जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-२
३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सव अंतर्गत १० कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा…यामध्ये आज प्रभा सोनवणे यांच्या कार्याचा परिचय…ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
प्रभा सोनवणे, लेखिका, कवयित्री, संपादक, अनेक काव्यसंस्थांवर पदाधिकारी म्हणून काम पाहाणाऱ्या, ज्या सुमारे ५० वर्ष कवितेची आराधना करत आहेत. माझा त्यांचा परिचय हा कवयित्री या नात्याने सुमारे १५ वर्षांपूर्वी झाला. काही नाती ही सोशल मीडियामुळे अधिक घट्ट होतात त्यांपैकी प्रभाताई एक..!
प्रभाताईंचा जन्म २० नोव्हेंबर १९५६ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला या छोट्याशा गावातील सधन बागायतदार शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुमारे पन्नास वर्षे गावचे पोलिस पाटील होते. ताईंचे आजोबा शेतीनिष्ठ शेतकरी होते. त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमधे मॅट्रिकच्या वर्गात शिकत असतानाच वडिलांना शेती करण्यासाठी गावाकडे नेले, पुढे त्यांनी खूप चांगली शेती आणि पैलवानकीही केली. आई सुशिक्षित देशमुख घराण्यातील होती.
प्रभाताई शाळेत फार अभ्यासू व हुशार नव्हत्या पण शालेय जीवनापासूनच कविता, कथा लेखनास त्यांची सुरुवात झाली. विद्याधाम प्रशाला शिरूर येथे इ. ८ वीत असताना शाळेतील हस्तलिखितासाठी पहिली कथा व कविता त्यांनी लिहिली. वाचनाची त्यांना खूप आवड असल्याने शालेय जीवनात कथा कादंबऱ्या खूप वाचल्या. हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे वर्गाच्या नियतकालिकाचं लेखन करायची जबाबदारी प्रभाताई आणि त्यांच्या एका मैत्रीणीवर असे.
‘शैलजाताई मी फार कर्तृत्ववान आहे असं मला वाटत नाही पण माझं आयुष्य वेगळं आहे, मराठा समाजातल्या बायकांपेक्षा !’ असं म्हणून प्रभाताई सांगू लागल्या, ‘शालेय जीवनातच कथा व कविता सुचली पण तेव्हा माहित नव्हतं पुढील आयुष्यात आपण लेखक, कवी व संपादक बनू. ११ वी नंतर मी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला पण एफवाय ला असताना काही कारणाने कॅालेजचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं तेव्हा माझी आजी (आईची आई) म्हणाली, ‘तुझा मोठा भाऊ शिकतोय, धाकटी बहिण शिकतेय तू पण ग्रॅज्युएट हो नाहीतर तुला लोक ‘ढ’ समजतील. मी ‘ढ’ नक्कीच नव्हते. त्यामुळे पुढे लग्नानंतरही शिकत राहिले.’ ताई जुन्या आठवणीत रमल्या.
आजच्यासारखा तेव्हा सोशल मीडिया किंवा करमणुकीची विविध साधने नव्हती. रेडिओ हा सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होता.
त्यामुळे ताई रेडिओ खूप ऐकायच्या. “रेडिओ श्रीलंका” लिसनर्स क्लबच्या रेडिओ पत्रिकांमधून ताईंच्या हिंदी कविता प्रकाशित होऊ लागल्या. तसेच अनेक ठिकाणी ताईंच्या कवितांना मासिके, साप्ताहिके, नियतकालिकामधे छापील प्रसिद्धीही खूप लवकर मिळाली. १९७५ मधेच वयाच्या १९ व्या वर्षापासून विविध साप्ताहिकातून, मासिकातून, दिवाळी अंकांमधून सातत्याने ताईंच्या कथा, कविता, ललित लेख, मुलाखती प्रकाशित झाल्या.
ताई पुढे सांगू लागल्या, ‘मी मुळीच महत्वाकांक्षी नव्हते, लहानपणी खूप भित्री आणि मुळूमुळू रडणारी होते. त्याकाळात ११ वी झाल्यावर लगेच मुलींची लग्न होत, ९ वीत असल्यापासून लोक स्थळं सुचवायला लागले होते. माझी धाकटी बहिण ११ वीला शिरूर तालुक्यात पहिली आली होती. एमएस्सी. पीएच.डी. होऊन कॅालेजमधे प्रोफेसर झाली. विभाग प्रमुख, उपप्राचार्य होऊन निवृत्त झाली.
जर मी जिद्दीने शिकले असते तर लग्नाआधीच मराठीची प्राध्यापक झाले असते असं माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते पण माझी मावशी म्हणते, “बरं झालं प्राध्यापक झाली नाहीस, आयुष्य सिमित राहिलं असतं, साहित्यिक झाल्यामुळे तुझ्या कक्षा रूंदावल्या.’’
विसाव्या वर्षी ताईंचं लग्न झालं. सासरे पुण्यातील प्रसिद्ध दुग्धव्यावसायिक व पती सुद्धा वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय आणि शेती करत होते. घरातील वातावरण जुन्या वळणाचं, पारंपरिक मराठा पाटील घराणं. नवऱ्यानं लग्न झालं तेव्हाच सांगितलं होतं, ‘ते कविता- बविता, शेरोशायरी मला आवडत नाही. कॅालेजमधे असताना मित्र शेरोशायरी ऐकवायला लागले की माझं डोकं दुखायचं.’ हे ऐकून ताई एकदम स्तब्ध झाल्या. सुमारे ४५-५० वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींना काही बोलायची सोय नव्हती.
लग्नानंतर ७-८ वर्षे ताईंनी काहीच लिहिलं नाही पण कविता सुचत होत्या. त्यानंतर हळूहळू ताईंच्या कविता स्वराज्य, अलका, गृहलक्ष्मी यासारख्या मासिकात प्रसिद्ध होत होत्या. लोकप्रभात प्रसिद्ध झालेल्या एका कवितेला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पस्तीस चाळीस प्रशंसा पत्र आली, तेव्हा ताईंचा मुलगा लेटर बॉक्स मधली पत्रं आणून द्यायचा, आणि म्हणायचा “आई तुझ्या फॅनचं पत्र !” हे ऐकून ‘माझ्यातल्या सर्जनशील कवयित्रीचा मलाच शोध लागला.’ असे म्हणून ताई थांबल्या. कारण इथपर्यंतचा ताईंचा प्रवास घरबसल्या होता. ताईंचा मुलगा व सून इंजिनियर आहे. नातू अकरावी सायन्सला असून कविता करतो, त्याने ८ वीत असताना एक कादंबरी (फॅन्टसी) लिहिली. ती अमेझॅानवर प्रकाशित झाली आहे.
‘आता घरातून विरोध होत नाही पण कवितेची कुणाला विशेष आवड नसल्यामुळे मी कवयित्री असल्याचं कुणाला काही विशेष वाटत नाही. पण मी आयुष्यच कवितेत झोकून दिल्यामुळे माझा “हा एकला चलो रे ऽऽ” चाच प्रवास सुरु आहे.’ थोडं थांबून त्या पुढे सांगू लागल्या, ‘खरी लढाई घरातून बाहेर पडण्याची होती.”बहिणाई” मासिकाचं कविता वाचनासाठी पहिलं आमंत्रण आलं. टिळक स्मारक मंदिरात कविवर्य वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखालील या संमेलनात पहिली कविता वाचली. बाहेर जाऊन एका व्यासपीठावर कविता वाचावी असं अजिबातच घरातलं वातावरण नव्हतं, विरोध झाला. तरीही घरातून कुठलंही प्रोत्साहन नसताना मराठी विषय घेऊन एम.ए. केलं.
स्वतःचा”अभिमानश्री” नावाचा दिवाळी अंक सुरू करून तो चार वर्षे चालवला. पुणे आकाशवाणीवर कविता सादर केल्या, अनेक वर्ष ग्रामीण भागातील चालू घडामोडींवर आधारित ‘चालू जमाना’ या श्रुतिकामालेचं लेखन केलं. मुंबई दूरदर्शन वर कविता वाचन, पुणे दूरदर्शनवर गझल मैफिलीचं निवेदन केलं. कथा,कविता, मुलाखती असं विपुल लेखन केलं. १९८७\८८ पासून पुण्यातील काव्यक्षेत्रात वावर सुरु झाला. काव्यशिल्पमुळे कवितेला दिशा मिळाली. पुण्यात आणि महाराष्ट्राबाहेरही कवितेच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम केले. नागपूर आणि उस्मानाबाद येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग घेतला. “गझल सागर” च्या अखिल भारतीय गझल संमेलनातही अनेक वर्ष सहभागी झाले. सकाळ नाट्यवाचन स्पर्धा, जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्यस्पर्धेची परीक्षक म्हणून काम पाहिले. अनेक साहित्य विषयक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. रंगत संगत प्रतिष्ठानचा काव्य जीवनगौरव, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा काव्य योगिनी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.’
कविता हा ताईंच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. मधु मंगेश कर्णिक यांच्या कविता संग्रहावर विशाखा मासिकात ताईंनी केलेले रसग्रहण पाहून मधुभाईंचा कौतुक करणारा फोन आला, तो लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकातही घेतला त्याक्षणी कवयित्री म्हणून खूप तृप्तता लाभली असे ताई आनंदाने सांगतात. ताई ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आणि सामाजिक स्तरातून आल्या तिथे हे सारं करणं एक दिव्यच होतं. आयुष्याची लढाई मात्र मी निकराने लढले. अशी भावना त्या व्यक्त करतात.
खरंतर ताईंची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आणि त्यांचा स्वभाव व विचार वेगळे होते. इरावती कर्वे, विद्या बाळ, छाया दातार, गौरी देशपांडे यांच्या लेखनाचा ताईंवर प्रभाव असल्याने त्यांना स्वभाव व विचार विरोधी वागायला लागले तेव्हा किती जड गेले असेल याची कल्पना येऊ शकते. गौरी देशपांडेच्या समग्र साहित्यावर ताई पीएच. डी.करत होत्या. पण त्यांची जिद्द, चिकाटी कमी पडली. कवितेच्या वेडामुळे कवितेचे कार्यक्रम त्यांना नाकारता आले नाही, सरांनी सांगितले, तुमचे इतर अनावश्यक उद्योग पूर्ण बंद करा. पण ते न जमल्याने पीएच.डी. मात्र अर्धवट राहिली अशी खंत आज त्या व्यक्त करतात.
ताईंचे अनिकेत, जाईजुई, व मृगचांदणी
हे तीन कविता संग्रह तर काही पुस्तके संपादित आहेत. त्यांना साहित्यसेवेसाठी सुमारे २० मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
आपले पूर्ण आयुष्य कवितेला वाहिलेल्या, आज वयाच्या सत्तरीतही तितक्याच उत्साहाने कवीसंमेलनात सहभागी होणाऱ्या, संसार व कविता अशी तारेवरची कसरत करणाऱ्या, कवीमनाच्या या जिजाऊ – सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.