December 4, 2024
History of Sugar Industry in the country
Home » देशातील साखर उद्योगाचा इतिहास
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देशातील साखर उद्योगाचा इतिहास

सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने साखर कारखानदारीस कर विषयक संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळाले. 1932 च्या कायद्याचा आधार घेऊन सहकाराच्या तत्वावर भारतात 1933 साली चार साखर कारखाने सुरू झाले.
आंध्र प्रदेशात इरिकोपड्डा येथे रावबहादूर सी. व्ही. एस. नरसिंहराव यांनी सहकारी तत्वावरील साखर कारखाना स्थापन केला. त्यावेळी त्याची गाळप क्षमता 75 टन ऊस प्रतिदिन होती. हा कारखाना आजही सुरू आहे.

मंगेश तिटकारे,
माजी साखर सहसंचालक
महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रश्न – 17 व्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानात उभारणी झालेले पहिले उद्योग कोणते ?

मंगेश तिटकारे – हिंदुस्थानामध्ये खांडसरी साखर कारखान्याची सुरुवात इ. स. 1610 मध्ये कॅप्टन हिप्पॉन याच्या मच्छलीपट्टणम मधील साखर व कोरोमंडल किनार्‍याजवळील ‘पेटापोल्ली’ यांची फॅक्टरी व तिसरी सन 1612 मध्ये सुरतेला स्थापन झालेली कॅप्टन बेस्ट व डॉटन यांची साखर फॅक्टरीमुळे झाली. कमी गाळप क्षमता असलेले छोटेखानी खांडसरी साखर निर्माण करणारे हे उद्योग होते.

संदर्भ – पेशवे डायरी
(पेशवेकालीन महाराष्ट्र पृ २४१-२४२)
बिहारमध्ये ‘महुरी’ या आदिवासी जमातीच्या लोकांचे स्थानिक खांडसरी सदृश्य शुद्ध साखर तयार करण्याचे किमान 15 तरी छोटेखानी उद्योग 18 व्या शतकाच्या मध्यास होते. स्थानिक लोकांनी पिकवलेला ऊस त्यासाठी वापरला जाई. तयार होणारी अर्धीकच्ची, शुध्द करण्याच्या प्रयत्नात केलेली साखर बास्केटमध्ये तुकड्यांमध्ये स्थानिक बाजारात विकली जात असे.

सन 1772 सालात ईस्ट इंडिया कंपनीचे शिष्टमंडळ बिहारमध्ये साखर कारखान्यांनी शक्यता आजमावण्यासाठी आले होते. लेफ्ट. जे पॅटर्सन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शिष्टमंडळाच्या अहवालात तिरहट जिल्ह्यातील, परिसरातील तसेच बंगाल प्रेसिडेन्सीचा सुपीक भात उत्पादनासाठी केवळ चांगला आहे, असे नव्हे तर तेथे स्वस्त मजुरांची उपलब्धता आहे हे त्यांनी नमूद केले होते. तसेच वाहतूक करणेही फारसे अडचणीचे नाही हेदेखील उल्लेख करुन ठेवले होते.

थॉमस पॅरी ( Thomas Parry )

तत्कालीन शासनाच्या प्रोत्साहनामुळे शेतकरी ऊस उत्पादनाकडे वळले. खांडसरी साखरेची शुक शुगर फॅक्टरी 1784 मध्ये कोपटर यांनी बिहारमध्ये सुरू केली. ही खासगी फॅक्टरी होती. सन 1791 मध्ये हिंदुस्थानातून ग्रेट ब्रिटनला 96 क्विंटल साखर निर्यात करण्यात आली, अशा नोंदी आढळतात.
थॉमस पॅरी या उद्योजकाने भारतात 1788 सालात येऊन अनेक उद्योग सुरु केले. त्यानी स्थापन केलेल्या इ. आय. डी. पॅरी कंपनीने (इंस्ट इंडिया डिस्टिलरीज EID Parry) मद्रासजवळ (आताचे चेन्नई) नेल्लीकुप्पम् येथे 1842 साली साखर कारखाना सुरु केला. ऊस व साखर क्षेत्रात संशोधन व विकास विभाग स्वतंत्र असलेला खासगी क्षेत्रातील तो पहिला साखर कारखाना होता.

ईस्ट इंडिया डिस्टिलरीज (EID Parry) कारखाना
साखरेमुळे कोलकत्यात आलेले चिनी लोक : –
कोलकत्ता शहरात ‘बजबज’ नावाची एक वस्ती आहे- नावाला आणि अर्थाला जागणारी. याच बजबज भागात काही चिनी व्यापा-यांनी स्वत:ची पहिली पेठ वसवली होती. तोंग अच्यू (Tong Achew) नामक एका यशस्वी चिनी व्यापार्‍याने येथे सर्वप्रथम जागा विकत घेऊन इथे साखर कारखाना सुरु करायचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांकडून रीतसर परवानगीही मिळवली होती. साखर कारखान्यासाठी 650 बिघा जमीन दीर्घमुदतीच्या करारावर देणार्‍या परवानगी पत्रावर खुद्द गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जची सही 1772 सालातील आहे.

चायना टाउन त्याकाळचे ..
पुढे कारखान्याच्या कामासाठी चीनमधून काही जाणकार व मजूर लोक आणण्यात आले. 2 ते 3 वर्षे कारखाना चालला; पण त्यानंतर मूळ मालक तोंग मरण पावला. सदर साखर कारखाना बंद पडला. त्याच्यासोबत आलेले चिनी लोक मात्र परत गेले नाहीत. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती, भाषा व धार्मिक परंपराच्या रूपाने कोलकत्यात त्यांच्या देशाला जिवंत ठेवले. आज हा भाग तोंग अच्यूच्या नावाने ‘अचीपूर’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्मृती आजही तेथे आहेत. त्यांची वस्ती असलेल्या भागास ‘चायना टाऊन’ म्हणण्याचा प्रघात आहे.

कोलकात्यातील चायना टाउनचे सध्याचे स्वरूप
सध्या कोलकत्यात दोन चायना टाऊन आहेत. एक जुने चायना टाऊन रवींद्र सरिणीजवळ तिरेता बझार (Tiretta Bazar) भागात आहे व दुसरे पूर्व कोलकत्याच्या तांगरा भागात न्यू चायना टाऊन आहे. हे चिनी लोक सुरूवातीस 30 हजार एवढ्या संख्येने होते. भारत चीन मध्ये 1962 साली झालेल्या युद्धानंतर बहुतांशी सधन चीनी लोक हाँगकाँग, कॅनडा व ऑस्ट्रेलिया येथे स्थलांतरित झाले. आता जेमतेम 2 हजार लोक तेथे आहेत. चायनीज फूड, बेकरी पदार्थ, सॉसेस्, छोटी उपहारगृहे या धंद्यात आता ते आढळतात. साखरेमुळे चीनमधून भारतात येऊन कोलकत्यात स्थायिक झालेल्या चीनी लोकांची ही सध्याची पिढी आहे.


हिंदुस्थानात विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश येथे 18 व्या शतकाच्या अखेरीस साखर कारखानदारी का वाढली ?

बंगाल आस्थापना अधिकारी यांचा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सादर केलेला हिंदुस्थानातील साखर उद्योगाबाबत ‘साखरेचा अहवाल’ यामध्ये अनेक महत्वाच्या बाबींचा उल्लेख आहे. सन 1792 च्या सुमारास इंग्लंडमध्ये साखरेच्या किंमती खूप वाढल्या. ईस्ट इंडिया कंपनीने या किंमती कमी करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट पुढे 15 मार्च 1792 ला हा अहवाल सादर केला. हा अहवाल लेफ्टनंट जे. पॅटर्सन या बंगालच्या आस्थापनेवरील इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍याने तयार केला. यामध्ये वेस्ट इंडिजपेक्षा हिंदुस्थानात ऊस लागवड, साखर उत्पादन हे कसे किफायतशीर होईल व त्यामुळे साखरेच्या किंमती कशा उतरतील याचा अहवाल होता. या अहवालावर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली. परिणामस्वरुप म्हणून हिंदुस्थानात साखर उद्योगाला चालना, प्रोत्साहन देण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर सरकारी प्रोत्साहनामुळे देशात विशेषत: बिहारमध्ये अनेक साखर उद्योग उदयास आले.

पेकहॅम लेडीज आफ्रिकन अँड अँटी स्लेव्हरी असोसिएशनची चळवळ :

सन 1828 मध्ये पेकहॅम लेडीज या आफ्रिकन लोकांना गुलामगिरीने वागविण्याच्या पद्धती विरुद्ध चालू असलेल्या चळवळी मधून गुलामांच्या कष्टाने तयार झालेल्या वेस्ट इंडिजच्या साखरेवर निर्बंध घालावेत असे आवाहन केले. ‘पेकहॅम लेडीज आफ्रिकन अँड अँटी स्लेव्हरी असोसिएशन’ या स्त्रियांच्या प्रभावी चळवळीकडून गुलामांच्या छळ करुन वेस्ट इंडिजमध्ये तयार करण्यात आलेल्या साखरेवर बंदी घालण्यावर व त्याचा वापर सर्वांनी थांबविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
मूलत: गुलामांच्या व्यापाराचे निर्मूलन होण्यासाठी सन 1787 मध्ये एक उदारमतवादी पंथाकडून समितीची स्थापना करण्यात आली.
विल्यम बिलवेर फोर्स हा त्यातील प्रमुख नेता होता. या संघटनेकडून अत्यंत प्रभावी चळवळी सन 1791-1792 व सन 1825-1899 या कालावधीत झाल्या. सन 1791 मध्ये पत्रके वाटली गेली. चार महिन्यात 70 हजार पत्रके या चळवळीची भूमिका मांडतांना वाटली गेली. स्त्रियांनी मुख्यत्वे या चळवळीत भाग घेऊन गुलामांचा छळ करुन तयार झालेल्या वेस्ट इंडीजच्या साखरेचा वापर थांबवण्यासाठी हिरीरीने प्रचार केला. किमान 4 लाख लोकांनी या साखरेचा वापर पहिल्या टप्प्यात थांबवला.

सन 1807 नंतर गुलामांच्या व्यापारावर ब्रिटिश वसाहतींमध्ये हळुहळू बंदी आणली गेली. वेस्ट इंडीज या कॅरेबियन वसाहतीमध्ये ही पद्धत 1833 साला पर्यंत चालू होती. सन 1828 ला ‘Reason for using East Indian Sugar’ हे पुस्तक या पार्श्वभूमीवर या चळवळीने प्रसिध्द केले. त्यामुळे हिंदुस्थानातील साखरेला मागणी मोठ्या प्रमाणात येऊ लागली व एत्देशीय हिंदुस्थानात विशेषत: बिहार, उत्तर प्रदेशामध्ये साखर उद्योग उभे राहण्यास सुरुवात झाली.

सन 1820 ला वाराह इस्टेटली व बिहारमध्ये चंपारण शुगर कं. ही मेसर्स स्टेवर्ट मोरान हेन्री हील, कॅप्टन हिकी, हेनी व जोसेफ हील व एच एल हॉचे यांनी स्थापना केली. या फॅक्टरीमध्ये साखरेचे उत्पादन कार्बोनेशन प्रक्रियेने केले जाई. लाईमस्टोनचा वापर कोक बरोबर केला जाई. 1:10 या प्रमाणात ते भट्टीत जाळले जाई, तयार होणारा कार्बोनीक गॅस हा टँक मधून सोडला जाई. शुध्दीकरण करण्याची ही आधुनिक प्रकिया वापरली गेली. 100 दिवस हंगामात ही फॅक्टरी चाले. 300 टन ऊस गाळला जाई व 8% साखर उतारा मिळे. यातील उत्पादन स्थानिक व पंजाब राज्यातही खपत असे.

चंपारण शुगर मिल

ईस्ट इंडिया कंपनीने बिहार मधील भिकनपूर व जपाहा या तेव्हाच्या तिरहट जिल्ह्यात साखर फॅक्टरी उभी करण्यासाठी सन 1890 सालामध्ये परवानगी दिल्याची नोंद आहे. कंपनीच्या कमिशनरने मि. काहील यांनी यासाठी ‘50 बिघा जमीन’ धारण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर ती 5000 एकर झाली. यातील 2000 एकरवर ऊसाचे उत्पादन केले जाईल. शेणखत वापरुन उत्पादन घेतले जाई. 1500 एकरवर नीळ व 1500 एकर वर गहू, बार्ली, ओटस्, मोहरी व इतर पीके घेतली गेली. 8 एकरावर फॅक्टरीची उभारणी झाली. 100 टन ऊस एका दिवसात गाळपाची क्षमता या फॅक्टरीत होती.

मोतीहारी शुगर मिल

स्थानिक, पंजाब व उत्तर भारतीय जिल्ह्यात या साखरेचा खप होई. डिसेंबर ते एप्रिल या काळात फॅक्टरी चाले. 14 ते 15 टनाच्या ऊसापासून एक टन साखर तयार केली जाई. गंधकाच्या बॉक्सवरुन निघणार्‍या वाफांवरुन ऊसाचा रस तापवत नेला जाई. स्वच्छ केलेल्या रसातून आणखी अशुद्धता काढण्यात येई. त्यानंतर दाबाखाली ‘प्रेसफिल्टर’मधून तो काढला जाई. तो रस थंड करुन प्रेसाफिल्टर ‘टेयलर्स फिल्टर’ मधून काढला जाई. त्यानंतर हार्वेच्या ‘ट्रिपल इव्हॅपोरेटर’ मधून त्याचे निर्जलीकरण होई. व्हॅक्युमद्वारे हा पाक उकळवला जाई व साखर तयार केली जाई. शेवटी राहणारी मळी व साखर सेंट्रीफ्युगल मशीनने वेगळी केली जाई. ड्रायरखाली वाळवल्यानंतर ती मागणी प्रमाणे दळली जाई वा स्फटिक स्वरूपात ठेवत. 200 पौंडाच्या पिशव्यांतून ती विकली जाई.

तिरहट कोऑपरेटिव्ह शुगर कंपनी

बिहारमध्ये दरभंगा जिल्ह्यातील रैयाम येथे सी. आर. क्लेयटन डॉबेनी यांनी 1914 साली साखर कारखाना उभारला. तिरहट को. ऑपरेटिव्ह शुगर कंपनी लि. असे तिचे नाव होते. तिने 180 चौ. मीटर मैल जागा व्यापली होती. ऊस, तांदूळ, गहू, बार्ली ही पिकेही घेतली जात. कानपूरला कारखान्याचे कार्यालय होते. भागभांडवल रु. 4.00 लाख, डिबेंचर्स रु. 3.00 लाख होते. मे.वेग सुथरलँड, कानपूर या कंपनीकडे व्यवस्थापन होते.
‘भुरी’ जातीचा ऊस 5000 एकर जमिनीवर लावला जायचा. त्यातील 400 टन मे.क्लेटन-डॉबेनी यांचा स्वतंत्र ऊस होता. यातून 10 टन एकरी उत्पन्न निघे. 400 टन प्रतिदिन गाळप क्षमतेची आधुनिक मिल मे. मीरली वॅटसन कं. ग्लासगो यांनी उभारली होती. 1 डिसेंबर ते 31 मार्च असा हंगाम घेतला जाई. हंगामात 25 टन साखर दररोज काढत असत. चुनारमधून लाईमस्टोन यासाठी आणला जाई.
स्वदेशी पद्धतीने साखर पूर्णपणे बनवली जाई. हाडे किंवा तत्सम निषिद्ध वस्तूंचा उपयोग साखर तयार करताना केला जाणार नाही, अशी कंपनीने गॅरंटी दिली होती. कारखान्यांनी दोन फुटाची नॅरो गेज रेल्वेलाईन शेतातून कारखान्यास ऊस आणण्यासाठी वापरुन 14 किमी अंतरावरील मोकादमपूरकडे जाणारी एक लाईन टाकली, तिचा वापर 1994 सालापर्यंत होत होता. दुसरी दरभंगा भावतिहाईकडे जाणारी लाईन Sakristalford- Barn रेल्वेची होती.
1914 सालांत ‘लोहात’व ‘रैयाम’साखर फॅक्टरी दरभंगा जिल्ह्यात तर लौरिया (Lauriya) साखर कारखाने पश्चिम चंपारण भागात सुरू झाली. सिवन (Siwan) व समशेरपूर जिल्ह्यांत अनुक्रमे 1918 व 1920 सालात साखर कारखाने उभे राहिले. 1929 सालानंतर कारखान्यांना साखर उत्पादनास अडचणी येऊ लागल्या.
फ्रेंचांनी त्या काळी आपली भारतातील वसाहत ओरिसामध्ये गंजाम जिल्ह्यात अस्का येथे सन 1824 सालामध्ये साखर’फॅक्टरी उभारली होती. प्रथमत: या कारखान्याची गूळ उत्पादनासाठी युनिट म्हणून स्थापना झाली होती. नंतर साखर कारखान्यात रूपांतर करण्यात आले.
सन 1846 सालामध्ये जर्मनीवरुन आधुनिक तंत्रज्ञान आणून साखर कारखान्याचे पूर्णत: आधुनिकीकरण करण्यात आले होते. जेम्स फ्रेडरिक विवियन मिनचिन यांनी या खासगी मालकीचा साखर उद्योग सांभाळला. 1904 सालामध्ये या फॅक्टरीतून होणारे साखर उत्पादन थांबले.
सन 1836 नंतर साखर उद्योगात लक्षणीय बदल झाला. जॉर्ज वॅट (1889) त्यावेळी म्हणतात की, ङ्गसध्या भारतात 12 मोठे आणि 81 छोटे साखर कारखाने आहेत. त्यामध्ये रु. 28.26 लाख रुपयांची गुंतवणूक असून, वार्षिक उलाढाल रु. 54.60 लाख रुपयांची आहे. पॅरी आरी कंपनीने दोन कारखाने एक नलिकुप्पम आणि दुसरा तिरुकेनानल्लुर येथे दक्षिण अर्कोट जिल्ह्यात आहेत. नलिकुप्पम कारखान्यात 560 लोक आणि तिरुकेनानल्लुर येथे 169 लोक कामाला आहेत.
मुंबई राज्यात पुणे येथे एक रिफायनरी आहे. शहाजानपूरमध्ये सर्वात मोठी ‘रोझा शुगर फॅक्टरी’ असून तिच्यात रु. 16 लाख गुंतवणूक आहे. त्यामध्ये 1015 लोक काम करतात आणि वार्षिक उलाढाल रु. 10,06,557/- आहे.
भारतीय कारखान्यांमध्ये 4500 कायम आणि 6000 हंगामी कामगारांना काम मिळाले आहे. मोठ्या कारखान्यांना रमचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. भारतातील रिफायनरींना परदेशातून आयात होणार्‍या बीट साखरेशी स्पर्धा करावी लागत असून रमचे कॉन्ट्रॅक्ट नसलेल्या छोट्या रिफायनरीज तोट्यात गेल्या आहेत.
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे द बेग, सुदरलँड व कंपनी यांनी सन 1874 सालात स्थापन केलेली कानपूर शुगर वर्क्स ही अत्याधुनिक स्वरुपाची पहिल्या फळीतील फॅक्टरी मानली जाईल. या कारखान्यात सुरुवातीला गुळाच्या गोल ढेपा, ज्याला ‘भेली’ म्हणत त्या तयार होत होत्या.
पूर्व विभागात प्रताबपूर (Partabpore) कंपनीचे ‘भैरवा’ युनिट हे प्रतापपूर येथे 1903-04 सालात सुरु झाले. सुदरलँड कंपनीकडून चालवली जात होती. तिच्यामध्ये अनेक प्रकारचे परिणाम मापणारे इव्हॅपोरेटर्स व व्हॅक्युम पॅनचा वापर केला होता. सुरुवातीच्या काळात या कारखान्यातून नीळ तयार करण्यात येत होती. त्यानंतर साखर उत्पादनासाठी तीचा वापर करण्यात आला.
एडवर्ड कँपवेल यांनी त्रिचनापल्ली येथे तत्कालीन मद्रास राज्यात सन 1915 साली साखर कारखाना सुरु केला; परंतु तो साखर कारखाना चालला नाही. रॉबर्ट कँपवेल यांनी तेथेच साखर कारखाना सुरु करुन यशस्वीरित्या चालवला. साखर कारखाना चांगला चालवायचा तर साखर कारखान्याच्या मालकीचे शाश्वत उसाचा पुरवठा करणारे कारखान्याच्या मालकीचे उसाचे मळे असले पाहिजेत हे मत त्यांनी नोंदवले होते. या साखर कारखान्यात दरवर्षी 300 मे.टन साखरेचे उत्पादन होत होते.
ऊस उत्पादनवाढीबाबत सुरुवातीच्या काळात झालेली संशोधने :
गंगा-यमुना खोर्‍यात तयार होणार्‍या पारंपरिक पद्धतीच्या जंगली जाती सुरुवातीस साखर तयार करण्यासाठी वापरल्या जात. या जातींचा उतारा जगातील उष्णकटिबंधीय देशात तयार होणा-या ऊसाच्या तुलनेत कमी असे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होऊन पुरेसे न पडल्याने आवश्यकतेनुसार जावा मधून साखरेची आयात 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत होत होती.
पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्यावेळेस अन्न उत्पादनात भारताने स्वयंपूर्णता करणे हे स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे हे ओळखून साखर, प्रथिने, कार्बोदके मधील स्वयंपूर्णता यासाठी शास्त्रज्ञांना पीक संशोधन करण्यास प्रोत्साहित केले. कुपोषित नागरिक व मुले यांच्यासाठी तरी साखरेचे उत्पादन जास्त झाले पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्याला प्रतिसाद म्हणून 1912 साली ऊसजाती संशोधनासाठी ऊस संशोधन केंद्र कोईमतूरची स्थापना सालात करण्यात आली.
जागतिक पिकांच्या जातीचे प्रसिद्ध संकरक शास्त्रज्ञ डॉ. सी. ए. बार्बर यांनी तेथे सुरुवातीच्या काळी ऊसाच्या विविध जातींचे संकरणावर प्रयोग केले. पहिली उसाची संकरित जात CO–205 तयार केली. जंगली जातींचा संकर करुन तयार झालेला हा पहिला संकरित वाण म्हणता येईल. तिची लागवड 1918 सालात पंजाबात केली. यामुळे 60% पीकात वाढ व उतार्‍यात वाढ होऊन पुढील 6-7 वर्षात संपूर्ण पंजाबात या जातीने जुन्या उसाच्या जातींची जागा घेतली. डॉ. बार्बर व त्यांचे सहकारी सर टी. एस. वेंकटरमण यांनी ऊसबियाणांवर भरपूर प्रयोग केले. 1933 सालात CO–419 ही नवीन सुधारीत जात तयार झाली. 1949 सालात CO–740 व CO–1148 प्रसृत झाली. त्यानंतर अनाकापल्ले, कुडलोर, पाडेगाव, शहाजहानपूर, सिरोही, पुसा, समस्तिपूर, जालंधर व लखनौ ही ऊस संशोधनकेंद्रे उभी राहिली. या ऊस संशोधन केंद्रात संशोधने होत राहिली व नवनवीन जाती व वाणांचे उत्पादन होत राहिले.
सन 1900 पासून भारतात आधुनिक साखर उद्योगाचा विकास झाला. स्वातंत्र्यपूर्व बिहारमध्ये 33 साखर कारखाने होते. त्यांची संख्या नंतर घसरत 28 वर आली त्यातील 11 कारखाने चालू राहिले, तर 17 बंद पडले. राहिलेल्या 11 मिल्स खासगी उद्योगपतींनी चालवायला घेतला. आधी निळीचे मळे बिहारमध्ये होते. त्यानंतर उत्तर बिहारमध्ये साखर कारखाने सुरु झाले. सन 1784 ते सन 1914 या काळात फक्त 18 साखर कारखाने स्थापन झाले होते. पहिल्या महायुद्ध काळात 18 साखर कारखाने स्थापन झाले होते. पहिल्या महायुध्द काळात साखर उद्योगाच्या विकासाचा वेग कमी झाला. मार्च 1916 मध्ये 10 टक्के, मार्च 1921 मध्ये 15 टक्के, मार्च 1922 मध्ये 25 टक्के अशी साखर आयात शुल्कात वाढ झाली. सन 1930 मध्ये साखर कारखान्यांची संख्या 21 होती. 29 जानेवारी 1931 रोजी सादर केलेल्या ‘टॅरिफ बोर्ड रिपोर्ट’ मध्ये साखर उद्योगाला संरक्षण द्यावे व हे संरक्षण 15 वर्षे देण्यात यावे, अशी शिफारस होती. त्याचा परिणाम सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतीय साखर उद्योगाला संरक्षण दिले. त्यामुळे भारतीय साखर उद्योगाच्या विकासाला चालना मिळाली.

प्रश्न – स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात साखर उत्पादन अन् उद्योग याबद्दल काय सांगाल ?

मंगेश तिटकारे – श्रीरामपूर या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा तालुक्याचे पूर्वीचे नाव बेलापूर होते. हरेगाव हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी ब्रॅन्डी कंपनीने दि बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड नावाचा साखर कारखाना इ.स. 1917 साली खासगी क्षेत्रात सुरू केला. हा कारखाना मुलत: ब्रिटिशांनी (Brandy Brandy Group) उभारला होता. मि. हॅरिसन हे या कारखान्याच्या संस्थापकांपैकी होते. त्यांच्या नावावरून सदर गावाला सध्याचे नाव हरेगाव पडले.

कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात होते. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्टयावर हजारो एकर जमीन घेतली व 22 एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला साखर कारखाना म्हणता येईल. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसे प्रकल्प हरेगाव येथे कारखान्यामार्फत 1940 पासून सुरू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. या कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक हे लोकमान्य टिळकांचे नातू के. के. महाजन होते.

महाराष्ट्रात सहकारी क्षेत्रात साखर कारखाना उभारण्याची कल्पना 1912 मध्ये श्री. हिरेमठ व श्री. सहस्त्रबुध्दे यांनी मांडली. सहकारी क्षेत्रात साखर कारखाना उभारण्याचे काम सहकार तज्ज्ञ लल्लुभाई सामळदास व श्री. सहस्त्रबुध्दे यांनी 1918 सालामध्ये केले आणि ‘दि निरा व्हॅली सहकारी साखर कारखाना’ पुणे जिल्ह्यातील बारामती येथे स्थापन झाला; परंतु ऊसाच्या कमतरतेमुळे हा कारखाना सन 1924 मध्ये बंद पडला.

सन 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने साखर कारखानदारीस कर विषयक संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळाले. 1932 च्या कायद्याचा आधार घेऊन सहकाराच्या तत्वावर भारतात 1933 साली चार साखर कारखाने सुरू झाले.
आंध्र प्रदेशात इरिकोपड्डा येथे रावबहादूर सी. व्ही. एस. नरसिंहराव यांनी सहकारी तत्वावरील साखर कारखाना स्थापन केला. त्यावेळी त्याची गाळप क्षमता 75 टन ऊस प्रतिदिन होती. हा कारखाना आजही सुरू आहे. दुसरा कारखाना बिस्वान, उत्तर प्रदेश येथे स्थापन झाला पण चालला नाही. त्यानंतर फलटण, कोल्हापूर व रावळगाव येथे तीन आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात बेलवंडी येथे, सोलापूर जिल्ह्यात अकलूजजवळ माळीनगर येथे तसेच अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर टिळकनगर येथे तीन असे सहा साखर कारखाने निघाले.

वालचंद समूहाने 1933 साली रावळगाव शुगर फार्मची स्थापना केली व 7 वर्षानंतर गोळ्या, चॉकलेट हे साखरेवर आधारीत कन्फेक्शनरी युनिट सुरु केले व त्यातूनच ’रावळगाव’ ब्रँड प्रसिद्ध झाला.

दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगर :

माळी समाजातील सासवडच्या कर्तृत्वसंपन्न मंडळींनी 1932 साली सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथे कारखाना उभारला. 1931 साली 17 जणांचे नियामक मंडळ तयार करून कामाची सुरवात झाली. 9 नोव्हेंबर 1932 ला दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ( The Saswad Mali Sugar )

गणपतराव रासकर, सोपानराव गिरमे, भाऊसाहेब राऊत यांची एक समिती स्थापन करून अकलूज येथे एक छोटेसे ऑफिस उघडले, तर एक घोंगडी व लिखाणाचे सामान असलेल्या या ऑफीसमध्ये रोज लोकांना भेटायचे, जमिनी खंडाने मिळवायच्या. हे काम त्यांनी न दमता न थकता केले. रायचंद भाईचंद यांनी आपली 40 एकर जमीन साखर कारखान्यासाठी दिली. या परिसरात बेणे नसल्याने ई.के. जातीचे बेणे कोपरगाव, बेलापूर येथून आणण्याचे ठरवले. बेणे इथपर्यंत कसे आणायचे? हा मोठा प्रश्न होता. रेल्वेने भिगवण, कुर्डुवाडी येथे बेणे आणायचे व तेथून बैलगाडीने आणायचे, असा पर्याय निवडला.

इंग्लंड च्या फॉसेट प्रेस्टन कंपनीला 1933 सालामध्ये ऑर्डर देण्यात आली. लिव्हरपूल कंपनीकडे कारखान्याची जमीन सर्व गहाण ठेवावी लागली . 2 फेब्रुवारी 1934 सालामध्ये गहाणखत करार झाला. मशिनरी इंग्लंड वरून जहाजाने भारतात आली व तेथून कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आली. पण साईटवर मशीनरी कशी न्यायची हा मोठा प्रश्न होता. कारण दळण वळणाची साधने नव्हती. रस्ते नव्हते, नीरा-भीमा नदीवर पूल नव्हते. वाहन व्यवस्था नव्हती मनुष्यबळ नव्हते. तरीही प्रतिकूल परिस्थितीत साईटवर मशीनरी आली. कारखाना विश्वेश्वरय्या या जगविख्यात वास्तुविशारदाच्या मदतीने उभा राहिला.
शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी उभारलेला पहिला कारखाना, नव निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून सासवड गावामधून निघालेल्या शेतकर्‍यांनी कारखाना उभा केला. 1934 -35 या वर्षात पहिला हंगाम घेतला.

बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि. व श्रीपूर साखर कारखाना

सन 1933 साली मुंबई राज्याचे गर्व्हनर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी देशांतर्गत साखर तयार करण्यासाठी प्रोत्साहन देऊन, त्या काळात मॉरिशस वरुन आयात होणार्‍या साखरेवर आयातकर लावला. त्याचा फायदा घेऊन उद्योगपती स्व. चंद्रशेखर आगाशे यांनी (सन 1888-1956) बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि. ची स्थापना 1934 साली केली आणि बोरगाव, ता. माळशिरस येथे दोन हजार एकरावरील शेतीस ऊस लागवडीस प्रोत्साहन दिले. सुरुवातीला 1200 एकरचा फार्म लँड घेतला, सिंडिकेटचे कार्यालय लक्ष्मीरोड, पुणे येथे उघडले.

डेक्कन मधील बर्‍याच संस्थानात जाऊन भागभांडवल जमा केले. 1937 साली साखर कारखाना उभा करण्यासाठी स्कोडा कंपनीची मशिनरी झेकोस्लोव्हाकियामधून आणली. दुसर्‍या महायुध्दापुर्वीचा तो काळ होता. युध्द सुरु होण्यापुर्वी मशिनरी हिंदुस्थानात पोहोचली. त्यांनी 1939 साली बोरगावामध्ये साखर कारखान्याची उभारणी केली. 1940 साली ‘श्री’ या ट्रेडमार्कवर साखर पोती उत्पादित केली. कारखान्याच्या परिसराचे नाव श्रीपूर असे ठेवले. त्यांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीस देणगी देवून बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स उभारण्यास मदत केली.
महाराष्ट्र मंडळास देणग्या देऊन पुण्यात शाळांची उभारणी केली. 1947 साली 1000 टनी कारखान्याची उभारणी त्यांनी केली. 1956 मध्ये त्यांच्या निधनानंतर, त्यांचे सुपुत्र पंडितराव आगाशे व ज्ञानेश्वर आगाशे यांच्या अधिपत्याखाली 1970 साली श्रीपूर येथे डिस्टिलरी सुरु केली. 1988-89 साली सुधाकरपंत परिचारक यांनी या जॉइंटस्टॉक कंपनी कारखान्याचे सहकारीकरण करुन त्याचे नामकरण श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना असे केले.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात पुणतांबा, राहता येथे श्री चांगदेव शुगर मिल्सची 1939 सालात उभारणी झाली. त्याच दरम्यान बेलवंडी शुगर फार्म प्रा.लि. नावाने श्रीगोंदा तालुक्यात दोन स्वतंत्र युनिट्स सुरु झाले. महाराष्ट्र शुगर मिल्स हा उद्योग टिळकनगर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात 1933 सालात सुरु झाला. उद्योगपती श्री. बाबासाहेब तथा महादेव एल. डहाणूकर यांनी तो कारखाना सुरु केला. लोकमान्य टिळकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हा साखर कारखाना सुरु झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ इंडस्ट्रीजच्या स्थळाचे नाव टिळकनगर ठेवले. 1987 सालापर्यंत हा साखर कारखाना सुरू होता. त्यानंतर साखर उत्पादन बंद करुन टिळकनगर डिस्टिलरीज व इंडस्ट्रीज या नावाने अल्कोहोल व भारतीय बनावटीची परदेशी दारू (I.M.F.L) उत्पादन सुरू राहिले.

गोदावरी शुगर मिल्स, लक्ष्मीवाडी व साकरवाडी हे साखर उद्योग कोपरगाव तालुका अहमदनगर येथे 1939 सालात उद्योगपती के. जे. सोमैया यांनी सुरु केले.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी हा कारखाना पुण्यातील उद्योगपती श्री. आपटे यांनी 1930 साली सुरू केला. सन 1939 च्या दरम्यान साखरवाडी व शिरपूर येथे तर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात सन 1941 मध्ये चांगदेवनगर व लक्ष्मीवाडी येथेही साखर कारखाने कार्यरत झाले होते.

न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी, जि. सातारा

सन 1933-34 साली ‘दि फलटण शुगर वर्क्स लि.’ या नावाने कै. वामनराव उर्फ तात्यासाहेब आपटे यांनी कारखान्याची स्थापना केली. मे. आपटे, मफतलाल व कांतीलाल यांनी रुपये 10 लाख भाग भांडवलावर या कारखान्याची स्थापना करुन पहिला गळीत हंगाम 9 फेब्रुवारी 1934 रोजी सुरु केला. सुरुवातीला डंकन स्टुअर्टस् ग्लासगो या कंपनीने 400 मे. टन प्रतिदिन गाळप क्षमतेने स्टीम इंजिनद्वारा कारखाना सुरु केला. त्यावेळी कारखान्याकडे स्वत:ची जमीन व रेल्वे लाईन होती. 1950 मध्ये एक मिल व बॉयलर वाढवून गाळप क्षमता 800 मे. टन प्रतिदिन करण्यात आली.

लॉर्ड कर्झन
Imperial ­Agricultural Reaserch Institute (I.A.R.I.) चा इतिहास : –

ब्रिटिश भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी 01 एप्रिल, 1905 रोजी बिहार राज्यात समस्तीपूर येथे सर्वात मोठ्या कृषी संशोधन केंद्राची कोनशिला ठेवली. 1350 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर ही इन्स्टिट्यूट लॉर्ड कर्झन यांनी स्वत: लंडनमध्ये परवानगी मिळवून उभी केली. त्यासाठी त्यांनी व त्यावेळी अमेरिकेतील शिकागो येथील त्यांचे नातेवाईक व मित्र हेन्री फीफस (Mr. Henry Phipps)) यांचेकडून 30,000 डॉलर देणगी मिळवून मोठ्या खटपटीने उभारली.
‘पुसा’ हे या विभागाचे नाव Phipps of U.S.A­. (PUSA) असे संक्षिप्त झाल्याची ही हकीकत आहे. देशातील कृषी विकासासाठी या संस्थेचे अवाढव्य योगदान आहे. लॉर्ड कर्झन व्हाईसरॉयमुळे भारताच्या कृषी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून त्यानंतर देशात सबोर (बिहार), नागपूर (मध्य प्रांत), कोईंमतूर (मद्रास इलाखा) लायलपूर (तत्कालीन मध्य पंजाब) अशी 4 कृषी महाविद्यालये व संशोधन केंद्रे स्थापन होऊ शकली. या सर्व संस्थांची ऊस विकासासाठी व संशोधनासाठी मोठी मदत झाली.

1911 सालामध्ये या संस्थेचे ‘इंपेरियल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’ असे नाव ठेवले गेले. 1934 सालात तेथे आलेल्या भूकंपात संस्थेची इमारत उद्ध्वस्त झाली. त्यानंतर ही संस्था 1936 मध्ये नवी दिल्ली येथे हलविली गेली. तेथे तिचे कार्य 7 नोव्हेंबर, 1936 पासून सुरु झाले. IARI चे नवी दिल्ली मध्ये स्थलांतर झाल्यानंतर मुझफ्फरपूर येथील सेंट्रल शुगरकेन रिसर्च स्टेशन हे समस्तीपूर येथील पुसा या ठिकाणी 1936 मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. सध्या ती बिहार राज्य शासनामार्फत चालवली जाते. 1970 सालात डॉ. राजेंद्रप्रसाद अ‍ॅग्रीकल्चरल युनिर्व्हसिटीची स्थापना झाल्यानंतर त्या विद्यापीठाचा ही रिसर्च इन्स्टिट्यूट (एक विभाग) म्हणून कार्यरत आहे
.
शेठ वालचंद हिराचंद

शेठ वालचंद हिराचंद अर्थात श्री. वालचंद हिराचंद दोशी हे भारतीय उद्योगपती आणि वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. ग्रुपचे संस्थापक. त्यांनी भारतात पहिली विमान बनविण्याची फॅक्टरी, पहिली कार फॅक्टरी, पहिले आधुनिक शिपयार्ड बनविले. बांधकाम कंपन्या, ऊस संशोधन केंद्रे व साखर कारखाने, कन्फेक्शनरीज इ. नवनवीन उद्योग स्थापन केले. त्यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीजची स्थापना सन 1908 सालात केली.

सुरुवातीला इंडस्ट्रीज मार्फत मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड करण्यात आली. त्यांनंतर साखर उद्योगात लागणारी अवजड मशिनरी, प्लास्टिक वस्तू, सिमेंट प्लँट, पेपर व पल्प प्लँट, वॉटर ट्युब निर्मिती सुरू केली. सध्या या कंपनीकडून बॉयलर्स, टर्बाइन्स, सैन्य व वायुदलाला लागणारे सामरिक साहित्य बनविण्यात येते. भारताची पोखरण येथील अणुस्फोट चाचणीसह देशाच्या संशोधन व अंतराळ संशोधनातही वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. ने हातभार लावला आहे.

त्यानंतर सन 1930 मध्ये वालचंदनगर येथे वालचंद उद्योग समूहाने दुसरा कारखाना सुरु केला. रावळगाव शुगर्सची स्थापना त्यांनी सन 1933 साली केली. या कारखान्यातून गोळ्या, चॉकलेट बनविण्याचा विभाग त्यांनी 1942 सालात स्थापन केला. देशातील कन्फेक्शनरी उद्योगातील तो सर्वात प्रसिध्द व मोठा ब्रँड आहे.

त्यांनी 1945 सालात कार बनविणारी प्रिमीयर ऑटोमोबाईल कंपनीची स्थापना केली. सन 1949 सालात पहिली कार कंपनीतून बाहेर पडली. सन 1955 सालात फियाट कंपनी बरोबर सहभागातून प्रसिध्द पद्मिनी प्रिमीअर कार बाजारात आणल्या. स्वातंत्र्यावेळी भारतात असलेल्या टॉप 10 उद्योगात वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. चा समावेश होता. दि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व ग्रीकल्चरचे सन 1927 ते 38 या कालावधीत सलग 11 वर्षे अध्यक्ष होते.

त्यांनी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन व इंडियन शुगर सिंडिकेटची स्थापना करण्यात खूप मोठी मदत केली. त्यांनी डेक्कन शुगर फॅक्टरीज असोसिएशन व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनची स्थापना करण्यात आपले वडीलबंधू शेठ लालचंद हिराचंद यांच्या सहकार्याने मोठा पुढाकार घेतला.

आधुनिक व बलशाली स्वदेशी साखर उद्योगाचा भारतात पाया घालणारे शेठ वालचंद हिराचंद दि. 8 एप्रिल 1953 रोजी सिध्दपूर, गुजरात येथे कालवश झाले. त्यांचे साखर उद्योगातील योगदान अविस्मरणीय आहे.

के. जे. सोमैया यांचे योगदान

K J Somaiya
करमशीभाई जेठाभाई (के. जे.) सोमैया यांचा जन्म 16 मे 1902 रोजी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या मालुंजर या गावात झाला. सन 1939 साली सोमैया यांनी दोन साखर कारखान्यांची स्थापना केली. त्यातील एक कोपरगाव तालुक्यात साखरवाडी येथे होता, तर दुसरा लक्ष्मीवाडी येथे होता. श्रीरामपूर येथील श्री. काठोड यांचेशी भागीदारीच्या व्यवसायात सुरू केलेल्या साखरेच्या व्यापारात जम बसवल्यानंतर श्री. क. जे. सोमैया यांनी साखरेचं उत्पादन करण्याचा विचार केला.झेकोस्लोव्हाकियाच्या स्कोडा कंपनीकडून 36 टनी साखरेसाठीची यंत्रणा मागवण्यात आली. सुरूवातीला दिवसामागे 100 टन ऊसाचा गाळप करण्यासाठी कारखाना उभारावयाचा त्यांनी ठरविले. पण शेवटी विचार करून त्यांनी अशी यंत्रणा विकत घेतली ज्यामुळे दिवसाकाठी 400 टन उसाचा गाळप होऊ शकतो.

खरं तर या यंत्रणेच्या खरेदीसाठी मोठी रक्कम लागणार होती. त्यापैकी 7 लाख रूपये काठोड कुटुंबियांकडून उभे करण्यात आले. मात्र त्याच वेळी दुसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडली. त्यामुळे व्यापार थंडावला. मात्र सुदैवाने ऑर्डर केलेली यंत्रणा दुसरं महायुद्ध सुरू व्हायच्या आधीच मुंबई बंदरात पोहोचली. यंत्रसामुग्री बंदरात आल्यानंतर हा माल ताब्यात घेण्यासाठी लागणारे 10 हजार रूपयेही सोमैया यांच्याकडे नव्हते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. योगायोगाने अगदी त्याचवेळी गोदावरी साखर कारखान्याचे ऋणपत्र (डिबेंचर्स) घेण्यासाठी नेपाळच्या राजांनी पाठवलेला 10 हजार रूपयांचा धनादेश आला. त्यानंतर 1 जून रोजी दि गोदावरी शुगर मिल्सची स्थापना झाली.

महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीच्या किनारी 1940 साली साखर कारखाना स्थापन करण्यात आला आणि तेथून साखरेच्या उत्पादन तसेच विक्रीला सुरूवात झाली.

कोपरगाव तालुक्यात लक्ष्मीवाडी येथे 1941 साली दुसरा साखर कारखाना सुरू करण्यात आला. कालव्याच्या पाण्याचा सिंचनासाठी वापर करता येऊ शकतो हे शेतकर्‍यांना पटवून देण्यात सोमैया यांना यश आलं. महाराष्ट्रातल्या साकरवाडी इथे 1947 साली दीड हजार गॅलनची क्षमता असणारी भट्टी सुरू करण्यात आली. कंपनीकडून महाराष्ट्रात तसेच 1960 सालाच्या उत्तरार्धात उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथे इथेनॉलचं उत्पादन सुरू झालं. त्याचबरोबर रसायननिर्मितीमध्ये इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करण्याचा पाया कंपनीने भारतात रचला.

ज्या काळात मळीचा निचरा करणं ही एक समस्या होती, त्याकाळात म्हणजे 1950 मध्ये त्यांनी मळीपासून इथेनॉल निर्मितीला सुरूवात केली. 1960 च्या पूर्वार्धात त्यांनी औद्योगिक रसायनांसाठी इथेनॉलचा कोळशाप्रमाणे वापर करण्याच्या प्रक्रियेचा पाया रचला. सन 1939 मध्ये सुरू झालेल्या गोदावरी साखर कारखान्यातूनच गोदावरी बायोरिफायनरीजची निर्मिती सन 2009 मध्ये झाली. दिवंगत (पद्मभूषण) श्री. करमशीभाई जेठाभाई सोमैया आणि त्यांचे पुत्र डॉ. शांतिलाल करमशीभाई सोमैया यांच्या प्रयत्नातून 1939 मध्ये सुरू झालेल्या या कारखान्याने गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक विकासामध्ये गेल्या सात दशकांपासून योगदान दिलेलं आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading