तुकारामांचे वेगळेपण असे की त्यांनी आपल्या अभंगातून भेदभाव करण्याच्या या विघातक प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. आपल्या समाजव्यवस्थेतील या घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला. त्या अर्थाचे अभंग तुकारामांनी लिहिले. भेदाभेद भ्रम अमंगळ असे सांगत भेद करणाऱ्या धर्मशास्त्रावर हल्ला चढविला.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
आपणा लागे काम वाण्याघरी गुळ ।
त्याचे यतिकुळ काय की जे ॥ १ ॥
उकिरड्यावर वाढली तुळसी।
टाकावी ते कैसी ठायागुणे ॥ २ ॥
तुका म्हणे काय सलपटासी काज ।
फणसातील बीज काढूनी घ्यावे ॥३॥
समाज व्यवस्थेत जात, वर्ण यासारख्या कारणांनी होत असलेला भेदाभेद तुकारामांना मान्य नव्हता. असा भेदभाव, अशी विषमता समाजात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे माणसा-माणसात भेद करण्याची परंपरा जाचक ठरत आहे. समाजात एखाद्याला श्रेष्ठ वा हीन ठरविण्याचा निकष म्हणून त्याचे कर्तृत्व, शील, चारित्र्य, वर्तन इत्यादींचा विचार करण्याऐवजी त्याचा वर्ण व जात पाहिली जाते. ही प्रथा मानवी विकासाच्या खुलेपणाच्या वातावरणाला बाधक आहे. माणूसपण हिरावून घेणे घडत आहे. कनिष्ठ हीन लेखण्यामुळे त्या पिढ्या अंधारमय जीवन जगत आहेत. वर्ण, जात आधारित समाज व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम तुकाराम महाराजांच्या नजरेतून सुटले नाहीत.
तुकारामांचे वेगळेपण असे की त्यांनी आपल्या अभंगातून भेदभाव करण्याच्या या विघातक प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. आपल्या समाजव्यवस्थेतील या घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला. त्या अर्थाचे अभंग तुकारामांनी लिहिले. भेदाभेद भ्रम अमंगळ असे सांगत भेद करणाऱ्या धर्मशास्त्रावर हल्ला चढविला.
सामाजिक व्यवहारातील जातिनिरपेक्षता स्पष्ट करताना त्यांनी या अभंगात आपले विचार सांगितले. वाण्याच्या घरी असलेला गूळ मिळविण्याशी आपला संबंध असेल, तर त्याची जात, कूळ पाहण्याची काय गरज आहे ? गूळ ही गरज भागविणाऱ्या माणसाची जात पुसण्याचा रिकामटेकडा उद्योग व कूळ पाहण्याची उचापत करायची कशाला? असा रोखठोक सवाल विचारणारे तुकाराम महाराज म्हणजे व्यावहारिक उदाहरणाद्वारे समतेचा आचार-विचार सांगणारे संतश्रेष्ठ होय.
तुळस उकिरड्यावर वाढलेली असेल, तर तिच्या ठिकाणाकडे पाहून ती टाकून द्यावी काय ? तुळस कुठे वाढली यावरून तिच्यातील उपयुक्तता – गुण याचे मोजमाप करण्याची गरज काय ? औषधी गुण असलेल्या तुळशीचे मोल जाणणे हेच महत्त्वाचे ठरते. तद्वतच माणूस कोणत्या जातकुळीत जन्माला आला यावरून त्याचे कनिष्ठ-श्रेष्ठत्व ठरविण्याचा अधिकार देणारा धर्म नसून ती कसोटी धर्माच्या नावाखाली जातभेदाचे विष फैलावणाऱ्यांची विकृती आहे, असे त्यांना खडसावून सांगण्याचे धारिष्ट्य दाखविले.
फणसाच्या कवचाशी आपल्याला काय करायचे आहे. त्याच्या आतील गोड गरा खाणे हेच आपल्या हिताचे, तीच तर गरज! म्हणून फणसाच्या कवचाचा ओबडधोबडपणा, कठीणता या आधारे त्यास हीन लेखणे इष्ट नव्हे. आपला मतलब आतील गरा व बी याच्याशी आहे..
समाजाच्या सार्वजनिक व्यवहार करण्याच्या संदर्भात तुकारामांनी अभंगातून उदाहरणे देऊन सिद्धांत सांगितला. त्यांच्या मते, दैनंदिन व्यवहारावरच लक्ष केंद्रित करावे. हेच आपले गरजेचे आहे. ते व्यवहार ज्या व्यक्तीशी करायचे असतील त्या व्यक्तीच्या जातीचा विचार करू नये हा तो सिद्धांत होय. तो पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेली उदाहरणे मार्मिक आहेत. दुकानदारांची जात कोणती आहे याची दखल घेण्याची काय गरज ? गोड गूळ विकत घ्यायचा. त्याची जात आपल्यापेक्षा उच्च आहे की हीन याची चौकशी कशाला ? दैनंदिन जीवनातील व्यवहार जातीनिरपेक्ष पद्धतीने करण्याचा उपदेश ते करतात.
तुळशीचे तुळसपण, तिचे माहात्म्य, तिच्या अंगी असलेले गुणधर्म महत्त्वाचे आहेत. ती उकिरड्यावर उगवली म्हणून टाकाऊ नाही. त्याप्रमाणे गुणवान व्यक्तीचे गुण पाहणे हे महत्त्वाचे आहे. ती तथाकथित हीन, अथवा हलक्या कुळात जन्माला आली तरी तिला कमी लेखून दूर सारायचे नसते. वर्ण, जात वगैरे गोष्टी फणसाच्या वरवरच्या सालीसारख्या असतात. सालीकडे पाहून फणस नाकारणे म्हणजे मूर्खपणा होय. फणसाच्या गर व बियाचा रसाळ स्वादिष्ट गाभा चाखायला मिळणार कसा? जातीसारख्या बाह्य वरवरच्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा करंटेपणा केल्याने गुणी मनुष्याच्या संगतीचा लाभ होणार नाही.
नेल्सन मंडेला, विनी मंडेला, मार्टिन ल्युथर, मदर तेरेसा अशासारख्या महान मानवांनी केलेली मानवतावादी कामगिरी ही त्यांच्या वंश, जात, कुळी, रंग यासारख्या कसोट्या लावून मोजणं अशक्यप्राय. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची निवड हीच मुळी जातकुळीच्या पुढे जाऊन लोकशाही तत्त्वाच्या विजयाची ही पताका होय. जात, कुळी, वर्ण, वंशविरहित अशा प्रकारचे कार्य कर्तृत्वाचे मूल्यमापन केले जावे हा विचार उक्ती व कृती यांची प्रचिती आज जागतिक स्तरावर येत आहे. तुकारामांच्या विचारांच्या अंकुराला आलेली ही फळेच जणू ! दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देऊन अनुभवाचे महत्त्व ज्या ताकदीने त्यांनी शब्दबद्ध केले ते अतुलनीयच.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.