July 27, 2024
Prachi Pendase article on boys selling Gajara on Signal
Home » आजचा दिवस तिचा होता…
मुक्त संवाद

आजचा दिवस तिचा होता…

ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..
तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….मला कोणी विचारले की legend बनायला किती कालावधी लागतो ? तर मी झटकन सांगेन, “फक्त 59 सेकंद. Less than a minute’
प्राची पेंडसे

लेखिका

तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला तुमची गाडी उभी असताना लाल किंवा हिरवा होण्याआधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचे काऊंटडाउन सुरू होते ते बघता का ?.. मी बघते. मोजतेही.. मला मजा येते.. जसे की शाळेत बाई मागचे अंक म्हणून दाखवायलाच सांगतात.. काहीतरी बालिश चाळा टाईमपास…… अशीच एक घाईची सकाळ.. टाटा पॉवरच्या मोठ्या सिग्नलला आमची गाडी उभी होती.. तब्बल 59 सेकंद.. नेहमीप्रमाणेच वाहनांची तुडुंब गर्दी होती……..

लाल सिग्नल लागल्या लागल्या रस्त्याच्या बाजूला असणारी दुतर्फा चालती फिरती दुकाने जिवंत झाली.. फळे, फुले, गजरे, खेळणी विकणारे आमच्या गाड्यांसमोरून धावू लागले. भिकारी भीक मागू लागले. तृतीयपंथी टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेत होते.
या सगळ्यात ते दोघे होते.. त्यात ती मोठी होती आणि तो लहान.. ती मोठी म्हणजे, असेल दहा बारा वर्षांची, आणि तो लहान म्हणजे असेल सात आठ वर्षांचा… बहिण भाऊ असावेत.. दोघे गजरे विकत होते..

टोपली बहिणीकडे होती. तिचे काम खूपच चपळतेने होत होते. कारण त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी अर्थातच तिच्यावर होती. ती त्या 59 सेकंदाचा पूर्ण वापर करत होती. प्रत्येक गाडी, रिक्षा, बस समोरून धावत होती.. मध्येच थांबून विचारेल त्याला गजरा दाखवत होती, भाव सांगत होती, पैशाची घासाघीस करत होती.. गजरा विकला गेला की त्याचे पैसे टोपलीत टाकून विजेच्या वेगाने पुढची गाडी…..

तिच्या मानाने तिचा भाऊ सौम्य होता. त्याच्या हातात तिने तीन चार गजरे दिले होते. तो आपला प्रत्येक गाडीकडे जाई, गजरा दाखवी, नजरेनेच हवा का विचारी. परत पुढची गाडी. मधेच आपल्या बहिणीकडे बघे..
वेळ भराभर सरकत होती.. तिने आतापर्यंत चार गजरे विकले होते. त्याचा अजून एकही नाही….
आमच्या गाडी समोर एक स्कूटी होती. त्यावर दोन तरुण मुली होत्या. त्यातील मागे बसलेल्या मुलीकडे तो गेला. त्या मुलीला गजरे घेण्यात काही इंटरेस्ट दिसत नव्हता.. कारण ती त्याला नकार देत होती.. पण तिला काय वाटले कुणास ठाउक तिने त्याला माघारी बोलावले. ते सहा वर्षांचे पोर विजेच्या वेगाने तिच्याकडे धावले.. तिने भाव विचारताच त्याने बोटाने दहा असे सांगितले.. बहुतेक तो मुका होता.

ती ओशाळली. तिने पटकन पर्समधून दहा रुपये काढून त्याच्या हातात ठेवले.. आणि गजरा घेतला.. सिग्नल सुटायला दहा सेकंद बाकी होती.. त्या मुलाची बोहनी झाली होती. आनंद गगनात मावत नव्हता.. तो तोंडाने जमेल तेवढा मोठा आवाज करून ‘ऑ ऑथं…’ करून बहिणीकडे जाऊ लागला..आनंद पाहून ती ही सुखावली. पण
सिग्नल सुटणार असे पाहून ती त्याला खुणेनेच ‘आता बाजूला हो’ असे सांगू लागली..
माझ्यासारखी कितीतरी माणसे त्या मुलाकडे पाहात होती. माझ्यासाठी ती स्कूटीवाली आदरणीय आणि तो मुलगा हिरो होता..
तेवढ्यात त्या मुलाच्या हातातली दहाची नोट उडाली आणि सिग्नल सुटला……
गाड्यांचे स्टार्टर लागले, एक्सेलेटरचे आवाज वाढू लागले, कर्कश्श हाॅर्न वाजू लागले..
पण त्या मुलाला कशाचीच फिकीर नव्हती.. तो भर रस्त्यात, भर ट्रॅफिक मधे, ती उडणारी त्याची पहिली कमाई पकडायला जीवाच्या आकांताने धावत होता..
त्याची बहिण एव्हाना रस्त्याच्या कडेला पोचली होती. ती त्याला बोलवायला ओरडत होती. गाडया कर्कश्श हाॅर्न वाजवत होत्या.. आणि तो मुलगा उडणाऱ्या नोटेमागे धावत होता..
तेवढ्यात त्या समोरच्या स्कुटीवरील मागच्या मुलीने उतरून धावत धावत जाऊन त्या मुलाला पकडले .पुढे बसलेल्या मुलीने चपळतेने उडणारी नोट धरली आणि एक हाताने मागच्या ट्रॅफिकला हात दाखवून थोपवून धरले.. नोट मुलाच्या हातात मिळाली..

Suddenly my heroes were changed…. क्षणार्धात त्या मुली माझ्यासाठी हिरो झाल्या.. पण त्यांचे दुर्दैव….त्या मुलाने त्या दोघींकडे पाहिले देखिल नाही. तो नुसतीच दोन्ही हातांनी ती दहाची नोट निरखून बघत कडेला असलेल्या आपल्या बहिणीकडे चालू लागला होता..

त्या भावाची बहिण टोपली सांभाळत पुढे धावत आली. तिने त्या भावाला हलकीच डोक्याला टपली मारली.. त्या स्कूटीवाल्या मुलींच्या पाया पडू लागली.. तिने त्यांना टोपलीतला अजून एक गजरा ऑफर केला. त्यांनी तो नाकारला.. मागच्या आमच्या गाड्या खोळंबल्या आहेत याची तिला जाणीव होती..

ऊसके बाद जो हुआ भाईसाब…. ती गजरेवाली बहिण आता धावत रस्त्याच्या मधोमध आली.. एक सेकंद स्तब्ध उभी राहिली..
आतामात्र माणसं चुळबुळ करू लागली. ओरडू लागली. “बाजूला हो, बाजूला हो, केली ना मदत, वाचला ना भाऊ…..”
तिने फक्त आपल्या भावाकडे हात दाखवत आणि तोच हात वर्तुळाकार
आम्हा गर्दीकडे फिरवत “तुम्ही मला मदत केलीत, माझ्या भावाला वाचवलेत” या मूक अर्थाने दोन्ही हात जोडत, कमरेपर्यंत सेकंद दोन सेकंद वाकली आणि क्षणार्धात रस्त्याच्या बाजूला पळून गेली………

आता रस्ता खुला होता. सिग्नल ही हिरवा होता… तरी गाड्या दोन एक सेकंद थबकत होत्या.. भानावर येत येत एक एक गाडी सुरू झाली.. पुढे जाऊ लागली….
त्या मुलीला खूप काही मिळाले त्या दिवशी…… स्कूटी वाल्यांनी फ्लाइंग किस दिले.. कधीही न थांबणाऱ्या बाईकस्वारांनीही तिच्या बाजूने जाताना हाॅर्न वाजवून तिची प्रशंसा केली. आमच्यातील कित्येक लोकांनी जाता जाता तिला हात दाखवला.. ती सुद्धा आनंदाने सगळ्याना नमस्कार करत होती.. 30 सेकंद हे थरारनाटय चालले.

माझे हिरोही अजूनही स्कूटी वाल्या मुलीच होत्या.. गजरेवाली नाही…
कारण ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..
तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….
मला कोणी विचारले की legend बनायला किती कालावधी लागतो ? तर मी झटकन सांगेन, “फक्त 59 सेकंद. Less than a minute’

– प्राची पेंडसे



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आत्मज्ञान विकासासाठी वाढवा सात्विक गुण

परिवर्तनाच्या चळवळीत वंचित घटकांना आंबेडकरवाद्यांनीच जवळ केले : दिशा पिंकी शेख

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading