December 2, 2023
belle-village-progressed-through-silk-production
Home » रेशीम उत्पादनातून तानाजी झाला लखपती
फोटो फिचर

रेशीम उत्पादनातून तानाजी झाला लखपती

कोल्हापूर जिल्हा हा ऊस पट्टा म्हणूनच ओळखला जातो पण येथे आता रेशीम शेतीतूनही शेतकरी लखपती होत आहेत. करवीर तालुक्यातील बेले येथील तानाजी बंडू पाटील यांनी हे यश मिळवले आहे…

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

भोगावती सहकारी साखर कारखान्या जवळ करवीर तालुक्यातील बेले हे साधारण तीन हजार लोकसंख्येचे गाव. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये ऊस हेच प्रमुख पीक घेतले जाते. करवीर तालुक्यातील बेले गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून गावातील दहा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून रेशीम शेतीला पसंती दिली आहे. यातूनच शाश्वत उत्पनाचा नवा मार्ग त्यांना मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सहाय्याने येथे रेशीम शेती बहरली आहे. रेशीम शेतीद्वारे छोटेसे बेले गाव प्रगती साधत असून याद्वारे गावाला अग्रेसर बनविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न स्तुत्य म्हणायला हवा.

रेशीम उद्योग करत असताना रोजगार हमी अंतर्गत शासनाकडून दररोज 273 रुपयांप्रमाणे हजेरी मिळते. त्यामुळे महिलांना रोजगाराची एक नवीन संधी मिळाली आहे. यामुळेच गावात अनेक महिला ‘रेशीम उद्योजिका’ म्हणून नावलौकीक मिळवत आहेत. यामुळे ‘बेले’ हे गाव रेशीम उद्योजकांचे गाव म्हणून परिचित होत आहे.

अश्विनी तानाजी पाटील (रेशीम उद्योजक), बेले, ता. करवीर
जि. कोल्हापूर, मो.नं. ७६६६१८९६९४

रेशीम उत्पादनातून तानाजी पाटील यांनी साधली प्रगती

बेले गावातील तानाजी बंडू पाटील यांची साडेतीन एकर शेती आहे. यापैकी दोन एकर ऊस शेती तर अर्धा एकरात भात, भुईमूग पीके घेतात. ऊस शेतीतून एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळायचे. उत्पन्नासाठी अन्य पर्यायाच्या शोधात असताना रेशीम शेतीबाबत त्यांना माहिती मिळाली. गेल्या तीन वर्षात एका एकरात त्यांनी १०० अंडीपुंजच्या आजपर्यंत १४ बॅचेस घेतल्या आहेत. एकूण १४ बॅचेसमधून सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. रेशीम कोषांना सर्व खर्च वजा करुन किलोला ४०० ते ८०० रुपयापर्यंत दर मिळतो. त्यांना दोन्ही मुलांची व पत्नीची साथ आहे. रेशीम शेतीमुळे मुलांना नोकरी नाही मिळाली तरी वर्षभर पैसे मिळविण्याचा हुकमी मार्ग त्यांना सापडला आहे. रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना भेटी देणे, त्यांना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याबरोबरच रेशीम उत्पादन वाढीसाठी प्रयत्न असल्यामुळे त्यांना जिल्ह्याचे रेशीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शासकीय मदतीचा आधार

ऊस शेतीच्या पट्ट्यात रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे आव्हानात्मक होते. रेशीम शेतीतून नफा मिळेल का याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. पण तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचे संघटन केले. त्यांची पत्नी आश्विनी पाटील यांनीही शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे आर्थिक गणित समजावून दिले. त्यामुळे शेतकरी प्रयोग करीत गेले. त्यांना मिळणारे यश पाहून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली. गावात 10 शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकर तुती लावली आहे. तर 22 जणांची नवीन रेशीम नोंदणी झाली आहे. किटक संगोपन गृहासाठी शासनाकडुन २१३ मजुरांची हजेरी रक्कम मिळते. पहिल्या वर्षी २८२ दिवस तीन वर्षासाठी 895 दिवस असे 3 लाख 58 हजार रुपयांपर्यंत शासनाचे अनुदान मिळाले. 10 जणांनी तुती किटक संगोपन गृहासाठी शेड उभारणी केली आहे. प्रती बॅच 40 हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. याशिवाय 273 रुपयांप्रमाणे दर दिवसाला रक्कमही मिळत गेली. त्यामुळे ऊसापेक्षा जास्त नफा या व्यवसायात मिळत असल्याचे समजताच शेतकऱ्यांचा उत्साह वाढला. गेल्या दोन वर्षांत केवळ रेशीम शेतीसाठी 50 लाखाहून अधिक अनुदान मिळणारे बेले हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.

रेशीम उत्पादनातून पाटील यांचे कुटुंब लखपती झालेच त्याचबरोबर बेले गावही उन्नतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या कुटुबांची ओळख आता रेशीम उद्योजक अशी झाली आहे. तु आणि ती या रेशीम व्यवसायामुळे या व्यवसायाला तुती लागवड असे नामकरण झाले.

एकत्रित प्रयत्नांचे महत्व

जिल्हा प्रशासन तसेच रेशीम विकास अधिकारी राजेश गुलाब कांबळे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक डॉ. भगवान मारुती खडांगळे, क्षेत्र सहाय्यक प्रियंका बैजू चंदनशिवे या सर्वांच्या सहकार्याने तसेच शिवाजी विद्यापीठाच्या रेशीम शास्त्र विभागाचे माजी समन्वयक डॉ. ए. डी. जाधव, करवीर तहसीलदार, करवीर पंचायत समिती, बेले ग्राम पंचायत कार्यालयातील सर्वांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन व अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथील संगीता मस्के यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण व शेतकऱ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये त्यांना कोष निर्मिती पासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले गेले. तसेच नाबार्डकडून शिवाजी विद्यापीठाअंतर्गत बेंगलोर येथे ७ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील सर्व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन, किटक संगोपन (चॉकी सेंटर), धागा निर्मिती, (रेलींग सेंटर) शेतकऱ्यांच्या रेशीम बागांना भेटी आदी उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मदत झाली आहे.

रेशीम उद्योगामुळे कमी गुंतवणुकीत, कमी वेळेत अधिक रक्कमेचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. यातून शेतकऱ्यांनी स्वत:सह कुटूंबाची व गावाची आर्थिक उन्नती साधावी.

तानाजी बंडू पाटील (रेशीम उद्योजक)
मु.पो. बेले, ता. करवीर जि. कोल्हापूर
मो.नं. ९९७०२२१७००

Related posts

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

वाचन संस्कृती वाढावी यासाठी प्रयत्नशील प्रतिभा

पाण्यातील ज्वालामुखी…!

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More