#IFFIWood गोवा – सिनेमामध्ये संगीताप्रमाणेच सीमा ओलांडण्याची आणि भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे आत्म्यांना जोडण्याची अतुलनीय क्षमता आहे. या परिवर्तनकारी कलाप्रकाराच्या उत्सवात, गोव्याच्या चैतन्यमय संस्कृतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) प्रारंभ मायकल ग्रेसी दिग्दर्शित ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने झाला. हा चित्रपट ब्रिटीश पॉप लिजेंड रॉबी विल्यम्स यांची लवचिकता, लोकप्रियता आणि विलक्षण जीवन याला वाहिलेली सिनेमॅटिक श्रद्धांजली आहे. चित्रपटातील कलाकार आणि इतर चमू चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरला.
इफ्फीमध्ये भव्य उद्घाटन
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, कलाकार आणि इतर चमूने रेड कार्पेट वॉक केला आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव श्री संजय जाजू, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव वृंदा देसाई, इफ्फी महोत्सव संचालक शेखर कपूर आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (इएसजी) च्या उपाध्यक्षा डेलिलाह एम. लोबो यांनी चित्रपटाचे निर्माते पॉल करी आणि अभिनेत्री रेशेल बन्नो यांचा सत्कार केला.
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी, पॉल करी यांनी आपल्या भाषणात टिप्पणी केली, “हा चित्रपट जग रॉबीला कसे समजते याबद्दल नाही, तर रॉबी स्वतःला कसे समजतो, याबद्दल आहे.” या सन्माननीय व्यासपीठावर चित्रपट सादर करण्याचा उत्साह त्यांनी पुढे व्यक्त केला. रेशेल बन्नो यांनी आपले मनोगत व्यक्त केले, “इफ्फी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा चित्रपट तुम्हा सर्वांसमोर सादर करताना मी रोमांचित झाले आहे.” चित्रपटाचे दिग्दर्शक मायकल ग्रेसी हे व्हिडिओ कॉलद्वारे सामील होताना म्हणाले, “माझ्या कामावर बॉलिवुड सिनेमाचा अत्याधिक प्रभाव पडला आहे.”
सांगीतिक चरित्रपट
मायकेल ग्रेसी यांनी दिग्दर्शित केलेला बेटर मॅन हा एक सांगीतिक चरित्रपट आहे. हा चित्रपट वैशिष्ट्यपूर्णरित्या रॉबी विल्यम्सच्या दृष्टिकोनातून सांगितला गेला असून विल्यम्स स्वतः यात संस्मरणीय सादरीकरण करत आहे. त्याचा दमदार आणि मंत्रमुग्ध करणारा स्टेज परफॉर्मन्स यात पाहायला मिळतो.
‘बेटर मॅन’, हा चित्रपट विल्यम्सची सार्वजनिक प्रतिमा आणि व्यक्तिगत जीवनातला संघर्ष यातील द्वैत्वाचा शोध घेत जीवनाचे सार दर्शवतो. कलाकार म्हणून सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा त्याचा प्रगतीचा काळ पाहताना त्याचे अंतरंगही प्रेक्षक पाहतात. संगीतामध्ये शांतता गवसण्याचा आणि खरे जीवन म्हणजे काय, याची व्याख्या पुन्हा उलगडण्याचा हा प्रवास आहे.
‘द ग्रेटेस्ट शोमॅन’ या कलाकृतीसाठी (2017) नावाजलेला मायकेल ग्रेसी दृश्यात्मकरीत्या खिळवून ठेवणारा चित्रपट सादर करतो. प्रमुख भूमिकेत रॉबी विल्यम्स असून या कथनातील सच्चेपणा आणि ताकद अतुलनीय आहे. प्रेक्षकांना नायकाच्या आत्मानुभूतीचे दर्शन यात घडते. ब्रिटिश पॉप लिजेंड रॉबी विल्यम्सच्या या सांगीतिक चरित्रपटात स्वतः विल्यम्सने जोमदार अभिनय करत चित्रपटात जीव ओतला आहे. रॉबीच्या दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्णरित्या सांगितला गेलेला हा चित्रपट त्याची हुशारी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवतो. या चित्रपटात रॉबीचा बालपण ते ‘टेक दॅट’ या आघाडीच्या बॉयबँडचा सर्वात तरुण सदस्य आणि मग एकल कलाकार होण्याचा प्रवास चितारला आहे. एकीकडे यश आणि प्रसिद्धी अनुभवत असताना दुसरीकडे त्याला भेडसावणारी आव्हाने या चित्रपटात दाखवण्यात आली आहेत.
डोळ्याला सुखावणारी मोहक दृश्यानुभूती आणि रॉबीचे आघाडीचे साउंडट्रॅक यामुळे चित्रपट संस्मरणीय ठरतो. प्रत्येक दृश्य एका विलक्षण जीवनातील अत्युच्च सुखदुःखाच्या क्षणांमध्ये प्रेक्षकांना गुंतवते, ऊर्जेची स्पंदने जागवते.
बेटर मॅनच्या प्रीमीअरला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत या चित्रपटाला मानवंदना दिली. यंदाच्या इफ्फीमध्ये सर्वाधिक संस्मरणीय चित्रपटांपैकी एक म्हणून या चित्रपटाने आपले स्थान पक्के केले. प्रसिद्धीमुळे येणारी आव्हाने, नायकाची जीवनाशी जुळवून घेण्याची वृत्ती आणि आत्मशोध यांचे प्रामाणिक दर्शन या चित्रपटात घडत असल्याचे कौतुक उपस्थित प्रेक्षकांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.