कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला केली रवाना
कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना केली आहे. हे ज्यूस जीआय मानांकित पुरंदरच्या अंजिरांपासून तयार करण्यात आले आहे. अपेडाचे अध्यक्ष अजिंक्य देव यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी जर्मनी मधील हॉलंड मार्गे जाणाऱ्या या ज्यूसच्या पहिल्या ऐतिहासिक शिपमेंटला सर्व भागधारकांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला. या शिपमेंटमुळे जागतिक स्तरावर भारताच्या अद्वितीय कृषी उत्पादनांना चालना देण्यात एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
नवी दिल्लीमधील ग्रेटर नोएडा येथील अपेडाच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या SIAL 2023 या काय्रक्रमात अतिशय नाविन्यपूर्ण अशा अंजीर ज्यूसच्या निर्मितीचा प्रवास सुरु झाला. यावेळी उपलब्ध आंतरराष्ट्रीय व्यापार संधींमुळे या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत प्राथमिक प्रवेश करण्याचा मार्ग मिळाला. पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने तयार केलेल्या अंजिराच्या ज्यूसने या समारंभात सर्वांचे लक्ष तर वेधून घेतलेच शिवाय पुरस्कार देखील मिळवला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तयारीनिशी उतरण्याची क्षमता सिद्ध केली.
या उत्पादनाचा विकास आणि निर्यातीसाठी अपेडाचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. 2022 मध्ये हॅम्बर्गला केलेल्या पुरंदरच्या जी आय मानांकित ताज्या अंजिराच्या पहिल्या निर्यातीनंतर अपेडाने या अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत कायम संपर्क ठेवून काम केले आहे. या उत्पादनाला तात्पुरते पेटंट मिळाले असून यातून कृषी क्षेत्रातील नवोन्मेष दिसून येतो.
इटलीतील रिमिनी येथे मॅकफ्रूट 2024 मध्ये अपेडाच्या सहाय्याने अंजीराचा रस ठेवण्यात आला होता आणि त्याचा जागतिक स्तरावर आणखी विस्तार केला गेला. या उपक्रमाला खरेदीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पोलंडमधील व्रोक्लॉ येथील एमजी सेल्स एसपीने याबाबत चौकशी केली ज्यामुळे ही महत्त्वपूर्ण निर्यात शक्य झाली.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय कृषी उत्पादनातील क्षमतेचे दर्शन घडतेच शिवाय कृषी निर्यातीच्या मूल्यवर्धनामध्ये संशोधन आणि विकास यांचे महत्व अधोरेखित होते. या कामगिरीमुळे भारतीय कृषी उत्पादनांची क्षमता दिसून येते आणि शाश्वत कृषी पद्धती आणि निर्यातीला चालना देण्यात कृषी उत्पादन संस्थांची महत्वपूर्ण भूमिका देखील अधोरेखित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.