October 6, 2024
Honey Village Patgaon brand inauguration
Home » Privacy Policy » मधाचे गाव पाटगावचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात
काय चाललयं अवतीभवती

मधाचे गाव पाटगावचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात

“पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार -पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • “हनी पार्क” व ‘मधाचे गाव पाटगाव’ कमानीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमीपूजन
  • ‘पाटगाव हनी ब्रँड’ आणि ‘हनी चॉकलेट’चे अनावरण

कोल्हापूर : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करुन “पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

“मधाचे गाव पाटगाव”चा लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाटगाव येथे झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत, इंडोकाऊंट फाउंडेशनचे संदीप कुमार, जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक संदेश जोशी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रवर्तक अविनाश पाटील, पाटगावचे सरपंच विलास देसाई यांच्यासह मठगावच्या सरपंच निशा संकपाळ, शिवडाव- प्रणाली तवटे, अंतूर्ली- रामदास देसाई, तांब्याची वाडी- बाजीराव कांबळे आदी उपस्थित होते.

पाटगाव येथे भव्य “हनी पार्क” व “सामुहिक सुविधा केंद्र” तयार करण्यात येणार आहे. या “हनी पार्क” चे व ‘मधाचे गाव पाटगाव’ कमानीचे भूमीपूजन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बी – ब्रीडींगचे प्रशिक्षण घेतलेल्या 100 मधपाळांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा नियोजन समिती, खादी व ग्रामोद्योग मंडळ व इंडोकाऊंट फाउंडेशन यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या 1200 मधमधपेट्यांचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.

यावेळी ‘पाटगाव हनी ब्रँड’ आणि ‘हनी चॉकलेट’चे अनावरण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. मध उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर शहरात एक वर्ष मोफत दुकानगाळा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आदित्य बेडेकर यांचा मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “दर रविवारी मध वारी” या सहलीचे अनावरणही यावेळी करण्यात आले. यावेळी “मधाचे गाव पाटगाव” वर तयार केलेली ध्वनीचित्रफित (थीम साँग) दाखवण्यात आली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पाटगाव परिसरात पिढ्यानपिढ्या मधउद्योग केला जात आहे. या भागात शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि दर्जेदार मध उत्पादन होण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मध उत्पादक शेतकऱ्यांनी मध उत्पादन व विक्री उद्योगातून सर्वांगीण प्रगती साधावी. पाटगावसह मठगाव, शिवडाव, अंतुर्ली, तांब्याची वाडी या पाचही ग्रामपंचायतींना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी निधीची मागणी केली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रांगणा किल्ला या भागात असून शिवकालीन संत मौनी महाराजांचा मठही पाटगावमध्ये आहे. पाटगाव ते रांगणा किल्ल्याच्या मार्गावर असणाऱ्या पुलाच्या उभारणीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. यामुळे रांगणा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची सोय होईल, असे सांगून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पाटगाव परिसराला भेट देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे या भागातील पर्यटनाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पाटगावसह आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी स्वयंपूर्ण होण्यासाठी पाटगावमध्ये राबवण्यात येणारे विविध उपक्रम महत्त्वपूर्ण असून दिवसेंदिवस हा उपक्रम अधिक सक्षम होईल. या उपक्रमामुळे या भागातील गावे स्वयंपूर्ण होऊन खऱ्या अर्थाने ‘ग्रामविकास’ साधला जाईल, असे मत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

देशातील मधाचे दुसरे गाव पाटगाव आहे. राज्यातील अन्य 7 ते 8 गावे मधाची गावे होण्यासाठी खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. पाटगाव सारखे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो, असे सांगून प्रधानमंत्री यांच्या मन की बात कार्यक्रमात पाटगाव चा समावेश होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. येथील उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, नैसर्गिक साधन संपत्तीने सजलेला आणि ऐतिहासिक व धार्मिक स्थळांनी समृद्ध असणाऱ्या पाटगाव परिसरात वर्षानुवर्षे मधपालन उद्योग केला जात आहे. हा उद्योग शास्त्रशुद्ध पद्धतीने करुन येथील मध जगभर पोहोचवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या योजनेतून 2 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून मध उद्योग व पर्यटनाला चालना देण्यासाठी पाटगाव येथे भव्य हनी पार्क व सामुहिक सुविधा केंद्र तयार करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यामुळे या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मदत होईल.

यासाठी पाटगाव परिसरात सेल्फी पॉईंट, मधमाशीवर आधारित आकर्षक चित्रकाम, दिशादर्शक फलक व माहिती व प्रशिक्षण दालन तयार करण्यात आले आहे. मधपाळांना प्रशिक्षण, त्यांना मधपेट्यांचे वाटप, शास्त्रशुद्ध पद्धतीने मध निर्मिती व विक्रीला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मधमाशी पालन उद्योगाला पूरक असे वृक्षारोपण करण्यात येत आहे. याभागात आतापर्यंत 5 हजार रोपे लावण्यात आली आहेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पाटगाव मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळेच ‘मधाचे गाव पाटगाव’ हे राष्ट्रीय पातळीवर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. भविष्यात “पाटगाव हनी ब्रँड” आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कोणतेही उत्पादन जिल्हा ते राज्य व राज्य ते देशभरात व जगभरात पोहोचवण्यासाठी नाबार्डच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे मत नाबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनिलकुमार रावत यांनी व्यक्त केले. निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. आभार श्रीकांत जौंजाळ यांनी मानले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading