देऊळवाडी ( जि. लातूर ) येथील विठ्ठलराव केदार प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या 2021 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार व सचिव देविदास केदार यांनी केली आहे.
या वर्षी मराठीतील उत्कृष्ट पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील साहित्यिक डॉ . श्रीकांत पाटील यांच्या ” ऊसकोंडी ” या कादंबरीला, नाशिक येथील कवी संजय चौधरी यांच्या “आतल्या विस्तवाचा कविता “या कवितासंग्रहाला तर बीड येथील डॉ.भास्कर बढे यांच्या” बाईचा दगड “या कथासंग्रहाला कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.
विशेष पुरस्कार बाळासाहेब कांबळे यांच्या “भिन वाडा” या कादंबरीस तर हबीब भंडारे यांच्या” जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता” अंकुश सिदगीकर यांच्या ” काळोखाचे कैदी” या कविता संग्रहास देण्यात आला आहे. विठ्ठलराव केदार बालवाङ्मय पुरस्कारासाठी पुणे येथील शिवाजी चाळक यांच्या “उंदरांचा टांगा “या बाल कविता संग्रहास, मुंबईच्या सिसिलीना काव्हेलो यांच्या “सवंगडी “या बालकथा संग्रहासाठी तर हिंगोली येथील बाल साहित्यिक बबन शिंदे यांच्या “जगावेगळा कीर्तनकार” या बाल कादंबरीला मिळाला आहे.
तर नांदेड येथील लेखिका कमल कदम यांच्या”आरपार “या आत्मकथनासाठी तर सिराज करीम यांच्या “गझलतारा “या गझल संग्रहास पुरस्कार देण्यात आला आहे.
दोन हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य विलास सिंदगीकर यांच्या मार्गदर्शनाखालील समितीने या पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड केली. किशन उगवले , प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर , रसूल पठाण, प्रा.रामदास केदार, प्रा. चंद्रशेखर पळसे यांनी परिक्षणाचे काम पाहीले.