सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे. असे हे पसरविले जाणारे गैरसमज थांबवेत अन् सातवीन वृक्षाचा परिचय व्हावा या उद्देशाने हा लेखप्रपंच…
डॉ मधुकर बाचूळकर कोल्हापूर.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर “सातवीन वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत आणि गावांच्या व शहर परिसरातील सातवीन वृक्ष तोडून टाकावेत अशी मागणी केली जात आहे. या वृक्षाबाबतचे पसरवण्यात येणारे गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने या वृक्षाची शास्त्रीय माहिती अशी…
सातवीन वृक्षाच्या फुलांच्या वासाने दुर्गंधी पसरत नाही, सुगंध पसरतो. या फुलांचा वास थोडा उग्र आहे. या वासाची काहींना अॅलर्जी असते, पण सर्वांना नसते. यामुळे त्यांना श्वसन करताना त्रास होतो. घसादुखी, डोकेदुखी, खोकला, उलटी असे त्रास उद्भवतात. हा त्रास फक्त काहींना होतो. सरसकट सर्वांना होत नाही. याशिवाय कोणताही त्रास होत नाही. वासाने इतर कोणताही रोग व विकार होत नाहीत. ज्यांना त्रास होतो अशा व्यक्तींनी तसेच जे दमा रुग्ण आहेत अशांनी आवश्यक काळजी घ्यावी. त्यांनी वृक्ष फुललेले असताना या वृक्षांजवळ जाऊ नये. फार वेळ या वृक्षांखाली थांबू नये. वृक्ष फुलोऱ्यावर असताना तोंडावर मास्क / रुमाल बांधावा. वृक्षावर फुलोरा 15 ते 20 दिवस असतो, वर्ष भर नसतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यामुळे जास्तीत जास्त एक महीनाभर आपणास दक्षता घ्यावी लागते. यासाठी वृक्ष तोडण्याची आवश्यकता का आहे ?. थोडा संयम पाळायला हवा.
सातवीनच्या फुलांमध्ये व्होलाटाईल ऑईल ( Volatile Oil ) असते, यामध्ये आठ ते दहा रासायनिक घटक असतात. फुलांतील तेलाचे लगेच वाफेत रुपांतर होऊन ते वातावरणात मिसळून त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. त्यातील काही रासायनिक घटकांची काही व्यक्तीना अॅलर्जी ( Allergy )असते. या वासामुळे किंवा या वृक्षा मुळे इतर कोणते रोग होतात, आजार होतात, इतर व्याधी जडतात, या वृक्षा मुळे माणसांचे मृत्यू झाले आहेत असे कोणतेही पुरावे, आरोग्य अहवाल, संशोधन पेपर्स, शोधनिबंध Medical Reports, Research Papers, Research Articles उपलब्ध नाहीत. यामुळे या वृक्षाची बदनामी करण्यात येऊ नये.
या वृक्षाचे परागीभवन मधमाशा व कीटकांमुळे होते. याचे परागकण हवेत मिसळत नाहीत, वाऱ्याने हवेत पसरत नाहीत. याचे परागकण अॅलर्जीक ( Allergic ) नाहीत, याची नोंद ध्यावी.
सातवीन हा देशी वृक्ष आहे. हा सदाहरित वृक्ष भारत, श्रीलंका, जावा या देशात तसेच आफ्रिका, ऑस्ट्रेलिया खंडातील काही देशातील वनक्षेत्रात नैसर्गिकपणे वाढलेले आढळतात. हे वृक्ष भारतात प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाट परिसरातील जंगलात आढळतात. हे वृक्ष महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनांत नैसर्गिक पणे वाढलेले आढळतात. हे वृक्ष विषारी वायू सोडत नाहीत. हा मोठा गैरसमज आहे. कोणतीही वनस्पती विषारी वायू सोडत नाहीत. प्रामुख्याने दिवसा प्राणवायू आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडतात. हे लक्षात घ्यावे.
या वृक्षावर अनेक प्रकारचे पक्षी आसरा घेतात व घरटी ही बांधतात. वृक्ष फुलोऱ्यावर असताना असंख्य मधमाशा व अनेक किटक फुलांवर घोंगावत असतात. हा औषधी वृक्ष असून आयुर्वेद ग्रंथात याचा उल्लेख आहे. सातवीन वृक्षाची साल कुष्ठरोग, व यकृत विकारांवर तसेच मलेरिया, पोटदुखीवर व भूक वाढविण्यासाठी वापरतात. साली मध्ये औषधी अल्कालॉईड ( Alkaloids ) आहेत. पाने जखमांवर बांधतात यकृत दोषांवर मूळ वापरतात. चीक संधिवातावर व त्वचा रोगांवर वापरतात. असा हा बहुगुणी वृक्ष आहे.
या वृक्षाचे शास्त्रीय नाव Alstonia scholaris असे असून तो Apocynaceae कुळातील आहे. या वृक्षास Alston या स्काॉटिश वनस्पती संशोधकाचे नाव देण्यात आले आहे. पुर्वी शाळेतील फळे आणि विद्यार्थ्यांकडील पाट्या दगडी होत्या आणि त्यांचे काठ लाकडी असत. हे लाकडी काठ सातवीन वृक्षाच्या लाकडापासून बनविले जात. शाळेतून हुशार विद्यार्थी Scholars तयार करण्यात या वृक्षाच्या लाकडाचा सहभाग असलेने या वृक्षाच्या प्रजातीचे नाव इंग्रज शास्त्रज्ञांनी scholar’s असे ठेवलेले आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे व अभिमानास्पद आहे. या विधानाचा प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे, म्हणजे , जे भारतीय लोक आम्ही या वृक्षावर टिका करतो, हे वृक्ष नष्ट करा असे म्हणतो, त्यांचे डोळे उघडतील.
या वृक्षाच्या चिकात कडू, विषारी Alkaloids आहेत. यामुळे गुरे, जनावरे या वृक्षास तोंड लावीत नाहीत. यामुळे या वृक्षास इंग्रजीत ” Devils Tree ” म्हणजेच “सैतानाचे झाड”” असे नाव आहे. कदाचित या नावावरून आपल्या कडे या वृक्षाबाबत गैरसमज तयार झाले असावेत असे मला वाटते. कारण आपण चांगले लगेच स्विकारत नाही, पण वाईट असणारे मात्र लगेच घेतो. हा सदाहरित, देशी, बहूपयोगी, औषधी, गुणकारी वृक्ष आहे.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या कडे ” Conocarpus ‘ या विदेशी वृक्षांची लागवड शासकीय व खासगी स्तरावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे वृक्ष मोठ्या प्रमाणात परागकण तयार करतात आणि ते हवेत मिसळतात. हे परागकण सर्वांसाठी Allergic आहेत, परागकणांच्या आपण सान्निध्यात आल्यास, आपणास दमा हा विकार जडतो. याबाबतचे शास्त्रीय अहवाल, शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक देशांमध्ये Conocarpus हे पूर्णपणे नष्ट केले आहेत. अशा विदेशी वृक्षाबाबत मात्र आपल्या कडे कोणीही बोलत नाहीत, हे खरंच संतापजनक आहे .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.