April 20, 2024
work not like NandiBull article on Dnyneshwari
Home » नंदी बैलासारखी मान डोलावून कामे नकोत, तर…
विश्वाचे आर्त

नंदी बैलासारखी मान डोलावून कामे नकोत, तर…

सुख आणि ज्ञान माणसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा. शेतात जाऊन शेतीचा, मातीचा अभ्यास करून मातीशी नाते घट्ट करून शेती करायला हवी. तरच ती माती आपलीशी होईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कांनी ।
बैलाची करी वानी । पांगुळाचिया ।। 158 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणें सत्वगुण हा जीवाला सुखरुपी व ज्ञानरुपी दावें लावून पांगुळाच्या बैलासारखी (नंदीबैलासारखी) त्याची स्थिती करतो.

नंदीबैल कधी शेतात काम करताना पाहिला आहे का? तो केवळ माना डोलवतो. पाऊस पडेल का? असे विचारले तर पिंगळा जो सांगेल तशी मान डोलवतो. याचे तंत्र या पिंगळ्यांना अवगत असते. हे तंत्र शिकल्यानंतर ते गावोगावी हिंडतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता चेहरा पाहून भविष्य सांगतात. यातील बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतात. कसे सांगतात हे त्यांनाच माहिती. पण खरे सांगतात असा अनुभव आहे. काही गोष्टी सांगून दान मागतात. हा त्यांचा व्यवसाय आहे. मनकवडेपणा हा त्यांना परंपरेने मिळाला आहे.

नंदीबैलाचे खेळ करणे, मनोरंजन करणे व पैसे कमाविणे हा नित्याचा दिनक्रम. हे सुखी जीवन ते जगतात. या ज्ञानाचा त्यांना अभिमान असतो. यातच ते अडकून असतात. सध्याचा बांधावरचा शेतकरी हा अशा नंदीबैलासारखा आहे. त्याला कष्ट करण्याची सवयच नाही. सुख आणि ज्ञानामध्ये तो अडकला आहे. शेतावर कधी जाणे नाही. घरातूनच सर्व गोष्टी तो बघतो. मीच उत्तम प्रशासक आहे. व्यवस्थापन मलाच जमते. साऱ्या गोष्टी घरातून बघता येणे शक्य आहे. व्यवहार समजण्याइतके आपण पारंगत आहोत असे तो समजतो. ज्ञानाच्या जोरावर माणसांकडून काम करून घेण्यासारखे आपण बलवान आहोत असाच त्याचा समज असतो.

नंदीबैल काय मालक सांगेल तसेच वागतो. याची सुद्धा कामगार सांगतील तशीच शेती पिकते. असे शेतकरी आता अधिक झाले आहेत. विशेष म्हणजे हे बागायतदार आहेत. त्यांच्या जमीन उत्तम प्रकारच्या पिकाऊ आहेत. पण या शेतकऱ्यांकडे कष्ट करण्याची तयारी नाही. जो दुसऱ्याचे भविष्य तोंड पाहून सांगतो. तो स्वतःचे भविष्य का घडवू शकत नाही. त्याला दारोदारी हिंडण्याची का गरज भासते. असे सांगून पैसा कमावणे हा त्याचा पारंपरिक व्यवसाय झाला आहे. सध्या बांधावरच्या शेतकऱ्यांचाही असाच पारंपरिक व्यवसाय आहे. कित्येकांना त्यांच्या शेताचा बांध माहीत नाही. फक्त जमिनीची कागदपत्रे माहीत आहेत. हा कागदावरचा शेतकरीच कर्जमाफीसाठी चकरा मारत आहे. राबणारा शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच ठेवत नाही. मुळात तो कर्ज काढण्याच्या भानगडीतही पडत नाही. कष्टाने चार पैसे मिळतात त्यात तो समाधान मानतो. यावेळी मिळाले नाहीत तरी दुसऱ्यांदा जरूर मिळतील अशी आशा ठेवून कष्ट करतो.

सुख आणि ज्ञान माणसाला आंधळे करते. कामगार सांगतील तसे मान डोलवून शेती करायला तुम्ही काय नंदी बैल आहात का? याचा विचार आता बांधावरच्या शेतकऱ्यांनीच करायला हवा. शेतात जाऊन शेतीचा, मातीचा अभ्यास करून मातीशी नाते घट्ट करून शेती करायला हवी. तरच ती माती आपलीशी होईल. अन्यथा ती दुसऱ्याची व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन शेती करायला हवी.

Related posts

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व

Leave a Comment