December 7, 2023
Purity of mind necessary for Meditation rajendra ghorpade article
Home » साधनेसाठी आवश्यक मनाची भावशुद्धी
विश्वाचे आर्त

साधनेसाठी आवश्यक मनाची भावशुद्धी

मनात कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी. मन दुषित असेल तर साधनेत मन रमणार नाही. मनातील हे दोष, शंका यांचे निरसन हे व्हायलाच हवे. मन हे विषयांकडे लगेच धावते. हा मनाचा स्वभाव बदलायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

म्हणौनि तिये मानसी । भावशुद्धीचि असे आपैसीं ।
रोमशुचि जैसी । तळहातासी ।। २३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा

ओवीचा अर्थ – म्हणून ज्याप्रमाणे तळहातावर केशरहितपणा ही निर्मळता स्वभावतःच आहे. त्याप्रमाणे त्या मनामध्ये स्वभावतःच भावशुद्धि असते.

मनाचा स्वभाव चंचल असतो. सारखे मन इकडून तिकडे धावत असते. गप्प बसले तरी मनात मात्र काहींना काही तरी विचार सुरुच असतो. मनाला नियत्रणात ठेवण्यासाठी दृढनिश्चयच करावा लागतो. ठाम भूमिकाच घ्यावी लागते. यासाठीच मनामध्ये स्वभावतःच भावशुद्धि हवी. शुद्ध भाव, शुद्ध विचार मनाला स्थिर ठेवण्यात मदतगार ठरतात. साधनेत मन स्थिर ठेवायचे असेल, तर हे आवश्यकच आहे. म्हणजेच मन त्या विचारात गुंतून राहाते. वाईट विचार पटकण उत्पन्न होतात. पण चांगल्याची संगत असेल, तर ते निश्चितच नियंत्रणात राहातात. त्यामध्ये बदल हा घडतोच. यासाठीच चांगल्या सवयी मनाला लावून घ्यायला हव्यात.

आपणास असे वाटते की, सर्व काही असल्यानंतर नुसती साधना करायची हे सोपे काम आहे. पण तसे होत नाही. भले जेवणाची, रोजच्या दैनंदिन कटकटींची, कशाचीही चिंता नसेल, पैसाही अमाप असेल, मग साधनेत मन रमवणे काहीच अवघड नाही, असे वाटते. प्रत्यक्षात हे खूप कठीण आहे. सर्व गोष्टी अगदी जाग्यावर उपलब्ध झाल्या, तरी हे शक्य होत नाही. कारण साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. साधनेची तीव्र इच्छा, ओढ असावी लागते. तरच मनामध्ये साधनेचा शुद्धभाव उत्पन्न होईल. प्रसन्न वातावरण आहे. पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. मनालाही त्यामुळे प्रसन्नता आली आहे. पण साधनेची इच्छा नसेल, तर साधना होत नाही. साधनेची ओढ लागावी यासाठीच सद्गुरु हे आपणास विविध अनुभव देत असतात. त्यांच्या पाठींब्यानेच, त्यांच्या आशीर्वादानेच मनामध्ये साधनेचा भाव उत्पन्न होतो. तेंव्हाच मनापासून साधना होईल.

मनात कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी. मन दुषित असेल तर साधनेत मन रमणार नाही. मनातील हे दोष, शंका यांचे निरसन हे व्हायलाच हवे. मन हे विषयांकडे लगेच धावते. हा मनाचा स्वभाव बदलायला हवा. कितीही राग, द्वेष मनात उत्पन्न झाले. तरी मन नियंत्रणात राहील अशा सवयी मनाला लावून घ्यायला हव्यात. विषय, वासनेकडे मन वळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. स्वर्गातील अप्सरेच्या, मेनकेच्या पायातील घुंगरू आपणास तिच्याकडे ओढतात. त्या घुंगरांच्या मधूर आवाजाने आपले मन विचलित होते. पण मनाने ठरवले तर त्या घुंगरांच्या आवाजातही आपणास सोहम, सोहमचा स्वर ऐकायला मिळू शकतो. इतकी मनाची शुद्धी व्हायला हवी. इतके मन सद्गुरुंच्या शब्दात गुंतायला हवे.

सद्गुरु हे नित्य आपणास अनुभूती देत असतात. आपणास जागे करत असतात. त्यांच्या या अनुभूतीवर आपले मन केंद्रित करायला हवे. सद्गुरूंनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाचा, कष्टाचा विचार करायला हवा. सद्गुरुंची आपल्याप्रती असणारी तळमळ जाणून घ्यायला हवी. अनुभवायला हवी. त्यांची ही अनुभूतीच आपणास या विषय, वासनेतून बाहेर काढू शकते. यात जागे करू शकते. भानावर आणू शकते. स्वामीचिया मनोभावा । न चुकीजे हेचि परमसेवा । सद्गुरुंची शिष्याला आत्मज्ञानी करण्याची असणारी तळमळ, ओढ, त्यातील त्यांचा मनोभाव जाणून घेऊन साधनेची सेवा करावी. म्हणजेच आपल्या मनाची भावशुद्धी होईल. तरच मानसिक तप फळाला येईल.

Related posts

माइंड सेट कसा तयार कराल ?

मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन

भारत चीन सीमेवरील बुमला पास

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More