दोन्हीही व्यक्ती आहेत. यासाठीच भारतीय गुरू-शिष्य परंपरेचा आध्यात्मिक वारसा हा जोपासायला हवा. त्याचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
भारतीय संस्कृतीत अवतारवाद सुद्धा मान्य केला गेला आहे. पण हा अवतारवाद गुरू-शिष्य परंपरेला मानणारा आहे. त्या परंपरेतूनच त्याचे संवर्धन होत असते. अनादी कालापासून या भूमीत ही परंपरा चालत आली आहे. धर्माच्या रक्षणासाठी अन् अन्याय आणि अत्याचार यांचे समुळ उच्चाटन करून जनतेला न्याय देण्यासाठी ही परंपरा सदैव स्वतःचे अस्तित्व दाखवते. सुप्तावस्थेतील ही परंपरा योग्यवेळी जागृतावस्थेत येते. यातूनच मग अवतारीपुरूष जन्माला येतो. तो या संस्कृतीचे अन् धर्माचे रक्षण करतो. पण येथील धर्म म्हणजे काय हे अभ्यासने खूप गरजेचे आहे.
प्रत्येक मानवाचा धर्म आहे. मी कोण आहे ? याचा अभ्यास करणे. स्व ची ओळख करून घेऊन तसे आचरण ठेवण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. हा धर्म स्वार्वभौम राजा जरी असला तरी त्याला लागू आहे. प्रजेला न्याय देणे प्रजेचे रक्षण करणे ही राजाची स्वभावज कर्मे आहेत. यातून त्याचे ते पद सिद्ध होते. एकछत्र राज्यनिर्मिती करून महाराजाधिराज छत्रपती ही बिरुदावलीही त्याला प्राप्त होते. कारण भारत हा विविध भाषेचा, धर्मांचा देश आहे. अशा या देशात राजाला हे सर्व वैविध्य एकाछत्राखाली आणण्याचे कौशल्य करून दाखवावे लागते. यासर्वांसाठीच त्याला गुरू-शिष्य परंपरेच्या आध्यात्मिक संस्कृतीचे संवर्धन करावे लागते. अध्यात्मिक अनुभूतीतूनच हे सर्व उभे राहात असते. या धर्माच्या रक्षणासाठीच, प्रज्येला न्याय देण्यासाठीच सुप्तावस्थेतील या परंपरेची जागृती होते. अन् मग कोण त्याला अवतारी पुरूष म्हणते तर कोण त्याला सार्वभौम राजा म्हणते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.