July 22, 2024
Chilli Improved Cultivation Technology
Home » मिरची सुधारित लागवड तंत्रज्ञान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मिरची सुधारित लागवड तंत्रज्ञान

मिरची सुधारित लागवड तंत्रज्ञान

मिरची हे उष्ण कटिबंधीय अमेरिका येथील फळ आहे. मिरचीच्या फळामध्ये अ ब क आणि ई जीवनसत्व आहेत. व यात कॅल्शिअम,फॉस्फरस हि खनिजे असतात. मिरची मध्ये असलेल्या ‘कॅपसायसिन’ नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखटपणा येतो.

डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर
कृषिसमर्पण

दररोजच्या आहारात मिरची ही आवश्यक आहे. बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. महाराष्ट्रातील मिरची खाली एकूण 68 % क्षेत्र नंदुरबार, जळगाव, धुळे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्मानाबाद, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये आहे.

हिरव्या मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात; तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजद्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर प्रथिने, क्षारही असतात. मिरचीच संतुलित आहारात समावेश होतो. मिरचीचा आहाराबरोबरच औषधातही मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या रासायनिक पदार्थामुळे मिरचीला तिखटपणा प्राप्त होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हे महत्वाचे मसाला पीक आहे. अन्नप्रक्रिया उद्योग, तसेच रंगनिर्मितीमध्ये ‘ओलिओरेझिन’चा वापर केला जातो. तसेच मिरचीस परदेशातही चांगली मागणी आहे.

हवामान :-

मिरची पिकास वाढीच्या सुरवातीच्या काळात उष्ण व दमट, तर पक्वता अवस्थेत कोरडे हवामान चांगले मानवते. पावसाळ्यात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फुलांची गळ जास्त होते फुले व पाने कुजतात. मिरचीच्या झाडांची व फळांची वाढ 22-28 अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते. अतिथंड हवामान (दहा सेल्सिअस खाली) मिरचीला मानवत नाही. तापमानातील बदलामुळे फळे आणि फुले गळ मोठ्या प्रमाणात होते. यामुळं उत्पादन कमी होते.

जमिन :

पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये. बागायती मिरचीसाठी मध्येम काळी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन निवडावी. वालुकामय तसेच चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक घेता येते. आम्ल जमिनी मिरची लागवडीसाठी योग्य नसतात. चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा आणि ईसी 0.2 पर्यंत असावा.

सुधारित जाती (वाण) :-

फळांचा रंग, आकार व लांबीनुसार मिरचीच्या भरपूर जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल, कमी बिया आणि घट्ट देठ असलेली मिरचीची जात योग्य असते; तर हिरव्या मिरचीसाठी लांबट, चकाकीयुक्त व आकर्षक हिरवी, फिक्कट हिरवी जात योग्य आहे.

अग्निरेखा फळे मोठी आणि साधारणपणे 11 सेंमी लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, एकरी सरासरी उत्पादन 9 ते 10 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. फुले ज्योती – फळांचे गुच्छ लागतात आणि एका गुच्छात 4-5 फळे असतात. फळांची लांबी 6-8 सेंमी असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. बी जास्त प्रमाणात असते. वाळलेल्या मिरचीचे 10 ते 11 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.

फुले सई –

झाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे 7-8 सेंमी लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात ही जात संकेश्वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.

पुसा ज्वाला :

हे वाण हिरव्या मिरची साठी चांगले असून या वाणाची झाडे भरपूर फांद्या व बुटकी असतात. या वाणाच्या मिरच्या साधारण पणे 10-12 सेंमी लांब असून फळांवर आडव्या सुरकुत्या असतात. कच्च्या फळांची साल हिरवट, पिवळी असते. फळ वजनदार व तिखट असून हिरव्या मिरचीसाठी चांगली जात आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. ही जात ‘बोकड्या’ रोगास मध्यम प्रतिकारक आहे.

पुसा सदाबहार –

या वाणाचे झाडे उंच व पाने रुंद आहेत. बहुवार्षायु जात असून या जातीचा खोडवा (2 ते 3 वर्ष) घेता येतो व दरवर्षी 60 ते 80 क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेता येते. एका गुच्छामध्ये 6 ते 12 आकर्षक लाल मिरच्या येतात. मिरच्या अतितिखट असतात. औषधीसाठी परदेशात भरपूर मागणी आहे. हे वाण रसशोषक किडींना व डायबॅक आणि विषाणूजन्य रोगाला बळी पडत नाही.

पंत सी-1-

झाडे उंच वाढणारी असून रोप लावणीपासून 90 दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. लाल व हिरव्या वाळलेल्या मिरचीच्या उत्पादनाला हे मिरचीचे वाण चांगले आहे. या जातीच्या मिरचीचे फळे उलटी असतात. मिरची पिकल्यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 9-10 सेंमी लांब आहे व साल जाड असते. फळे 7-9 सेंमी लांब व भरपूर तिखट असतात. बोकड्या व मोझॅक रोगाचे प्रमाण कमी असते.

संकेश्वरी-32 –

या जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. झाडे उंच, भरपूर फांद्या असतात. . फुले मोठ्या प्रमाणात असून फळांची लांबी 25 ते 20 सेंमी इतकी असल्याने जमिनीवर टेकतात. फळांची साल पातळ असून बी कमी असते. पिकलेल्या फळांचा रंग गडद तांबडा असून तिखट असल्याने मसाल्यासाठी योग्य जात आहे. साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. जिरायत पिकासाठी योग्य जात आहे. ब्याडगी – साठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सेंमी असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे. या वाणाचा साठवणुकीत फळाचा रंग चांग टिकतो. जिरायत लागवडीसाठी योग्य जात आहे. या जातीची लागवड कर्नाटक राज्यातील धारवाड शिमोगा, चित्रदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते.

एन पी 47 ए –

झाडे बुटकी, झुडपासारखी व पसरणारी असून फळे 10-11 सेंमी लांब व बिया कमी असतात. पहिली फुले 84 दिवसांनी (रोपे लावणीनंतर) लागतात. बागायती मिरचीसाठी योग्य जात असून फुककिड्यांना प्रतिकारक आहे. पिकलेले फळ आकर्षक तांबडे असून तिखटास चांगली आहे.

मुसळेवाडी सिलेक्शन –

फळे मध्यम, ६-७ सेंमी लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन ६ ते ८ क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे.

जी 2,3,4,5 –

या सुधारीत जातींची झाडे बुटकी असतात. मिरचीची लांबी ६-८ सेंमी असून मिरचीचा रंग गर्द तांबडा आहे. हे वाण बुटकी असून या मिरचीच्या जास्त उत्पादन देणारे वाण आहेत. या

काश्मिरी –

ही मिरची अतिशय लाल गर्द, आकार बारीक, कमी तिखट, पोपटी रंगाची व जाड सालीची असते.

दोंडाईचा –

या जातीची झाडे उभी व जोमदार वाढतात. विस्तार इतर जातींपेक्षा मोठा असून फळे लांब व रूड वजनदार असतात. फळांची साल जाड असून फळ देठाकडे रुंद व टोकाकडे किंचीत निमुळते असते. फळांची लांबी ८ ते १० सेंमी असते. या जातीस ‘भावनगरी’ देखील म्हणतात. ही जातही कमी तिखट असते.

देगलूर –

या जातीची फळे लांब व देठापासून एकाच जाडीची असून मध्यम तिखट असतात. मराठवाड्यामध्ये या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

पांडुरणी –

या जातीचे फळे मध्यम लांबीची असून फळे रुंद व मध्यम तिखट असतात. बागायती उत्पादन चांगले मिळत असून विदर्भामध्ये ही जात लोकप्रिय आहे.

एम. एच. पी. १,५ (सुजाता), २,९,१० (सुर्या )-

या महिकोच्या संकरित जाती आहेत. झाडे सरळ वाढणारे व भरपूर फांद्या, गर्द हिरवी पाने असणारी असतात. फळांची लांबी ६ ते ९ सेंमीपर्यंत असते. अधिक उत्पादन व पिकलेली फळे लाल रंगाची व चमकदार सालीची असतात.

अग्नि –

सँडोज कंपनीची जात असून भरपूर तिखट असते. फळे ७ ते ११ सेंमी लांब असतात. अधिक उत्पादन देणारी ही हिरव्या व लाल मिरचीसाठी योग्य जात आहे.

टोमॅटो मिरची –

फळांचा आकार मोठा, लाल असल्याने भरपूर मागणी आहे. कमी तिखट असते. फळांमध्ये बिया कमी असतात. एकरी ८० क्विंटल उत्पादन मिळते.

याशिवाय परभणी टॉल, कोकण क्रांती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी, वैशाली, मैना (निर्मळ), नामधारी, सितारा (सेमिनीस) या सारख्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती लागवडी साठी योग्य आहेत.

बीजप्रक्रिया :-

मिरची लागवडी साठी एकरी 400-600 ग्राम बियाणे लागते. संकरीत जात असेल तर बियाणे कमी लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बनडझीम ( बविस्टिन) 1 ग्रॅम / किलो प्रक्रिया करा. लागवडीआधी रोपांची मुळे 0.5 मिली/ लिटर पाण्याच्या इमिडक्लारोप्रीडच्या द्रावणात बुडवल्याने रसशोषक कीड व रोगापासून बचाव होतो.

पूर्व मशागत :-

मिरचीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत चांगल्या प्रकारे करता येते. खरिपासाठी मे – जूनमध्ये रोपे तयार करून त्यांची जून – जुलैमध्ये पुनर्लागण; रब्बीसाठी सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये रोपे तयार करून ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये पुनर्लागण व उन्हाळी हंगामासाठी डिसेंबरमध्ये रोपे तयार करून त्यांची जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पुनर्लागण करावी. त्याअगोदर जमीन खोलवर नांगरट करून, वखरून तयार करावी. एकरी 4-5 टन शेणखत जमिनीत टाकावे.

लागवड :-

जिरायती मिरचीसाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार करतात व बागायती साठी गादी वाफ्यावर रोपे तयार करतात. मिरचीचे रोपे 30-40 दिवसांनी लागवडीस तयार होतात. लागवडीसाठी 6-7 आठवडे वयाची व 15-20 सेंमी उंचीची रोपे निवडावीत. मिरचीची लागवड सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. लागवडीसाठी चांगल्या दर्जा चे बियाणे वापरावे. उंच व पसरट वाढणाऱ्या जाती साठी लागवड 60 बाय 60 सेंमी अंतरावर आणि बुटक्या वाणाची लागवड 60 बाय 45 सेंमी अंतरावर करावी व कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेंमी अंतरावर करावी.

मिरचीची रोपवाटिका केल्यामुळे पुनर्लागवडीसाठी जमिनीची मशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. हराळी किंवा लव्हाळा असणारी जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये. मिरचीची रोपवाटिका तयार करताना जमीन पाणथळ नसावी. त्या ठिकाणी सावली नसावी. पाणीपुरवठ्याची सोय जवळच उपलब्ध असावी.. गादी वाफ्यावर पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. रोपवाटिकेमुळे पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. हराळी किंवा लव्हाळा असणारी जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये.

रोपवाटिका तयार करण्यासाठी 3 बाय 1 मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. दोन ओळींतील अंतर 8 ते 10 सेंमी ठेवून, एक ते 1.5 सेंमी खोलीवर बियांची पातळ पेरणी करून बारीक मातीने बियाणे झाकावे. बियाण्याची उगवण होईपर्यंत आच्छादन झाकून सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे, त्यानंतर जरुरीप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. नंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळींमध्ये 1 सेंमी खोलीपर्यंत खुरप्याने काकरी पाडून प्रत्येक वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम फोरेट देऊन पाणी द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी प्रति वाफ्यास रोपांच्या जोमदार वाढीसाठी 20 ते 25 ग्रॅम युरिया दोन ओळींमध्ये काकरी पाडून द्यावा आणि मातीने झाकावा. साधारणपणे चार ते पाच आठवड्यांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची उंची जास्त झाल्यास पुनर्लागणीच्या अगोदर शेंडे कापावेत. दरम्यान रोपांना रोग-किडींपासून संरक्षण द्यावे.

रोप लावणीच्या ठिकाणी फुलीवर चिमूटभर थिमेट ठेवून एका ठिकाणी दोन रोपांची पाणी टाकून पुनर्लागण करावी. पुनर्लागणीपूर्वी दहा लिटर पाण्यात 14 मि.लि. नुवाक्रॉन अधिक 25 ग्रॅम डायथेन एम-45 अधिक पाण्यात विरघळणारे गंधक 30 ग्रॅम याप्रमाणे द्रावण करून रोपांचा पानाकडील भाग द्रावणात दोन मिनिटे बुडवून रोपांची पुनर्लागण करावी. मिरची लागवडीसाठी योग्य वेळ माहिती असणे आवश्यक आहे. जिरायती परिस्थितीत रोप लागणीच्या वेळेवरच मिरचीचे उत्पादन अवलंबून असते.

आंतरमशागत :

मिरची हे पीक आंतरमशागतीस चांगला प्रतिसाद देते. त्यासाठी जरुरीप्रमाणे खुरपणी व दोन ते तीन वेळा कोळपणी केल्याने तणांचा बंदोबस्त तर होतोच, शिवाय जमिनीत हवा खेळती राहून मुळांची व झाडांची वाढ चांगली होते. फुले भरपूर लागून फळांची संख्या वाढते. झाडे जमिनीवर लोळू नयेत म्हणून पुनर्लागणीनंतर एक महिन्याने झाडांना कोळप्यांनी भर द्यावी. ऑक्सिफ्लूरोफेंन (गोल, ऑक्सिगोल) 200 मिली /एकर, 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून लागवडीच्या आधी फवारावे. लागवडी नंतर 20-25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2-3 आठवडे नंतर मातीची भर द्यावी.

रोग नियंत्रण :-

भुरी :

भुरी या रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या बाजूस पांढरी भुकटी दिसते व प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडाची पार्ने गळून पडतात. नियंत्रण: भुरी नियंत्रण साठी हेकझाकोन्याझॉ (कॉन्टफ,) + स्टिकर 1 मिली/ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मर रोग :

मर हा रोग मातीतील बुरशीमूळे होतो. रोपाची मुळे सडतात त्यामुळे रोप खाली पडते. नियंत्रण : 10 लिटर पाण्यात 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 टक्के मिसळून व्हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपाच्या मुळा भोवती आळवणी करावी.

फांद्या वाळणे आणि फळे कुजणे :

हा रोग कोलीटोट्रिकम कॅपसीसी या या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भा झालेल्या हिरव्या किंवा लाल मिर्चीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट दिसतात. फळे कुजतात आणि गळून पडतात. या मुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. पहिल्यांदा कोवळे शेंडे मरतात. नियंत्रण : या रोगाचे लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्याचा नायनाट करावा. तसेच डायथेन एम 45 25-30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसाच्या अंतराने 3-4 वेळा फवारावे. बोकड्या (चुरडामुरडा) : हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे, मावा, कोळी, या रस शोषून घेणाऱ्या किडीमुळे होतो. ह्या किडी पानातील रस शोषून घेतात त्यामूळे पानाच्या शिरामधील भागावर सुरकुत्या पडून संपूर्ण पानाची वाढ खुंटते. नियंत्रण : फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील 5% एस सी 15 मिली आणि कोळीच्या नियंत्रणासाठी फेनाक्झाक्वीन 10% ई सी 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कीड नियंत्रण :-

फुलकिडे :

फुलकिडे हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात यालाच आपण बोकड्या किंवा चुरडामुरडा म्हणतो. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त दिसते. नियंत्रण : इमिडाक्लोरोप्रीड 17.8% एस एल 7 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.किंवा फिप्रोनील 5% एस सी 15 मिली 15 लि. पाण्यात मिसळून फवारावे.

कोळी :

मिरच्या पिकावर कोळी आढळल्यास फेनप्रोपॅथ्रीन 30 ई सी 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
प्रत्येक पानावर 6 फुलकिडे आढळल्यास अथवा 10% पेक्षा जास्त झाडांवर प्रादुर्भाव असल्यास तसेच प्रत्येक पानावर 5-10 कोळी आढळल्यास रासायनिक औषध्यांची फवारणी करावी.

लेडी बर्ड बीटलचे संवर्धन करा….

लेडी बर्ड बीटलच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यांच्या पाठीवरील पंखांवर विविध रंगांचे आणि आकारांचे ठिपके आढळतात. या मित्रकीटकाची अळी व प्रौढावस्था मावा, मिली बग, फुलकिडे, कोळी, खवले कीड आदी किडींना खातात.

काढणी व उत्पादन :-

हिरव्या मिरचीची तोडणी :

अडीच महिन्यानंतर तोडणी सुरू होते. पुर्ण वाढलेल्या व सालींवर विशिष्ट चमक असलेल्या फळांची देठासहित 4 ते 6 दिवसांचे अंतराने तोडणी करावी. तोडणीनंतर मिरच्या ताबडतोब पोत्यामध्ये भरून बाजारात पाठवाव्यात. तीन महिन्यापर्यंत तोडणी चालू राहून या कालावधीत मिरचीचे 15 ते 20 तोडे होतात.

तांबड्या मिरचीची तोडणी सुरुवातीचे 1 ते 2 तोडे हिरव्या मिरचीचेकरावेत. त्यामुळे पुढे मिरच्या अधिक लागतात. त्यांनतर लागलेल्या मिरच्या अर्धवट पिकल्यावर तोडाव्यात. त्या मिरचीचे 2 ते 3 दिवस ढीग करून ठेवल्यास अर्धवट पिकलेल्या मिरच्या चांगल्या पिकतात व सर्व मिरच्यांना आकर्षक तांबडा रंग येतो.
सर्वसाधारणपणे बागायती हिरव्या मिरचाचे एकरी 15-20 क्विंटल तर वाळलेल्या लाल मिरचीचे उत्पादन 4 ते 5 क्विंन्टल निघते. कोरडवाहू वाळलेल्या लाल मिरचीचे उत्पादन 2-3 क्विन्टल निघते. हे उत्पन्न जातीनिहाय वेगवेगळे असते.

प्रक्रिया उद्योग :

ज्या वेळेस हिरव्या मिरचीस भाव कमी असतो अशा वेळी हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मिरची पावडर, विविध प्रकारच्या चटण्या करून कुटीरउद्योग सहजरित्या चालवले जावू शकतात. दर्जा, सातत्याने पुरवठा, मार्केटचा अभ्यास, विविध प्रक्रिया व पुरक उत्पादनांची प्रयोगशीलता साधल्यास आखाती व युरोपीय देशात विविध तिखट मसाल्यांनाही चांगली मागणी आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अडचणी आणि रुढीवाद यांच्याशी लढा देत केवळ मुलींसाठीचा फुटबॉल क्लब चालवणाऱ्या महिलेची कथा

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश, पण मान्सून आला म्हणजे काय ?

कृष्णेच्या काठावर दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading