March 25, 2023
Indian Sugar Export increase by 291 percent
Home » साखर निर्यातीत 291 टक्क्यांनी वाढ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

साखर निर्यातीत 291 टक्क्यांनी वाढ

भारताची साखर निर्यात 2013-14 पासून आतापर्यंत 291% नी वाढली

नवी दिल्लीः भारताच्या साखर निर्यातीत 291% ची घसघशीत वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 1,177 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीच्या साखरेची निर्यात झाली होती तर आता आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये तब्बल 4600 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात करण्यात आली आहे. डीजीसीआय अँड एस अर्थात वाणिज्य गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताने जगभरातील 121 देशांना साखर निर्यात केली आहे.

वर्ष 2021-22 मध्ये देशाची साखर निर्यात त्याआधीच्या वर्षीपेक्षा 65% नी वधारली. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या, मालवाहतुकीचे वाढीव दर, कंटेनर्सची टंचाई यासारख्या वाहतूकविषयक आव्हानांवर मात करून ही वाढ करण्यात यश मिळाले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीवर अधिक भर देत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, मोदी सरकारची धोरणे देशातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारात प्रवेश करून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करत आहेत.

डीजीसीआय अँड एस कडे उपलब्ध माहितीनुसार, भारताने 2019-20 मध्ये 1965 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीची साखर निर्यात केली होती त्यात वाढ होऊन 2020-21 मध्ये ती 2790 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स झाली तर 2021-22 मध्ये यात आणखी वाढ होऊन या वर्षी 4600 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीची साखर निर्यात करण्यात आली.

आता, वर्ष 2021-22 मध्ये (एप्रिल ते फेब्रुवारी या काळात) भारताने, 769 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या साखरेची इंडोनेशिया देशाला निर्यात केली आहे, तर बांगलादेश (561 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), सुदान (530 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) आणि संयुक्त अरब अमिरात (270 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) इतक्या मूल्याची साखर निर्यात केली आहे.

भारताने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,जर्मनी,फ्रान्स,न्यूझीलंड, सोमालिया, सौदी अरब, मलेशिया, श्रीलंका, रशिया आणि इजिप्त इत्यादी देशांना देखील साखर निर्यात केली आहे.

Related posts

आता सोशल मिडीयावर वक्रनजर…

प्रुनिंग झाडांसाठी आवश्यक आहे का ?…

स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून कंपोस्ट…(व्हिडिओ)

Leave a Comment