पट्टा पद्धतीने तुती लागवड केल्यास प्रति चौरस फूट क्षेत्रात जास्तीची झाडे बसतात. प्रत्येक झाडास ८ चौरस फूट क्षेत्र मिळते. सर्व प्रकारची ट्रॅक्टरचलित यंत्रे चालवण्यासाठी सोईचे होते. ठिबक सिंचनाची २० मिमि लॅटरल २ ओळीत १ या प्रमाणात बसवणे शक्य होते. विद्राव्य खत, पाणी सारख्या प्रमाणात देणे शक्य होते. खर्चात बचत होते.
डॉ. सी. बी. लटपटे – ७५८८६१२६२२, डी. एन. मोहोड ९४०३३९२११९
(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
सध्या कमी खर्चात, किफायतशीर व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात नव्या पद्धतीने तुती बाग लागवड होत आहेत. मजुरांच्या कमतरतेमुळे यंत्राव्दारे तुती बागेत आंतरमशागत फायदेशीर ठरते. हे फक्त ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरच्या वापरामुळे शक्य होते. तुती पानांच्या उत्पादनासाठी एकूण खर्चाच्या ६० टक्यांपर्यंत खर्च येतो. तुती बागेतील आंतर मशागत आणि पाने / फांद्या तोडणीसाठी ६५-७० टक्के खर्च येतो. हे लक्षात घेता लहान यंत्राच्या साहाय्याने जमीन तयार करणे, पाने तोडणी, आंतरमशागत, रसायन फवारणी केली तर ३५ ते ४० टक्के खर्चात बचत होते. तुती बागेत सर्व कामे मजुरांच्या मार्फत करावी लागतात. अभ्यासानुसार ८०० मनुष्य दिवस प्रति हेक्टर प्रति वर्ष तुती बाग व्यवस्थापनासाठी लांगतात. यंत्राचा वापर केला तर खर्चात दहा पट बचत करणे शक्य आहे.
🎯 लागवडीच्या पद्धती
१) सरी पध्दत :
◆या लागवड पद्धतीमध्ये ३ फूट बाय ३ फूट अंतरावर तुती लागवड केल्यास एकरी ४,९३८ झाडे (हेक्टरी १२,३४५ झाडे) बसतात.
◆४ फूट बाय २ फूट अंतरावर तुती लागवड केल्यानंतर एकरी ५,५५५ झाडे बसतात.
◆मराठवाड्यातील काही जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने (३ अधिक ५) बाय १ फूट किंवा ४ फूट बाय १ फूट अंतर म्हणजे २७,७७७ झाडे प्रति हेक्टरी लागवड केलेली दिसते. हलक्या जमिनीत २ फूट बाय १ फूट म्हणजे ५५,५५५ झाडे प्रति हेक्टर अशा प्रकारे लागवड केली तर तुती पानाची प्रत खालावते. काही वर्षातच झाडे कीड, रोगास बळी पडतात. कोशाच्या पिकांचे नुकसान होते.
२) घन तुती लागवडीतील यांत्रिकीकरण (सरी पध्दत) :
◆पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर चलित यंत्र घन पद्धतीने लागवड केलेल्या म्हणजे २ फूट बाय २ फूट किंवा ३ फूट बाय ३ फूट तुती लागवडीत चालवणे शक्य होत नाही. त्याचबरोबर आंतर मशागतीची कामे, तुती छाटणी ही कामे यंत्राच्या साहाय्याने करणे शक्य होत नाही. अशावेळी दोन ओळी नंतर एक ओळ काढावी लागेल, तरच ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर वापरता येईल.
◆या उलट दोन पट्यात ५ फूट, दोन ओळीत ३ फूट आणि दोन झाडामध्ये २ फूट म्हणजे (५ फूट अधिक ३ फूट) २ फूट किंवा (६ फूट अधिक ३ फूट) २ फूट पट्टा पद्धतीमध्ये व्यवस्थितरीत्या पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीची कामे करता येतात.
३) पट्टा पद्धतीने लागवड :
◆तुती बागेत विविध प्रकारचे यांत्रिकीकरण करता यावे यासाठी दोन झाडातील अंतर कमीत कमी ६० सेंमी (२ फूट) ठेवण्यात आले असून दोन पट्यात ९० सेंमी (३ फूट) तर दोन जोड ओळीतील अंतर ५ किंवा ६ फूट म्हणजे (५ फूट अधिक ३ फूट) २ फूट किंवा (६ फूट अधिक ३ फूट) २ फूट अशा प्रकारे ठेवण्यात आले. या पद्धतीने दक्षिणेतील बहुतांश राज्यात लागवड केली जाते.
🎯पट्टा पध्दतीचे फायदे :
◆प्रति चौरस फूट क्षेत्रात जास्तीची झाडे (५,५५५/ एकर) बसतात. प्रत्येक झाडास ८ चौरस फूट क्षेत्र मिळते.
◆सर्व प्रकारची ट्रॅक्टरचलित यंत्रे चालवण्यासाठी सोईचे होते.
◆ठिबक सिंचनाची २० मिमि लॅटरल २ ओळीत एक या प्रमाणात बसवणे शक्य होते. तसेच द्रवरूप खत व पाणी सारख्या प्रमाणात देणे शक्य होते. खर्चात बचत होते.
◆६ फूट किंवा ५ फूट पट्टा दोन जोड ओळीत राहात असल्याने हवा, पाणी, सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. पानाची प्रत सुधारते. तण नियंत्रण यंत्राच्या साहाय्याने सोईचे होते.
◆फांद्या खाद्य पध्दतीचा अवलंब करता येतो. कारण तुती छाटणी, फांद्या कापणी वाहतूक सोपी होते. फांद्यामध्ये चांगले पाण्याचे प्रमाण टिकवणे शक्य होते.
◆५ किंवा ६ फुटाच्या पट्यात मूग, उडीद, हिरवळीची पिके उदा. ढेंचा किंवा बोरू वर्षातून दोन वेळा घेणे सोईचे होते.
◆सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळाल्याने प्रत्येक ओळीत तुतीची वाढ झपाट्याने होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.