October 6, 2024
Sandeep Vakchoure Thoughts on Education
Home » Privacy Policy » संदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संदीप वाकचौरे यांचा शिक्षण विचार

चिकित्सक वृत्ती आणि ज्ञानसाधनेची लालसा यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि शिक्षणासारखा एकच महत्त्वपूर्ण विषय घेऊन बारा पुस्तकांची माला तडीस जात आहे. बघता बघता दहावे पुस्तक वाचकांच्या हाती आले असून केवळ मराठीच नाही तर प्रादेशिक भाषेतीलही हा एक विक्रम ठरला आहे. जणू त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकांची पाठराखण करत शुभेच्छा दिल्या आहेत.

घनश्याम पाटील

आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, मेंदूही आहे. या सगळ्याचा सगळे जण वापर करतातच असे मात्र मुळीच नाही. महात्मा गांधींची तीन माकडं आपणास माहीत आहेतच. वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका असं त्यांनी सांगितलं. त्याचा सोयीस्कर अर्थ अनेकांनी घेतला. परिणामी समाजात कितीही, कसलेही अराजक माजले तरी असे महाभाग वाईट वृत्तीच्या विरूद्ध काही बोलत नाहीत, सामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत नाहीत, दुष्ट शक्तींचा विरोध करण्यास धजावत नाहीत. अशावेळी आपले डोळे, कान, नाक आणि मेंदू सजग ठेवून कोणी कर्तव्यतत्त्पर असेल आणि समाजाला, व्यवस्थेला आंतरीक तळमळीतून काही सांगू पाहत असेल तर त्याचे स्वागत करायलाच हवे. माझे ज्येष्ठ स्नेही आणि शिक्षण क्षेत्रात लेखणीच्या माध्यमातून अतुलनीय योगदान पेरणारे संदीप वाकचौरे यांनी ही किमया साधली आहे.

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना या क्षेत्रातील अपप्रवृत्तीविरूद्ध बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. बालक, पालक आणि शिक्षकांच्या भल्याच्या दृष्टीने त्यांची लेखणी अव्याहतपणे पाझरत असते. ‘अमृत ते काय गोड आम्हापुढे, विष ते बापूडे कडू किती’ हे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वचन त्यांनी सत्यात आणले आहे. शिक्षण क्षेत्रातील वृत्ती-प्रवृत्तीविषयी कठोर भाष्य करताना त्यांनी कुणाचाही मुलाहिजा राखला नाही. अत्यंत नेमकेपणाने, सुस्पष्टपणे, कुणाचीही अवहेलना, उपमर्द न करता कधी वज्राप्रमाणे कठोर होत तर कधी आईच्या अंतःकरणाने प्रेमळपणे त्यांनी भाष्य केले आहे. त्यांची चिकित्सक वृत्ती आणि ज्ञानसाधनेची लालसा यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि शिक्षणासारखा एकच महत्त्वपूर्ण विषय घेऊन बारा पुस्तकांची माला तडीस जात आहे. बघता बघता दहावे पुस्तक वाचकांच्या हाती आले असून केवळ मराठीच नाही तर प्रादेशिक भाषेतीलही हा एक विक्रम ठरला आहे. जणू त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकांची पाठराखण करत शुभेच्छा दिल्या आहेत.

संदीप वाकचौरे हे मुळात शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी व्यापक आहे. गेल्या शंभर वर्षात शिक्षण क्षेत्रात जे बदल झाले, ज्यांनी हाडाची काडे करत निष्ठेने संस्था उभारल्या आणि नंतर नंतर या क्षेत्रातील सेवाभाव बाजूला पडून धंदा केला जाऊ जागला त्या सर्वाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यामुळे या क्षेत्राचे सामर्थ्य आणि मर्यादा याचे विवेचन करताना ते असंख्य दाखले देतात, उदाहरणे सांगतात, आकडेवारी मांडतात. त्यांच्या लेखणीला सत्याचा गंध असल्याने या क्षेत्राचा आरसा दाखविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत.

आचार्य विनोबा भावे, गिजूभाई बधेका, जे. कृष्णमूर्ती, रजनीश, गांधी, विवेकानंद, अब्दुल कमाल अशा अनेकांचा शिक्षणविचार ते सहजपणे सांगतात. कोविडच्या काळातील शिक्षण असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे असतील या प्रत्येक विषयाचा त्यांचा व्यासंग अफाट आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विचारवंतांच्या परंपरेतील गॅलरीतील का असेना पण एक खुर्ची त्यांनी त्यांच्या अभ्यासातून मिळवली आहे. नजिकच्या काळात गॅलरीतून खाली येत मुख्य सभामंडपातील अध्यक्षस्थानावर ते विराजमान झाले तर यत्किंचितही आश्चर्य वाटणार नाही. आजवर त्यांनी अनेकांचे शिक्षणविचार महाराष्ट्राला समजावून सांगितले. यापुढे ‘संदीप वाकचौरे यांचे शिक्षणविचार’ विविध माध्यमातून सांगितले जातील आणि त्यावर संशोधक काम करतील. विहिरीतला मासा तळ्यात यावा, तळ्यातून नदीत जावा आणि नदीतून त्याने समुद्रात सुळकांडी घ्यावी, असा हा त्यांचा प्रवास आहे. ‘शिक्षण याच विषयावर गेली पंधरा वर्षे नियमितपणे स्तंभलेखन करणारे मराठीतील एकमेव लेखक’ म्हणून त्यांची कर्तबगारी पाहिली तर वाचकांच्या मला काय सांगायचे आहे ते सहजपणे ध्यानात येईल.

भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करता आपल्याकडे ‘प्रश्नोपनिषद’ महत्त्वाचे मानले गेले आहे. अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेतील उपनिषदांचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने त्याचे नाव प्रश्नोपनिषद असे आहे. यातील खंडानाही ‘प्रश्न’ असेच नाव आहे. आद्य शंकराचार्यांनीही ज्या प्राचीन उपनिषदांवर भाष्य लिहिले ती उपनिषदे मानली जातात. ही सर्व परंपरा पाहता आजच्या काळात संदीप वाकचौरे यांनी या पुस्तकाचे शीर्षक ‘शिक्षणाचे प्रश्नोपनिषद’ असे का योजले असावे त्याचे उत्तर सहजी मिळते.

या पुस्तकातील लेखांची ही काही शीर्षके पाहा –
शांततेचे शिक्षण केव्हा?, गरिबांना शिक्षण कधी?, जीवन शिक्षण कधी?, शिक्षकांना सन्मान केव्हा?, शिक्षण मातृभाषेत केव्हा?, शिक्षण जाहीरनाम्यात कधी?, विज्ञानाचे काय करायचे?, प्रतिज्ञा जगण्यात कधी?, विद्यापीठातून पीठ अधिक विद्या कधी?, प्रश्न केव्हा विचारणार?, शिक्षण कौशल्यपूर्ण केव्हा होणार?, शिक्षण म्हणजे काय रे भाऊ? या सगळ्या प्रश्नार्थक शीर्षकातून त्यांना काय मांडायचे आहे ते स्पष्ट होते. शिक्षणातून ‘माणूस’ घडतो का? हा प्रश्न तर त्यांच्या लेखनाचा गाभाच म्हणावा लागेल. त्यांनी उपस्थित केलेल्या या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निदान प्रयत्न जरी आपल्या राज्यसत्तेने केला तरी खूप काही साध्य होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगत असतात की, ‘आपला भारत देश विश्वगुरु होईल आणि जगासाठी ज्ञानाची कवाडे उघडी करेल!’ त्यांचा हा दुर्दम्य आशावाद प्रत्यक्षात आणायचा तर आपल्या शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. ते कसे असावे? याची झलक संदीप वाकचौरे यांच्या या पुस्तकमालेतून मिळते.

आजच्या आधुनिक युगात सर्व ज्ञानशाखा इतक्या प्रगत असतानाही प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीचा हेवा वाटावा अशी परिस्थिती आहे. विज्ञानाने अनेक क्रांतिकारी प्रयोग केले. भाषा प्रवाही आणि समृद्ध होत गेली पण माणसाचे माणूसपणच हरवले आहे. आपली संस्कृती आणि संस्काराचे अधःपतन हे त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. नव्याचा ध्यास घेताना जुन्याचा विसर पडणे हे अधोगतीचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे वाढते नैराश्य, त्यांची व्यसनाधीनता, आधुनिक माध्यमांचा अविवेकी वापर यामुळे आपण दुर्बल होत चाललो आहोत. उद्याचे राष्ट्र सुदृढ आणि समृद्ध व्हायचे असेल तर यातून मार्ग कसा काढावा? यावर व्यापक स्वरूपात विचारमंथन सुरु आहे. त्या सर्वांसाठी संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकमालेतील या सर्व साहित्य कलाकृती दिशादर्शक आहेत. एका प्रतिभावान शिक्षकाने ठरवले तर जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन सिंहासनावर विराजमान होतो हा या मातीचा इतिहास आहे. राष्ट्र घडविण्यात योगदान देणार्‍यांपैकी शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे. वाकचौरे हे निष्ठावान ज्ञानसाधक आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी लेखणीरुपी शस्त्र हातात घेऊन इथल्या सामाजिक, राजकीय व्यवस्थेला आणि समाजालाही जागे करण्याचे काम केले आहे.

त्यांचा स्नेही आणि प्रकाशक म्हणूनच नाही तर एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटते की, विचारांची ठिणगी चेतवणार्‍या या सर्व पुस्तकांच्या अधिकाधिक प्रती सामान्य वाचकांपर्यंत जाव्यात. शासनाने त्यासाठी काही पुढाकार घेतला तर प्रबोधनाच्या दृष्टिने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सध्या जिकडे-तिकडे स्वायत्त महाविद्यालयांचे पेव फुटलेले असल्याने अशा महाविद्यालयांनी, राज्यातील प्रतिष्ठित विद्यापीठांनी या पुस्तकमालेचा विचार करून यातील शक्य ती पुुस्तके किंवा त्यातील शक्य तो भाग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. असे झाले तर या पुस्तकमालेचे सार्थक ठरेल.
लोककवी मनमोहन यांनी स्वतःच्या अवहेलनेबाबत टाहो फोडला होता.

त्यांनी लिहिलं होतं –
येथे स्मारके बांधली जातात
कालच्या गझल-कव्वालीवाल्यांसाठी
आणि त्याच डांबरी रस्त्याने
उद्याचा कालिदास असलेला मनमोहन जातो
अनवाणी पायाने!
आणि म्हणतो भुरट्या संपादकाला,
घेतोस का पाच रूपयांना कविता?
शरम तुला हवी समाजा
जन्माचे कौतुक,
ताटीवर पाय ताणल्यावर का तू करणार?

संदीप वाकचौरे यांचा सातत्यपूर्ण असलेला लेखनप्रवास बघितला तर ते वाचकांच्या रंजनासाठी नाही तर प्रबोधनासाठी लिहित आहेत. शिक्षणासारखा महत्त्वाचा विषय त्यांनी त्यांचे जीवनध्येय म्हणून निवडला आहे. माणूस घडविण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ पाहूनच मनमोहनांची कविता उदधृत करावी वाटली. मनमोहनांनी सांगितल्याप्रमाणे ‘उद्याचा कालिदास अनवाणी पायाने जात असेल तर त्यात अब्रू त्याची नाही तर राजा भोजाची जाते,’ इतकं जरी आपल्या राज्यकर्त्यांनी, समाजव्यवस्थेनं लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. संदीपजी वाकचौरे यांचं या प्रकल्पासाठी खास अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि काही बदल घडवू पाहणार्‍या जागरुक वाचकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading