॥ शेताची सीता : वैदिक शेती ॥
वेद ही आर्यांची निर्मिती होती हे आता निर्विवादच आहे. वेदांची निर्मिती चार ते पाच हजार वर्षांपूर्वीची मानली जाते. तेव्हाच्या लोकांच्या शेतीविषयक धारणा काय होत्या हे समजून घेण्यासाठी वेदांचा आधार घ्यावा लागतो. वेदपूर्वकालीन अनार्यांची शेतीसंस्कृती आपण मागच्या प्रकरणात पाहिली आहे. आता आपण आर्यांची म्हणजे वेदातील शेतीविषयक धारणा काय होती ते पाहूयात.
इंद्रजीत भालेराव
आर्यांच्या सुरूवातीच्या देवकल्पना या निसर्ग घटकाशी संबंधित होत्या. निसर्गातल्या प्रभावशाली दृश्यांना आणि शक्तींना आर्य देव समजत असत. कार्यक्षेत्रानुसार या देवतांचे तीन प्रकार होते. पृथ्वी, आकाश आणि स्वर्गातील देव असे ते स्तर होते. इंद्र, अग्नी, सोम या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. सूर्य, आकाश, वायू , उषा, वरून, मित्र, पर्जन्य या सर्व देवतांवर आपलं सुख समाधान आधारित आहे असं आर्यांना वाटत असे. त्या त्यांच्या प्रमुख देवता होत्या.
या पाठोपाठ त्यांच्या आणखीही काही देवता होत्या, ज्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित समजलं जात असे. त्यात क्षेत्रपती, वास्तुष्पती, सीता आणि उर्वरा यांचा समावेश होतो. या सगळ्या देवता कृषीसंबंधित होत्या. त्यांना आर्य गौण समजत असत. त्यांना गौण समजण्यामागचं कारण कदाचित असं असावं की सुरुवातीच्या काळात आर्य हे कृषी उत्पन्नावर आधारित नसावेत. पशुधनाच्या विपुलतेमुळे त्यांना शेत गौण वाटत असावे. म्हणूनच त्यांना शेतीविषयक देवताही कदाचित गौण वाटत असाव्यात. पण त्यांच्या देवगणात या शेतीविषयक देवतांचा समावेश होता एवढं मात्र खरं. ऋग्वेदात तर शेतीविषयक शब्द केवळ एकदाच येतो. २-७ मंडलात हा उल्लेख पाहायला मिळतो. ऋग्वेद हा सर्वात आधीचा वेद समजला जातो. हे सूक्त ऋग्वेदातल्या सर्वात आधी रचलेल्या दहाव्या मंडळाच्या काळातलं समजलं जातं. ऋग्वेदापासून गुह्यसूत्रांपर्यंत आलेले कृषी विषयक संदर्भ आपण आता तपशीलवार पाहूयात.
आर्यांनी ज्या चार देवता गौण मानल्या त्यातल्या दोन देवता नेमक्या कोणत्या ते पाहूयात. त्यातली पहिली आहे क्षेत्रपती. क्षेत्रपती म्हणजे आजच्या भाषेत क्षेत्रपाल. शेताच्या सीमेचे रक्षण करणारी देवता. क्षेत्र म्हणजे शेत आणि पाल म्हणजे पालन करणारा. जसा आजचा ग्रंथपाल हा शब्द आहे, तसाच हा क्षेत्रपाल. या क्षेत्रपाल देवता आजही शेतांच्या किंवा गावाच्या सीमेवर मांडलेल्या असतात. म्हसोबा, मुंजा, वेताळ असं आज आपण त्यांना म्हणतो. महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांची विविध नावं पाहायला मिळतात. दुसरी जी वास्तूष्पत्ती म्हणून देवता आहे तिला आज आपण वास्तुपुरुष असे म्हणतो. त्याविषयी वेगळे काही सांगण्याची गरज नसावी.
यातल्या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या सीता आणि उर्वरा. त्यातही सीता सगळ्यात महत्त्वाची. इथल्या सीतेचा रामायणातल्या सीतेशी काहीही संबंध नाही. ही सीता म्हणजे शेतीची अधिष्ठातरी देवता आहे. हिची प्रार्थना करणाऱ्या अनेक ऋचा आणि मंडले वेदात पाहायला मिळतात. त्याविषयी आता आपण सविस्तर पाहणार आहोत. ऋग्वेदाची सुक्ते प्रामुख्याने एकाच देवतेशी संबंधित असतात. पण ज्या सुक्तात सीता असते तिथं अनेक कृषी देवतांना प्रार्थना केली जाते. जाणकारांचं मत असं आहे की या प्रार्थना म्हणजे अनेक स्वतंत्र मंत्रांचे अवशेष असावेत, जी एकाच सुक्तात संकलित करून ठेवण्यात आलेली आहेत. हे सूक्त ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलात येतं. यातल्या पहिल्या तीन छंदात क्षेत्रपतीला प्रार्थना केलेली आहे. शून आणि शुनासीर या देवतांनाही प्रार्थना केलेल्या आहेत. पण ईथं प्राधान्य आहे ते शेतीची अधिष्ठात्री देवता सीता हिला. या सर्व सूक्तांचा समवृत्तातला मराठी अनुवाद विश्वनाथ खैरे या भाषाभ्यासकांनी केलेला आहे. ‘वेद म्हणजे ज्ञान आणि वेदांत म्हणजे परम आध्यात्मिक ज्ञान असे मानणारी भारतीय परंपरा आणि इंद्र म्हणजे मूळच्या आक्रमक आर्यांचा मानवी नेता असे सांगणारी आधुनिक इतिहासकारी, या दोन्ही पूर्वग्रहांच्या काचा दूर ठेवून डोळसपणे वेदांचे वाचन केले तर या लोक वाङ्मयाचे आपले आकलन बरेच निर्मळ होईल’ हे मत आहे भारतीय मिथ्यांचा मागोवा घेणाऱ्या विश्वनाथ खैरे यांचे. वेदांना शेतकऱ्यांचे लोकवाङ्मय समजून त्याचा मराठी वाचकांना परिचय करून देण्यासाठी खैरे यांनी ‘वेदातील गाणी’ नावाचे वेदातील ऋचांचा अनुवाद सादर करणारे एक छान पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे ग्रामीण कवितांचा जणू संग्रहच आहे. पुढील सूक्त त्यातीलच आहे.
कृषीसूक्त
आम्ही शेताजी देवाच्या जिवावर करू जैत
गाई घोडे पोसतो तो देतो आम्हाला संतोष
शेताजी देवाजी, गोड गोड पाणी
बरसावे गाईच्या धारेवानी
मधाळ कढीव तुपावाणी
आम्हा सुख द्यावे न्यायाच्या देवांनी
झाडे पाले पाणी गोड असावेत
स्वर्ग अंतराळ गोड असावेत
शेताच्या देवाजी आम्हा गोड असो
त्याच्यामागे आम्ही आनंदाने जातो
कल्याण बैलांचे तसे माणसांचे
कल्याण करो या शेतांचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड
अथर्ववेदात ‘सीरा युंजंती’ नावाचा मंत्र आहे. ज्यात काहीसे वरच्यासारखे अर्थ पाहायला मिळतात. या सगळ्या मंत्रांचा अर्थ लक्षात घेतला की सीता म्हणजे नांगराचे तास असाही या शब्दाचा अर्थ होतो. लक्षणेने हाच अर्थ धरित्री असाही घ्यावा लागतो. म्हणजे या सगळ्या प्रार्थना धरित्रीच्या, भूमीच्या, शेतीच्याही समजायला हरकत नाही. इथं शेतात नांगराच्या तासात मध आणि तुपाच्या धारा सोडून कृषीयज्ञ केला जातो आणि शेताच्या भरभराटीची प्रार्थना केली जाते. इथले हे वर्णन वाचताना मला मी माझ्या लहानपणी आमच्या शेतात पाहिलेला वाफधावन हा विधी आठवतो. पेरणी संपली की शेवटच्या तासाला तिफन उभी करून, ढेकळांचे पाच देव मांडून, ते चुण्याने रंगवून, त्यावर हळदीकुंकू वाहून, त्यांना निवदबोनं दाखवलं जातं आणि पेरणीसाठी मदत करणाऱ्या सगळ्यांना आनंदाचं जेवन दिलं जातं. जमिनीपासून बैलांपर्यंत पेरणीत सहभागी असलेल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली जाते. मला वाटतं आर्यांच्या कृषीयज्ञाचेच हे अवशेष असावेत. या विधीला आमच्याकडे वाफधावन असे म्हणतात. माझ्या पीकपाणी या संग्रहातल्या शेवटच्या हंगाम कवितेतला एक तुकडा मी याच विधीवर लिहिलेला आहे. तो इथे मुद्दाम देत आहे.
आता पेरणी सरली वाफधावनीला चल
बईलाचं तिर्थमीचं तिफणीचं मानू मोल
साती आसरांचा ढव उंबरजाळीच्या ढेल्यात
पाचा ढेकळांचा देव चुना लावून उन्हात
ढेकळाचा रान देव त्याला सांज्याचा निवद
सांजं वाढू दे रानाचं यंदा नको वदवद
रासनकऱ्याला आहेर सुताराला कुडतं टोपी
सवासीन तिफणीला खणा नारळाची ओटी
पेरलेल्या ढेकळाच्या रानी बसली पंगत
सालोसालची आबादी आले मथारे सांगत
बारा वर्षानं पाहिली यंदा मिर्गीपेर झाली
साधलंतं महापूर नाहीतर कोण वाली
चाडं नळं उतरून काव जुवाची उडंल
ताशी लागल्या धानात आता कोळपं बुडंल
वैदिक वाङ्मयापेक्षा गृह्यसूत्रात सीताविषयक सुक्ते अधिक पाहायला मिळतात. कारण गुह्यसूत्रांची रचना खूप नंतरची आहे. तोपर्यंत शेतीचं महत्व वाढलेलं असावं. गुह्यसूत्रातल्या विधीत शेतात नांगराने सितारेषा ओढून, तिथं सर्व देवतांना आवाहन करून, थालीपाकाचा नैवेद्य दाखवून, ‘सीरा युंजंती’ मंत्र म्हटला जातो. शेतातच अग्नी प्रज्वलित करून तिथेच तयार केलेला निवद दाखवला जातो. याला आजच्या भाषेत ‘हिवसं बोनं’ असं आपण म्हणतो. त्यावर दही असतं म्हणून त्याला हिवसं बोनं म्हणायचं. किंवा शेतात उतू घालणं असंही म्हणतात. ज्या दिशेला उतू गेलं तिकडं सुगी जास्त येते, असंही समजलं जातं. हे सगळं पाहिल्यावर म्हणावसं वाटतं की वेदकालीन शेतीचे पुष्कळच अवशेष माझ्या लहानपणापर्यंत जिवंत होते. मी पाहिलेले होते आणि अनुभवलेलेही होते.
माझ्या ‘गाई घरा आल्या’ या पुस्तकाच्या सुरुवातीला मी वेदातील एक सुक्त टाकलेलं होतं. त्याला आपण गोसुक्त असंही म्हणू शकतो. तेही यादृष्टीने पाहण्यासारखं आहे. याचा अनुवाद मात्र मी केलेला आहे. त्याची मांडणी आधुनिक कवितेसारखी मुद्दामच केलेली आहे. पण मूळ आशयाला धक्का लागू दिलेला नाही. ते गोसुक्त असे,
धेनुंनो,
तुम्ही दुर्बल माणसाला
सबल बनवता
दुर्मुख माणसाला
तेजस्वी बनवता
तुमचा हंबर मंगलकारक आहे
तुमच्या सामर्थ्याचे
सर्वांना कौतुक आहे
तुम्हाला खंडीभर वासरे आहेत
तुम्ही कोवळे लूस गवत खाता
नदीचे निर्मळ पाणी पिता
चोराची मात्रा तुमच्यावर न चालो
प्रमत्त पातक्यांचीही मात्रा
तुमच्यावर न चालो
रुद्राचे शस्त्र तुमच्याकडे न वळो
ऋग्वेद : ६०२८, ६-७
वेदवाङ्मयात जशी सीता ही कृषीची अधिष्ठात्री देवता होती तशीच ती पुढे महाभारतातही येते. द्रोणपर्वातल्या जयद्रथ पर्वांतर्गत ध्वजवर्णन अध्यायात ‘कृषीची अधिष्ठात्री देवी, सर्व बिजांची निर्माती सीता’ असा उल्लेख आलेला आहे. ‘तू शेतकऱ्यांची सीता आहेस आणि जित्राबांची धरणी आहेस’ असाही उल्लेख महाभारतात येतो. ‘बौद्ध अभिधर्म महाविभाषा’ या बौद्ध ग्रंथातही असा उल्लेख आलेला आहे की, ‘शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करून शरदात भरपूर पीक घेतात हे त्यांना मिळालेलं सीतेचंच वरदान आहे’
याचा अर्थ वेदात आलेली कृषीची अधिष्ठात्री देवी सीता ही पुढे अनेक शतकात निर्माण झालेल्या ग्रंथावरही प्रभाव टाकत राहिली. इतकच नाही तर प्रत्यक्ष रामायणातल्या सीतेवरही वेदातल्या सीतेचा प्रभाव आहेच. भूमीतूनच जन्माला आलेली आणि शेवटीही भूमितच गडप झालेली अयोनिजा सीता ही या वेदातल्या शेतीचीच पडसावली आहे असं म्हणायला हरकत नसावी. विदर्भात अजूनही सीतादही हा कार्यक्रम केला जातो. सुप्रसिद्ध वैधर्भी चित्रकार सुनील यावलीकर यांनी या विधीवर एक चित्र साकारलेलं समाज माध्यमावर पाहायला मिळालं. ते चित्र..
अथर्ववेद हा प्रामुख्याने विविध गोष्टी साध्य करण्यासाठी म्हणावयाच्या मंत्रांचा संग्रह आहे. अथर्व वेदात अशा मंत्रांचे एकूण दहा विभाग आहेत. त्यातील ‘पौष्टिक कर्म’ या आठव्या विभागात शेतकरी, पशुपालक व व्यापारी यांच्यासाठी मंत्र दिलेले आहेत. त्यात नांगरणी करताना, पेरणी करताना म्हणावयाचे मंत्र आहेत. तसेच भरपूर पाऊस पडावा म्हणून, उंदरांचा व किडींचा नाश व्हावा म्हणून, गाई बैलांचे संरक्षण व्हावे म्हणून, त्यांची उपयुक्तता वाढावी म्हणून म्हणावयाचे मंत्र देखील आहेत. हा सगळा वेद तंत्रमंत्र यांनी भरलेला असल्यामुळे तो इतर वेदांपेक्षा कमी समजला जात असे. काही लोक तर पहिल्या तीनच वेदाचा उल्लेख करीत अथर्ववेदाचा उल्लेखही करीत नसत.
अफगाणिस्थान, पख्तुनीस्थान, पंजाब, गंगा-यमुनेचा दुआब ते बिहार पर्यंतचा भूगोल, हा वेदातील भूगोल आहे. वेदात येणारे सर्व संदर्भ याच भागातले आहेत. आजच्या भूगोलाच्या भाषेत सांगायचे तर हा सगळा उत्तर भारताचा पट्टा आहे. वेदातली शेतीसंस्कृती याच भागात घडते. इथला निसर्ग मुळातच समृद्ध आणि अनुकूल असल्यामुळे इथं आर्यांची वैदिक संस्कृती भरभराटीला आली. कोसोन कोस पसरलेली हिरवी कुरणे आणि पाण्याने धो धो भरून वाहणाऱ्या नद्या, असा हा सुजलाम सुफलाम भाग असल्यामुळे आर्यांचे उत्पन्न आणि व्यापार प्रगत झाला. गाई, बैल, घोडे, शेळ्या, मेंढ्या, गाढव, हत्ती, उंट, म्हैश या प्राण्यांचा उल्लेख वेदातून वेळोवेळी येतो. हे प्राणी त्यांना मांसान्न म्हणून, दूध दुभत्यासाठी म्हणून, वाहतुकीसाठी म्हणून व लोकरीच्या वस्तूसाठी म्हणून उपयोगी पडत असाही संदर्भ आहे. त्या काळात आर्थिक मुद्रा विकसित झालेली नसल्यामुळे या प्राण्यांचा उपयोग बाजारात देवघीवीसाठी वस्तूविनिमयासारखा देखील केला जात असल्याचा उल्लेख सापडतो.
सोम हे मादक पेय देणारी वनस्पती ही त्या काळातील बाजारातील सगळ्यात महाग वस्तू होती. एका सोमवल्लीच्या बदल्यात तेव्हा दहा जनावरे द्यावी लागत. सोमरसाची तुलना अमृत, मदन आणि स्वर्गाशी केली जात असे. त्या काळात संपत्ती म्हणून शेतीपेक्षा जनावरांना जास्त किंमत होती. पशुधनाची श्रीमंती कशाहीपेक्षा जास्त श्रेष्ठ समजली जात असे. आपली श्रीमंती सांगताना लोक आपल्याजवळ किती जनावरं आणि किती चारा आहे, ते सांगत असत. सुतारकाम आणि लोहारकाम करणाऱ्यांना वेदकाळात खूप महत्त्व होते. हे दोघे शेतीसाधने व युद्धसाधने घडवायला उपयुक्त म्हणून हे महत्त्व त्यांना होते. शिवाय समाजात समृद्धी असल्यामुळे दागदागिने घडवणाऱ्या सोनारालाही तितकेच महत्त्व होते.
ऋग्वेदकालीन समाजव्यवस्था ही प्राथमिक रानटी अवस्थेतून नुकतीच बाहेर पडलेली समाजव्यवस्था होती. मातृसत्ताक परंपरा मागे पडून पितृसत्ताक परंपरेचा वारसाहक्क याच काळात रूढ झालेला होता. कारण या काळात खाजगी संपत्ती व मालमत्तेचे महत्त्व वाढलेले होते. आपण पाहिलं की याआधी मातृसत्तेत वैयक्तिक संपत्ती हा प्रकार नव्हता. सामूहिक निर्मिती आणि समान सामूहिक वाटप हा या आधीच्या मातृसत्तेचा शिरस्ता होता.
अथर्ववेदात आलेल्या भूमिसुक्तात जमिनीचं, शेतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. ही भूमीच सगळ्यांचं दुःख दूर करते. कारण ती सर्व पार्थिव पदार्थांची निर्माती आहे, जे पार्थिव पदार्थ माणसाच्या सर्व गरजा भागवतात. ती नसती तर माणसांच्या दुःखांना पारावारच राहिला नसता. सायनाचार्य यांनी वेदातील काही ऋचांचा अर्थ लावताना त्यांनी ब्रह्मणस्पती या देवतेला शेतीची देवता म्हटलेले आहे. त्यांच्या मते अन्न पिकवतो तोच ब्रह्मणस्पती असतो. म्हणुनच अन्नब्रह्म ही संकल्पना समाजात रूढ झालेली होती. अन्न खाताना ते पिकवणारांची खाणाराने सदैव आठवण ठेवावी असाही संकेत तेव्हा रूढ होता. आर्य शब्दाचा अर्थ पेरणी करणारा असाही सांगितला जातो. वेदातल्या पृथूवैन्य या नावाच्या त्या काळातील ऋषीला कृषीक्रांतीचा जनक समजले जाते. श्रीनिवास हेमाडे यांनी आपल्या ‘तत्त्वभान’ या ग्रंथात असं म्हटले आहे की, ‘अख्ख रामायण हे कृषीचं रूपक आहे. सीता म्हणजे नांगरट न झालेली जमीन, सिताराम म्हणजे नांगराने जमीन कसणारा जाणकार शेतकरी, अहल्या म्हणजे नांगर न फिरलेली जमीन, तारा म्हणजे नदीतलं जमिनीचं बेट, मंदोदरी म्हणजे विलंबाने पिकणारी जमीन, इत्यादी.
सिंधू संस्कृतीमध्ये अन्नधान्याचा जितका उल्लेख सापडतो तितक्या अन्नधान्याचा उल्लेख वेदात सापडत नाही. म्हणजे आर्यांनी सिंधूंच्या शेतीसंस्कृतीचा पूर्णपणे स्वीकार केलेला दिसत नाही. ऋग्वेदात घोड्यांपाठोपाठ गाई, बैलांना महत्त्व दिलेले आहे. गाईनवरूनच त्या काळात लढाया देखील होत असत. गोधन सर्वात मोठे समजले जात असे हे वर सांगितलेले आहेत. त्यामुळे त्या काळच्या राजाला गोपती असे म्हटले जात असे. पुढं गुप्तकाळात तो भूपती झाला. म्हणजे आधी राजा गाईचा मालक होता नंतर तो जमिनीचा मालक झाला. त्या काळात मुलीला दुहिता म्हणजे दूध काढणारी असे म्हटले जात असे. त्या काळजा समाज कसा गोकेंद्रीत होता, हे वरील सर्व उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल.
त्या काळात नांगराला सहा, आठ, बारा, चोवीस बैल देखील जोडले जात असा उल्लेख सापडतो. सहा बैलांचा लोखंडी नांगर तर मी माझ्या लहानपणी पाहिलेला होताच. वेदकाळाचा अस्तपर्वात बार्लीसोबतच गहू आणि तांदूळ पिकवल्या जात असे. काही कडधान्यही पिकवली जात असत. वेदकाळात शेतकरी हा वैश्य वर्णातला समजला जात असे. क्षेत्रीय आणि ब्राह्मण शेती करीत नसत. वैश्य हे शुद्रांच्या सहाय्याने शेती करीत असत. ऋग्वेद काळातील माणूस शेती करत असला तरी अजून तो भटका होताच. तो वेळोवेळी आपल्या वस्तीच्या जागा बदलत असे. या काळात शेतकरी राजे आणि योध्यांना कर देत असत. राजे आणि योध्ये त्या करातून पुरोहितांना दान, देणग्या देत असत. या काळात पुरोहितच सर्वश्रेष्ठ समजले जात. राजेशाही ऐवजी या काळात पुरोहितशाही होती. त्यामुळे समाजात यज्ञाचे स्तोम माजलेले होते. त्यातल्या पशुबळींचे प्रमाणही वाढलेले होते. त्यामुळेच शेतीसाठी बैल पुरेनासे झाले. म्हणून शेतीउत्पन्नावरही त्याचा परिणाम होऊ लागला. वेदात आर्य ही संकल्पना ब्राह्मण, क्षेत्रीय व वैश्य या तीनही वर्णांसाठी वापरलेली आहे. शूद्र आणि दास-दासी यातून वगळले होते.
संदर्भ
१. वैदिक संस्कृतीचा विकास – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई (चौथी आवृत्ती २०१७)
२. तत्वभान – श्रीनिवास हेमाडे, वर्णमुद्रा प्रकाशन, शेगाव (२०२३)
३. रामकथा : उत्पत्ति और विकास – फादर कामिल बुल्के, लोकभारती प्रकाशन, प्रयागराज (दुसरा संस्करण २०२४)
४. तिफनसाज – इंद्रजीत भालेराव, मनोविकास प्रकाशन, पुणे (दुसरी आवृत्ती २०१५)
५. गाई घरा आल्या – इंद्रजीत भालेराव, आदित्य प्रकाशन, औरंगाबाद, (सहावी आवृत्ती २०२२)
६. पीकपाणी – इंद्रजीत भालेराव, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, (पाचवी आवृत्ती २०१८)
७. चारही वेदांच्या सार्थ मराठी संहिता, रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
८. भारताचा प्राचीन इतिहास – आर. एस. शर्मा, अनुवाद – सरिता आठवले, मधुश्री पब्लिकेशन, पुणे (२०२४)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.