जळगाव – दोंडाईचा येथील साहित्यिका लतिका चौधरी यांची ‘बापाचे अभंग’ ही मराठी कविता जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ. वाय. बी. ए. या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
लतिका चौधरी या मराठी व अहिराणी भाषेतील कविता, कथा, कादंबरी, ललित, बालकाव्य अशा सर्वच प्रकारात दर्जेदार लेखन करणाऱ्या व स्त्रीवादी जाणिवेच्या काव्यलेखन करणाऱ्या लक्षवेधी कवयित्री आहेत. ’नियं आभाय’ , ‘नियतीना सूड'(अहिराणी काव्यसंग्रह), ‘खान्देशी बावनकशी’, ‘गल्लीनी भाऊबंदकी'(अहिराणी ललित गद्य), ‘भावसरोवर’, ‘माती’ (मराठी काव्यसंग्रह) अशी एकूण दहा पुस्तके प्रकाशित असून त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अनेक वाङ्मयीन नियतकालिकात त्यांचे काव्यलेखनही 20 वर्षांपासून सुरू आहे. मराठी कवितेला दिले जाणारे मानाचे वाङ्मयीन 16 पुरस्कारही त्यांना प्राप्त आहेत.
अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली कविता
बापाचे अभंग
बाप जीवनात
चारधाम तीर्थ
वाटतो कृतार्थ
सहवास ।।1।।
देत राही झुंज
निसर्ग शत्रूशी
शिवार मित्राशी
पोटासाठी ।।2।।
उसणं धाडस
हासू मुखावर
धाव सुखावर
घरासाठी ।।3।।
खचले पिचले
मन नांगरतो
नभ पांघरतो
विश्वासाचे ।।4।।
हिरवं शिवार
पीक डोलणारं
दार खोलणारं
आनंदाचं ।।5।।
उन्हा पावसात
कधी विर्घळावं
कधी पाझरावं
रानासाठी ।।6।।
पोरा-घरामागे
ठाकला अभंग
बाप पांडुरंग
लेकरांचा ।।7।।
लतिका चौधरी
दोंडाईचा , जि. धुळे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.