September 9, 2024
Moon Going away from Earth Dr V N Shinde article a
Home » चंद्र दूर जातोय…!
संशोधन आणि तंत्रज्ञान

चंद्र दूर जातोय…!

चंद्र सर्वानाच इतका जवळचा वाटतो की चंद्राचा नेहमीच उल्लेख एकेरी करण्यात येतो, मग तो साहित्यातील असो किंवा बोली भाषेत. असा सर्वव्यापी चंद्र, लहान मुलांचा ‘लिंबोणीच्या झाडामागे लपणारा मामा’ आज पुन्हा चर्चेत आला आहे.

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. याच चंद्रावर सफर घडवून आणण्याचे स्वप्न इलान मस्क दाखवत आहेत. अशोक सराफ अर्थात मामा त्यांच्या मंगलासाठी चंद्रावर बंगला बांधण्याचे आश्वासन देत गातात, ‘मंगला ग मंगला… तुझ्यासाठी चंद्रावर बांधीन मी बंगला…’. आकाशातील चंद्र दाखवत अनेक प्रेमवीर आपल्या रुसलेल्या सखीला मनवण्याचे काम करतात. १९५९ मध्ये प्रदर्शीत झालेले ‘बरखा’ चित्रपटातील लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातील जगदिप आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले, ‘इक रातमे दो दो चांद खिले, एक घुंघटमे एक बदलीमे…’ हे गाणे आजही तितकेच ताजे वाटते, आजच्या पिढीलाही आपले वाटते. प्रियकराकडून सखीच्या चेहऱ्याला चंद्राचीच उपमा दिली जाते. अजून तरी त्याला पर्याय सापडला आहे असे दिसत नाही. देत असतील, तर आमचे अज्ञान. मात्र चंद्रच आजतरी आघाडीवर आहे. कुसुमाग्रज तर चंद्राला पृथ्वीवर एकतर्फी प्रेम करणारा प्रेमवीर मानतात. चंद्र सर्वानाच इतका जवळचा वाटतो की चंद्राचा नेहमीच उल्लेख एकेरी करण्यात येतो, मग तो साहित्यातील असो किंवा बोली भाषेत. असा सर्वव्यापी चंद्र, लहान मुलांचा ‘लिंबोणीच्या झाडामागे लपणारा मामा’ आज पुन्हा चर्चेत आला आहे.

त्याचे कारण म्हणजे सर्वांच्या जवळचा हा चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले आहे. संशोधकांच्या हाती नऊ कोटी वर्षांपूर्वीचा एक दगड लागला. चंद्र निर्माण कसा झाला हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी या दगडाचा अभ्यास सुरू करण्यात आला होता. या अभ्यासात अनेक गोष्टी संशोधकांच्या लक्षात आल्या. या अभ्यासातूनच संशोधकांच्या लक्षात आले की, चंद्र कालौघात पृथ्वीपासून दूर जात आहे. आज कुसुमाग्रज असते तर त्यांनी ‘आपल्या प्रेमाला पृथ्वी प्रतिसाद देत नाही हे पाहून, चंद्र दूर जात आहे असे सांगितले असते. मात्र आज कुसुमाग्रज नाहीत आणि चंद्रावर भाष्य करणारे विस्कॉन्सिन–मॅडिसन विद्यापीठातील कवी नव्हे तर संशोधक आहेत.

या विद्यापीठामध्ये गत अनेक वर्षांपासून या विषयावर संशोधन सुरू आहे. या संशोधनातून चंद्राबाबत अनेक खुलासे केले आहेत. यातून निश्चितच लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांचे कुतुहल काही प्रमाणात शमले आहे. आज चंद्र हा पृथ्वीपासून ३,८४,४०० किलोमीटर अंतरावर आहे. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या बरोबर आहे. दिवसा चंद्रावर प्रचंड तापमान वाढते, तर रात्री कडाक्याची थंडी पडते. चंद्रावरील कमाल तापमान हे १०० तर किमान तापमान उणे २०० डिग्री सेल्सियस असते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण सत्तावीस दिवस लागतात. आज हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे ३,६४,३९७ तर सर्वात दूर म्हणजे ४,०६,७३१ किलोमीटर अंतरावरून अंडाकृती कक्षेत फिरत आहे. हे अंतर मोजण्यासाठी पूर्वीच्या चांद्रमोहिमेत चंद्रावर लेसर परावर्तक बसवण्यात आले आहेत. पृथ्वीवरून त्यावर लेसर किरण पाठवतात आणि त्याला पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो यावरून हे अंतर मोजण्यात येते. चंद्राच्या गुरुत्वीय बलांमुळे समुद्राची भरती आणि ओहोटी आपण अनुभवत असतो. तसेच पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची म्हणजेच परिवलन गती चंद्राच्या वागण्यावर अवलंबून आहे. परिवलन गतीवर दिवसाचा कालावधी अवलंबून असतो. संशोधकांच्या निष्कर्षानुसार सन १६०० पासून आजवर पृथ्वीचा दिवस १.०९ मिलीसेकंदाने वाढला आहे. म्हणजे सोळाशे वर्षांपूर्वी दिवस हा २४ तासांपेक्षा कमी कालावधीचा होता. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित शोधनिबंधात हे निष्कर्ष देण्यात आले आहेत.

पूर्वी चंद्र पृथ्वीच्या फार जवळ होता. हा निष्कर्ष समुद्रातील प्रवाळावर असणाऱ्या रेषांच्या अभ्यासातून काढला आहे. भरती आणि ओहोटीचे एक चक्र पूर्ण झाले की समुद्री प्रवाळावर एक रेष उमटलेली आढळून येते. प्रवाळांच्या सापडलेल्या जिवाष्मातूनही काही निष्कर्ष संशोधकांच्या हाती आले आहेत. ४५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस हा आठ तासांचा होता. त्यानंतर पृथ्वीवर एक मोठी उल्का आदळली आणि चंद्र पृथ्वीपासून तयार झाला. त्यानंतर पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला. साधारण ३२ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीपासून केवळ २,७०,०००किलोमीटर अंतरावर हा चंद्र होता. त्यावेळी त्याचा पृथ्वीवरील एक दिवस हा १३ तासांचा होता. साधारण ८.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस २१ तासाचा असल्याचे पुरावे संशोधकांनी दिले आहेत. तर चार कोटी वर्षांपूर्वीचा दिवस हा २२ तासांचा होता.

हाच अभ्यास आणि चंद्र आणि पृथ्वी यामधील वाढते अंतर यांचा विचार करून विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील भूशास्त्रज्ञ स्टीफन मेयर्स हे सांगतात, ‘चंद्र जसजसा दूर जात आहे, तस तसा पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग मंदावत आहे. हे संशोधन नवे नाही. मात्र यात आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूकता आली आहे. चंद्र दरवर्षी ३.८ सेंटिमीटर वेगाने पृथ्वीपासून दूर जात आहे. याच वेगाने पृथ्वीपासून चंद्र दूर जात राहिल्यास २०० कोटी वर्षांनी पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास पंचवीस तास लागणार आहेत. म्हणजेच पृथ्वीवरील दिवस हा २४ तासांचा न राहता २५ तासांचा असेल. माणसाचे संपूर्ण दिनचक्र त्यानुसार बदलेल. घड्याळेही बदलावी लागतील. आजवर हे सारे बदलत आले आहे. मात्र हा कालावधी इतका मोठा आहे की हे पाहायला आपला पणत-पणत नातवंडेही असणार नाहीत. आपल्या हयातीत तर हे घडणारच नाही. त्यामुळे आपण याची चिंता करण्याचे कारण नाही.

पृथ्वी आपल्या प्रेमाला दाद देत नाही, हे पाहून हा चंद्र दूर जातोय असे खरंच मानायचे का? चंद्र दूर गेला म्हणून तसा फरक पडणार नाही, टाळताही येणार नाही. मग आज ‘हात तुझा हातात अन धुंद ही हवा, रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा’ असे प्रेमीयुगल चंद्राच्या साक्षीने बिनधास्त गावे. तो नाराज होऊन दूर जात असला तरी प्रेमवेडे काही चंद्राला सोडणार नाहीत. त्याच्या साक्षीने नवी गीते लिहितील आणि त्याच्या साक्षीने गातीलही. अगदी कोट्यावधी वर्षे. जर असे घडायला २०० कोटी वर्षे लागणार असतील तर, आज त्याची चिंता कशाला…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मसाले उत्पादनातील यशस्वी उद्योजिका सुरेखा वाकुरे

आत्मज्ञानाची अनुभूती म्हणजे साक्षात्कार

‘हायड्रोपोनिक’ शेतीच्या आरोग्य निरीक्षण करणाऱ्या यंत्राच्या संशोधनास पेटंट

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading