July 27, 2024
A work of the One Disciple One Guru tradition
Home » एक शिष्य एक गुरू परंपरेचे कार्य
विश्वाचे आर्त

एक शिष्य एक गुरू परंपरेचे कार्य

अशी ही परंपरा खंडीत होण्याची संभवना नसते कारण ही भक्तीची परंपरा आहे. अमर ज्ञानाची परंपरा आहे. गुरूंचा मृत्यू हा त्यांच्या देहाचा मृत्यू असतो. आत्मज्ञानी गुरू हे अमरत्वाला पोहोचलेले असतात. देहातील मृत्यूनंतरही ते शिष्याला आपल्या अमरत्वाच्या ज्ञानाने अनुभुती देत राहातात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारू ।
तो मत्प्राप्तिकारू । जाणावया ।। १२२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – एक शिष्य व एक गुरू हा जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरिता आहे.

अनादीकालापासून गुरु-शिष्य परंपरा या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. पृथ्वीवर आल्यानंतर मानवाला दैनंदिन जगण्यासाठी धडपड करावी लागली. यातून नवनवीन शोध लागत गेले. नवनव्या कल्पना विकसित होत गेल्या. अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी सुरु असलेली मानवाची धडपड त्याला स्वतःपासून दूर घेऊन जाऊ लागली. स्वःचा विचार जाऊन देहाचा विचारच अधिक होऊ लागला. देह जगवण्यासाठी धडपड सुरु झाली अन् देहाच्या सुखासाठी सर्व क्रिया तो करू लागला. यातून मी कोण आहे ? याची ओळखच तो विसरला. ही ओळख त्याला करून देण्यासाठीच, त्या ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी, त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मग ही गुरू-शिष्य परंपरा अस्तित्वात आली. आदिनाथांपासून सुरु झालेल्या या परंपरेत अनेक, थोर संत महात्मे होऊन गेले. त्यांच्या योगदानातून ही परंपरा आजही कार्यरत आहे. या परंपरेला मग भाषेचे बंधन राहीले नाही. भारतात ती विविध भाषात अस्तित्वात आहे. भाषे नुसार अन् प्रांतानुसार तिच्यात बदल झाले आहेत पण गुरू-शिष्याची ज्ञानदानाची परंपरा ही अखंड कार्यरत आहे.

अखंड भक्तीचा हा झरा ज्ञान संवर्धन अन् ज्ञान प्रसाराने आजही तो विकसित होत आहे. मानवाचा जन्म कशासाठी हे जाणून घेतल्यानंतर त्या नुसार स्वःची ओळख करून आत्मज्ञानी झालेल्या या संताकडून हे ज्ञान पुढच्या पिढीत विकसित करण्यात येते. हे ज्ञानदानाचे कार्य अनादीकालापासून सुरू आहे. यात गुरूची ज्ञान देण्याची जितकी तळमळ असते तितकीच तळमळ हे ज्ञान घेण्यासाठी शिष्याजवळ असते. हे ज्ञान देण्यासाठी गुरू नित्य शिष्याच्या शोधात असतो. शिष्य सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी गुरुच्या शोधात असतो. दोघेही एकमेकांचा शोध घेत असतात. यातूनच ही गुरू-शिष्य परंपरा विकसित होत राहीली आहे.

अशी ही परंपरा खंडीत होण्याची संभवना नसते कारण ही भक्तीची परंपरा आहे. अमर ज्ञानाची परंपरा आहे. गुरूंचा मृत्यू हा त्यांच्या देहाचा मृत्यू असतो. आत्मज्ञानी गुरू हे अमरत्वाला पोहोचलेले असतात. देहातील मृत्यूनंतरही ते शिष्याला आपल्या अमरत्वाच्या ज्ञानाने अनुभुती देत राहातात. शिष्य आत्मज्ञानी व्हावा हाच त्यांचा प्रयत्न अखंड सुरू असतो. शिष्याच्या सहवासात नित्य राहून ते अनुभुतीतून शिष्याला आत्मज्ञानी करत असतात. आत्मज्ञानाची ही परंपरा यामुळेच अखंड कार्यरत राहीली आहे.

गुरु-शिष्याची ही परंपरा धर्म रक्षणासाठी सदैव कार्यरत असते. विश्वाच्या शांतीसाठी, सुख समाधान नांदावे यासाठी नित्य तिचे कार्य सुरू असते. सर्वांना ज्ञानी करणे, सुखी करणे हाच या परंपरेचा धर्म आहे. धर्मरक्षण याचा अर्थ व्यापक आहे. जगा व जगू द्या हा धर्म आहे. यातून पर्यावरणचे संवर्धन, संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन असेही मुद्देही आहेत हे विचारात घ्यायला हवे. पृथ्वीवर जेंव्हा जेंव्हा हिसाचार, अत्याचार, अतिरेक वाढतो तेंव्हा तेंव्हा त्याच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात. सध्या तर सर्वच गोष्टींचा अतिरेक झाला आहे. प्रदुषण वाढले आहे. पृथ्वीचा ऱ्हास होऊ लागला आहे. तेव्हा आपणच आपल्यातील भगवंत जागा करून वसुंधरेच्या रक्षणाचा धर्म जोपासायला हवा. सर्वांच्यामध्ये हा देव वसलेला आहे. हा देव जाणून घेऊन कार्यरत व्हायला हवे. यासाठीच गुरू – शिष्य परंपरेचे कार्य अखंड सुरू आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मोहाच्या रोगावर ही आहे औषधी

भक्ताच्या भक्तीपोटीच व्यक्त होतात गुरू

आगामी अंतरिम अंदाजपत्रकाकडून असलेल्या अपेक्षां

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading