आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – अवकाळी व गारपीटीची शक्यता कोठे आहे ?
माणिकराव खुळे – विदर्भातील अकरा जिल्ह्यात आज गुरुवार ते रविवार दि. २० ते २३ मार्च दरम्यानच्या चार दिवसात अवकाळी वातावरणाचा परिणाम जाणवेल, असे वाटते.
विशेषतः विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेंच मराठवाड्यातील नांदेड अश्या आठ जिल्ह्यात गुरुवार ते शनिवार दि. २० ते २२ मार्च दरम्यान अवकाळी बरोबर गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
प्रश्न – मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा धोका आहे काय ?
माणिकराव खुळे – मध्य महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात सध्या जरी अवकाळीचा परिणाम नसला तरी रविवार दि. २३ ते मंगळवार दि. २५ मार्च दरम्यानच्या तीन दिवस ढगाळ वातावरणच राहून झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
पावसापेक्षा विजा, वारा व गडगडाटी सारख्या अवकाळी वातावरणाची शक्यता अधिक जाणवते. गारपीटीची शक्यता मात्र ह्या १० जिल्ह्यात जाणवणार नाही, असे वाटते.
प्रश्न – उष्णतेच्या लाटेची शक्यता राज्यात आहे का ?
माणिकराव खुळे – आज दि. २० ते २४ मार्च दरम्यानच्या पाच दिवसात, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिवसाच्या दुपारच्या कमाल तापमानात काहीशी घट होवून तापमान सध्यापेक्षा २-३ डिग्रीने कमाल तापमान घटण्याची शक्यता असुन महाराष्ट्रात कोठेही सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही.
मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात मात्र सध्या असलेल्या तापमानात विशेष बदल न होता, कायम राहील,
असे वाटते.
प्रश्न – वातावरणातील सध्याचा बदल कश्यामुळे ?
माणिकराव खुळे – बंगालचा उपसागारातील ९०० मीटर उंचीपर्यंतच्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे व म. प्रदेशाच्या नैरूक्त भागात १५०० मीटर उंचीपर्यंतच्या आवर्ती चक्रीय वारे अश्या दोन्हीही वाऱ्यांचा विदर्भादरम्यान होणाऱ्या संगमातून ऊबदार बाष्पाचा अवकाशात उरध्वगमन होवून उंचावरील थंडाव्यातून सांद्रीभवनातून उष्णतेच्या संवहनी क्रियेद्वारे अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.