सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळाचे महेंद्र चव्हाण, सुभाष भंडारे यांची माहिती
कणकवली – यावर्षीपासून मराठी साहित्य क्षेत्रातील कोणत्याही भागातील एका गुणवंत व्यक्तीला सिंधुदुर्ग साहित्य – संगीत मित्र मंडळातर्फे मैत्र साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांची निवड करण्यात आली आहे. दोन हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे होणाऱ्या पहिल्या साहित्य संगीत संमेलनात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण आणि निमंत्रक सुभाष भंडारे यांनी दिली.
एका कलेचा दुसरा कलेशी पूरक संबंध असतो. याचा विचार करून सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळातर्फे साहित्य – संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य – संगीत आणि कला क्षेत्रातील प्रत्येकी एका गुणवंत व्यक्तीचा मैत्र पुरस्कार देऊ गौरव करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील मैत्र पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवयित्री सध्या तांबे यांची निवड करण्यात आली आहे. तर संगीत आणि कला क्षेत्रातील पुरस्काराची निवड पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. कवयित्री संध्या तांबे यांची एकूणच कविता माणसाच्या आतल्या निर्मळपणाला आवाहन करते.
माणसाचे द्रष्टेपण माणसाच्या आतल्या संवेदनशीलतेशी आहे हे सूचीत करते. स्त्री आणि पुरुष या भेदाच्या पलीकडे या कवयित्रीच्या कवितेचा प्रवाह प्रवाहित होत असून मानवी जगण्यातील सूक्ष्म अनुभव मांडण्याला ती प्राधान्य देते. आताच्या गद्यप्राय कवितेच्या खळखळाटात संध्या तांबे यांच्या कवितेचं आतल्या सौंदर्यदृष्टीशी स्वतंत्र नातं असून ते माणसाच्या असण्यालाच उजागर करू पाहते. हेच संध्या तांबे यांच्या कवितेच मोठं मोल आहे ! ही त्यांच्या कवितेची गुणवत्ता आणि वेगळेपण लक्षात घेऊन त्यांची मैत्र साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.