शेतकरी राजा…उठ ! या लेखाची एक संवादी अशी दिर्घ कविताच, आपल्याला अनुभवायला येते, सांप्रत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे, दुःखद संदर्भ या लेखात सापडतात. राजा म्हणून जगण्याच्या लायकीची न सोडणारी, अस्मानी – सुल्तानीची मालीका शेतकऱ्याला पार उध्वस्त करते, याची वेदना यात आहे.
रवींद्र जवादे
समतानगर, मूर्तिजापूर,
जिल्हा. अकोला
444107
नवनिर्मीतीमध्ये गुंतलेलं सृजनशील मन व हात, केवळ सृजन करुन वेगळं न होता; अखिल मानवजातीचा विचार करुन वागणारं असेल तर, सभोवतालचं जगणं निश्चितच अधिक सुंदर होण्यासाठीची एक निर्मळ संधी मिळाल्यासारखं होईल.अलीकडे हे तर फार महत्वाचं झालेलं आहे!प्रथितयश लेखिका, कवयित्री लतिका चौधरी यांच्या सुप्रसिध्द गवाक्ष या ललित लेखाची मनभावन अर्पण पत्रिका वाचली की, आपल्याला या लेखिकेच्या मनातील माणूसस्नेही विचारांचा नेमका अर्थ कळतो.’ आठवणीच्या गाभाऱ्यातील माणसे, चोचीत दाणे देणारा बळीराजा, मनाच्या अंगणी घिरटया घालणारी पाखरे, रेंगाळणारे संकल्प !..’ आणखी बरचंसं असं मनस्नेही, वाचनिय ! मुळात ही अर्पण पात्रिकाच वाचनिय अशी झालेली आहे.
लतिका चौधरी यांचा हा संग्रह, वैविध्यपूर्ण अशा तिस ललित लेखांनी समृध्द झालेला आहे. मनाच्या हळव्या, स्नेहाळ झरोक्यातून, जीवनातील संगती नि विसंगतीपूर्ण प्रसंगांकडे; मायाळु नजरेनेपण तेवढ्याच तटस्थपणे पाहणे लेखिकेला सहज जमले आहे. यातील लेख वाचताना वाचकाला हे सतत जाणवत राहाते. वाचकही आपल्या जीवनात घडून गेलेल्या, पुस्तकातील एखाद्या लेखाशी वा त्यातील प्रसंगांशी; नकळतच स्वतःला जोडू पाहतो, त्याचा पुन: प्रत्यय घेतो. हे अतिशय महत्वाचे आहे आणि हेच लेखनाचे महत्वाचे गमकही आहे ! लतिका चौधरी यांचं साहित्य विश्व अतिशय समृध्द असं राहिलेलं आहे. याआधी विविध वाङ्मय प्रकाराची, नऊ पुस्तकं त्यांनी रसिकांच्या भावविश्वाला साद घालत, उपलब्ध करुन दिलेली आहेत.
नेमके आशयपुरक शब्द, जगण्याचं नेमकं भान ठेवणारी सभोवतालची नि खान्देशातील लाघवी भाषा, अवघड – सुघड प्रसंग, उत्तरोत्तर वाढत जाणारं समृध्द असं आशयसुत्र ! आणि विशेष म्हणजे, काही लेख, प्रसंगातून जगण्याचं गणित अवघड वाटत असताना; लेखिकेचा जीवनाकडे पाहण्याचा एक लोभस, सकारात्मक दृष्टीकोन या लेखांतून वाचंकांना प्रत्ययास येतो. अनुभवसमृध्द चांदण्यांचं एक निरभ्र आभाळ, काजळरेषेच्या पलीकडे लकाकत असल्याचं या लेखांमधून सतत जाणवत राहतं ! सृष्टीने, निसर्गाने स्त्रीयांच्या वाट्याला अधिकच जबाबदारीचं दान, अगदी भरून – भरून दिलेलं आहे. जगणं परिपूर्ण करणं, संघर्षातही न हारणं, दुर्दम्य अशी लढाऊ वृत्ती; स्त्रीयांच्याच ठायी पदोपदी दिसून येते. मग हे स्त्रीरुप आई, पत्नी, बहिण, सखी वा आणखीही कुठलं असो !
आयुष्य, या सुखमय रूपांच्या सोबतीणचं अधिक सुखकारक होतं, हे मात्र निश्चित ! संग्रहातील, आई समजणाऱ्या..,घराशी एकरूप ती !, राजकन्या योगिनी, ‘स्त्री’-उपटल्या मुळांची वेल..तरीही.., हे रूपगर्विते, विद्यार्थिनींना घडवते ‘दुर्गा,चंडी’म्हणून.., हे ललितलेख, स्त्रीयांचं मानवी जीवनातील महत्व अधोरेखीत करतात; नव्हे,जगणं समृध्द होण्याचं यशोगुपीत सांगतात ! या लेखातील स्त्रीवाट्याचा संघर्ष, दुःख – वेदना, कारूण्य, स्नेह, हृद्यभाषा नि झुंजण्याचं चिवटपण; वाचकाला मनातून हलवून सोडते. सभोवतालचा मायाळू नि जीव लावणारा स्नेहाळ निसर्ग, कुठल्याही लिहीत्या मनाला अलवार साद घातल्याशिवाय राहात नाही. नवनिर्मीतीचं प्राणतत्वच मुळात निसर्गाच्या हाकेतच ऐकू येतं.
भाषेला रसाळ वाक्यांची भरपूर रसद आणि शब्दांचं काळजातलं अनोखं लावण्य लेखनिच्या माध्यमातून; निसर्गाच्या साध्या एका कटाक्षानं, पाना – पानांवरून बागडू लागतं. प्रत्येक ऋतूचं देखणं लावण्य, त्या – त्या ऋतू ओढीनं लगबगीनं आलेले संमजसं, आनंदी सणवार – सोहळे, प्रसंग, मानवी मनांचा उतू जाणारा उत्साह, घडणाऱ्या घटना, असोशीनं हृदयात जपून ठेवावेसे वाटणारे प्रेमळ क्षण; निसर्गाच्या वा या ओढाळ ऋतूंच्या साक्षीनंच अनुभवलेले असतात. मग त्यात काही काळीज जखमाही असतात, आयुष्यभर कधीच न बसणाऱ्या ! हिरवा कोपरा, प्रणयी प्रपंच पारव्याचा, बालपणीच्या..,पाऊस अंकुरलाय, आखाजी आठवणीतली, सातपुरा सहल.., नाचत आला श्रावण, ढगाळ काळीमा, ह्या व इतर वाचनिय अशा लेखांतून वाचक मन नकळतच लेखिकेच्या, लेखनाच्या मागोमाग जाऊ लागतं !
शेतकरी राजा..उठ ! या लेखाची एक संवादी अशी दिर्घ कविताच, आपल्याला अनुभवायला येते, सांप्रत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे, दुःखद संदर्भ या लेखात सापडतात. राजा म्हणून जगण्याच्या लायकीची न सोडणारी, अस्मानी – सुल्तानीची मालीका शेतकऱ्याला पार उध्वस्त करते, याची वेदना यात आहे. तसेच केवळ लेखक, कवींच्याच नव्हे तर, सर्वसामान्यांच्याही फारसा वाट्याला न येणाऱ्या बापाचं ओढाळ स्नेहचित्र; लेखिकेने मुक्त छंदातील – मुक्त बाप ! या लेखातून चितारले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान माणसांच्या सुविधेसाठी, चांगल्या कार्यासाठी नि खरेतर विकासासाठी वापरायला हवे. पण, वाटस्अॅपसारखी तंत्रज्ञाची साधनं, मानवी कलह, व्देष व हेवे – दावे वाढवण्यात अग्रेसर असल्याचं जाणवतं..काही कथीत मेंदूंची विकृती, तंत्रज्ञानाला बदनाम करते. वाटस्अॅपची आभासी दुनिया यातून हे अनुभवास येतं. गवाक्षमधील अनेक वाचनिय लेखातून, वाचकाला वाचनसमृध्दीचा व घटना, प्रसंग अनुभवल्याचा आनंद मिळतो. कवितेच्या ओळींची पखरण, छानसे संवाद, बोलीभाषा व सुयोग्य म्हणींचा वापर, जगण्यातली उदाहरणे – संदर्भ, अनुभव संचित नि काव्याच्या जवळ जाणारी लेखशैली; गवाक्षची जमेची बाजू आहे. खरंतर, गवाक्ष म्हणजे माणुसकीच्या स्नेहाळ आभाळाकडे पाहण्याची, एक मर्मज्ञ नजर!
◆ गवाक्ष – ललित लेखसंग्रह
◆ लेखिका – लतिका चौधरी
◆ प्रकाशन – दिशोत्तमा प्रकाशन, नाशिक
◆ पृष्ठे – १३२
◆ किंमत – १८० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.