November 22, 2024
Kiran Mane tells story of wine
Home » अभिनेता किरण मानेने सांगितला दारूचा किस्सा..
मनोरंजन

अभिनेता किरण मानेने सांगितला दारूचा किस्सा..

त्या दिवसापास्नं दारू अशी सुटलीये की आता चितेवर जाईपर्यन्त एक थेंबही प्यायची इच्छा होणार नाय ! चौदा वर्ष उलटून गेली…

किरण माने, अभिनेता

…लईच वाढलंव्हतं पिण्याचं प्रमाण ! अभिनयातलं करियर अर्धवट सोडून व्यवसाय सुरू करायला लागलो होतो. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पर्यायच नव्हता. आज सातार्‍यात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत.. पण त्यावेळीपासून सातार्‍यात आमच्या क्षेत्रातलं माझ्यावर खार खाऊन असलेलं – हितशत्रूंचं एक आठदहा जणांचं टोळकं. ते लै खुश झालंव्हतं. “किरन्या लै उड्या मारत होता. बच्चन समजत होता स्वत:ला. बसला दुकानात आता.” एकमेकांना टाळ्या देत चर्चा सुरू झाली होती. माझ्यासमोर यायला घाबरणारी बेडकं, वाट वाकडी करून दुकानावर चक्कर मारत होती. मी वरवर माज दाखवत होतो, पण आतनं पार खचलोवतो. रात्री ‘गुलबहार’ नायतर ‘अवंती’ मध्ये जाऊन दोन पेग मारल्यावर डोकं थंड व्हायचं. दुकानामुळं पैसा यायला लागलावता. ती चिंता नव्हती आता.

‘गुलबहार’ बारचे मॅनेजर पै काकांचा लै जीव माझ्यावर. ठराविक टायमिंगला माझं स्पेशल टेबल रिकामं व्हायचं. मी येऊन बसलो की पै काका मेहंदी हसन – ग़ुलाम अलीच्या ग़ज़ला सुरू करायचे. मग माझा ‘कार्यक्रम’ सुरू व्हायचा. त्यावेळी कल्पना नव्हती की हे पुढं जाऊन भयानक रूप घेणारय.

एकीकडे व्यवसायात स्थिर होत होतो, पण दूसरीकडं ‘अभिनय’ सोडायला लागलेल्याचं फ्रस्ट्रेशन टोकाला गेलं होतं. ती नोटांची बंडलं मला सुख देऊ शकत नव्हती, ना वाढलेला बँक बॅलन्स.. मला अभिनयातच करीयर करायचं होतं. जो काही त्रास होईल तो सहन करून अभिनय करायचा होता. पण… वाईट्ट अडकलो होतो. बेक्कार फसलो होतो. पुढे अंधार दिसत होता. पिण्याचं प्रमाण अशक्य वाढत गेलं.

…अशातच एक दिवस सणक आली आणि दूबेजींच्या वर्कशाॅपसाठी दुकान बंद केलं. वर्कशाॅप झालं, पुढं काय? अंधाSSर. पुन्हा पिणं. दूबेजींकडून शिकलेले कानमंत्र-शब्द न शब्द-एका डायरीत लिहून ठेवलं. हळूहळू नाटकातले काही होतकरू नवोदित अभिनय शिकायला माझ्याकडे येऊ लागले. त्यांना माझं हे व्यसन लक्षात आलंवतं. पोरं स्वत:च्या खर्चानं मला महाबळेश्वर-कोकणात घेऊन जायची. मला हवा तो ब्रँड समोर ठेवायचा आणि मी त्यांचं अभिनयाचं वर्कशाॅप घ्यायचो. अख्खा खंबा रिचवूनही दूबेजींवर तासनतास बोलत बसायचो. पोरांना शिव्या देत-प्रसंगी फटके देत बाॅडी लँग्वेज-वाचिक अभिनय-एक्सप्रेशन्स-मेथडस् शिकवू लागलो.. ‘स्तानिस्लाव्हस्की’ सुरू केला की नशेत रात्रंदिवस शिकवत बसायचो. शेक्सपियरपासून विजय तेंडूलकर-सतीश आळेकर-श्याम मनोहर वगैरेंचं लेखन.. मार्लन ब्रॅन्डो-टाॅम हँक्सपासून निळूभाऊ-डाॅ.लागू-नसिरूद्दीन शाह-मनोज बाजपेयी वगैरेंचे परफाॅर्मन्सेस, त्यातले डिटेलिंग्ज यावर भान हरपून बोलत बसायचो.. पिणं अवांतर सुरू होतं. त्याशिवाय सुचायचंच नाही बोलायला काही..

झालं असं की, पोरांच्या मनात नाटकाची ‘आग’ निर्माण करण्यात मात्र यश आलं. माझ्यातल्या जिद्दीचं आणि नाट्यप्रेमाचं ‘बीज’ पोरांमध्ये रूजलं ! ॲक्टिव्हिटी सुरू झाली. अस्सल प्रायोगिक नाटकं बसवू लागलो.. ती गाजायला लागली. पुण्यात सुदर्शन हाॅल, मुंबईत आविष्कार पासून थेट पृथ्वी थिएटरपर्यन्त नाटकाचे प्रयोग होऊ लागले. कौतुक वाढत होतं..आणि पिणंही ! पिण्यामुळं आणि ग्रुपमधल्या पोरांमुळं एक ‘माज’ आलावता माझ्यात..

हळूहळू करीयरची गाडी मार्गावर येण्याची चिन्हं दिसू लागली, पण पिणं थांबेना. इतकी प्यायलोय – इत्तक्की प्यायलोय त्याकाळात… पण यामुळे सातार्‍यातल्या हितशत्रूंच्या ‘त्या’ टोळक्याला नविन विषय झाला… “किरण्या ॲक्टर चांगलाय पण लै पितो आणि शिव्या देतो.” त्यांना कुठूनतरी माझी ‘बदनामी’ हवी होती. मी आयतं खाद्य पुरवत होतो. खरंतर मी दारू पिऊन कधीही कुठलंही गैरकृत्य केलं नाही, पण माझ्याविषयी खोटे किस्से पसरवले जाऊ लागले.. मला टारगेट केलं गेलं. माझा ग्रुप फोडला.. खपून तयार केलेली पोरं सोडून गेली.. अर्थात यात माझीही चूक होती. एकटा पडलो. ज्यामुळे माझ्या मनाला यातना होऊ लागल्या. काहीही करुन माझ्या अभिनयाला झाकोळून टाकेल अशी कुठलीही गोष्ट मला करायची नव्हती.. खूप तडफडलो. दारू सोडावीशी वाटू लागली पण सुटणं अशक्य वाटत होतं. असं मानसिक द्वंद्व कधीच अनुभवलं नव्हतं. घुसमट-घुसमट झाली. चारभिंतीच्या डोंगरानं मध्यरात्रीच्या अंधारात माझे हंबरडे ऐकलेत.. माझ्या शेजारी प्रसन्न दाभोळकर नांवाचे मानसोपचार तज्ञ रहातात. मी त्यांचा सल्ला घेऊ लागलो. सावरू लागलो.

चौदा वर्षांपूर्वीचं ३१ डिसेंबर.. २००९ साल. समोर ‘ग्लेनफिडीच’ स्काॅचची बाॅटल ! बायकोला सांगीतलं ‘ही शेवटची.’ बेगम अख्तरच्या ग़ज़ला लावल्या. पहिला पेग भरला. डायरी घेतली.. यापुढे दारू बंद..आणि काय काय करायचंय-कशावर फोकस करायचाय हे लिहीत बसलो..रात्रभर.. आणि मुक्त झालो ! आजतागायत..

नोव्हेंबर २०११.. माझी प्रमुख भुमिका असलेल्या ‘श्री तशी सौ’ या नाटकाचा इंग्लंड-स्काॅटलंड दौरा होता. स्काॅटलंडच्या मित्रांनी अनपेक्षितपणे ‘ग्लेनफिडिच’ स्काॅचच्या फॅक्टरीत नेले. तिथं ती फॅक्टरी बघून झाल्यावर तिथल्या एका फाॅरीनर बाईनं मला फिफ्टिन इयर ओल्ड’ग्लेनफिडीच’चा पेग ऑफर केला. मी नम्रपणे नाकारला. लै लै लै शिव्या खाल्ल्या मी सगळ्यांच्या.. पण मला अजिबात खंत वाटली नाही.

दूसरा किस्सा.. नंतर पाचसहा महिन्यानंतर लता नार्वेकरांचा फोन आला, “अरे किरण, मला तू ‘मायलेकी’ नाटकासाठी हवा आहेस. मी तुला पंधरा दिवसांपूर्वीच फोन करणार होते, पण मला कुणीतरी सांगीतले की ‘त्याला घेऊ नका. तो खूप पितो’..मी मंगेश कांबळीला फोन केला. तर मंगेश म्हणाला ‘छे ! मी महिनाभर त्याच्यासोबत इंग्लंडमध्ये होतो. आमच्या टीममध्ये दारूच्या थेंबालाही स्पर्श न करणार्‍यांत किरण माने होता.’ मग माझी खात्री पटली. तू माझ्या नाटकात काम करशील का?”

माझे हितशत्रू हरले होते. मी जिंकलो होतो…

…सातआठ वर्षांपूर्वी शाहु कलामंदिरला नाटक पाहून कारमधून घरी येत होतो. रात्रीचे दिड वाजलेवते. रस्त्यात एक वृद्ध गृहस्थ हळूहळू चालत चाललेले पाठमोरे दिसले.. अरे ! हे तर गुलबहारचे पै काका !! मी कार थांबवली. म्हटलं “बसा काका, सोडतो घरी तुम्हाला.” काकांनी मला पाहिलं, निरखलं, डोळे चमकले, “किरणजी ! तुम्ही?हल्ली टीव्हीतच दिसता तुम्ही. बरीच वर्ष आला नाहीत बारमध्ये?” म्हटलं,”सोडली पै काका.. बरीच वर्ष झाली.” अचानक पै काका भावूक झाले. आवाज थरथरला. म्हणाले, “खूप बरं वाटलं बघा. अहो भलीभली माणसं संपलेली बघीतलीत मी माझ्या डोळ्यांनी. तुमचा अभिमान वाटला किरणजी.. मोठे व्हा.. खूप मोठ्ठे व्हा. मार्गातला मोठ्ठा अडथळा तुम्ही दूर केलाय. आता तुम्हाला कुणी अडवू शकणार नाही.”

..गाडी सुरू करून मी शांतपणे म्युझिक प्लेअरवर गुलाम अलीचं “हंगामा है क्यूं बरपा…” लावलं. पै काका गोड हसले. “ग़ज़लचं व्यसन मात्र सोडू नका बरं का !”

मी गुलामअलीसोबत गुणगुणलो..

“उस मय से नहीं मतलब, दिल जिस से हो बेगाना…
मक़्सूद हूं उस मय से, दिल ही में जो खिंचती है !” 😊


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading