निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून घेऊन नैसर्गिक शेतीचा, सेंद्रिय शेतीचा विकास शेतकऱ्यांनी करायला हवा व निसर्गाचा हा ठेवा जपायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मग कणिसौनि कणु झडे । तो विरुढला कणिसा चढे ।
पुढती भूमी पडे । पुढती उठी ।। 253 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा
ओवीचा अर्थ – मग कणसांतून बीं पडतें त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते. पुन्हा त्या कणसातील दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्यांपासून कणसें उत्पन्न होतात.
देवराईमध्ये अनेक जातीचे वृक्ष असतात. तेथे रोपे लावण्याची गरजही नसते. अनेक वनौषधीं नैसर्गिकरीत्या वाढतात. अनेक पठारावरही विविध प्रकारच्या वनस्पती वाढतात. सुंदर सुंदर फुले त्यांना येतात. या विविध वनस्पती दरवर्षी उगवतात. त्यांची लागण करण्याची कधी गरजही भासत नाही. पावसाळ्यात या वनस्पतीच्या बिया रुजतात. त्यांना फुले येतात. फळे लागतात. त्यांचे बीज त्याच जमिनीत पडते. पुन्हा पावसाळा सुरू झाला की या वनस्पतींचे ते बीज फुलते. पुन्हा बहरते. असा हा क्रम वर्षानुवर्षे सुरू असतो.
देवराईही अशी वाढते. पण सध्या मानवाच्या वसाहतीमुळे आता या पठारावरील वनस्पती नष्ट होत आहेत. मानसांचा वावर वाढल्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी तर या वनस्पती नष्ट झाल्या आहेत. केवळ पुस्तकामध्ये त्यांच्या नोंदी पाहायला मिळतात. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या ह्या मानव जातीस घातक ठरणाऱ्या आहेत. निसर्गचक्रच धोक्यात आले आहे. या दुर्मिळ होणाऱ्या वनस्पतींचे संवर्धन हे एक मोठे आव्हानच आहे. यावर उपाय योजण्याची गरज आहे.
मानवाची आता निसर्गाशी स्पर्धा सुरू आहे. मानवाच्या वाढत्या गरजा ह्या समस्त मानव जातीसच धोका ठरत आहेत. यावर वेळीच सावध होण्याची गरज आहे. हा प्रश्न जरी जागतिक असला तरी कर्तव्य म्हणून तरी मानवाने आता सावध व्हायला हवे. निसर्गाचे नियम मोडू लागले आहेत. याचा फटका मानवास बसतही आहे. कधी अतिवृष्टी होते तर कधी भीषण दुष्काळ पडतो. जागतिक तापमानवाढीने अनेक वनस्पतींचे जीवनच धोक्यात आले आहे. नैसर्गिक वाढ आता कृत्रिम होऊ पाहत आहे. मानवाचे नैसर्गिक जीवन आता कृत्रिम होऊ लागले आहे.
झाडाखाली गारवा होता. नैसर्गिक गारवा आता केव्हाच गेला आहे. पंखे आणि वातानुकूलित इमारतीमुळे बाहेरच्या जगात कितीही तापमानवाढ झाली तर त्याची चिंता मानवाला नाही. निसर्गात कितीही प्रदूषण वाढो आपण थंड जागी आहोत यातच मानवाला समाधान वाटत आहे. हे माझे कर्तव्य नाही. त्यासाठी पर्यावरण विभाग आहे. शासनाची खाती कार्य करत आहेत. उपाय योजत आहेत. असे म्हणून नागरिकांनी या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. विकासाचा वेग गाठणे हेच जीवनाचे उद्दिष्ट झाले आहे. डोळ्यावर विकासाच्या वेगाची झापड बसली आहे. ठेच लागत असली तरी त्यातून जागे होण्याचे भान त्याला नाही. निसर्गाचे चक्रच मोडीत निघाले आहे. याकडेही पाहायला त्याला वेळ नाही. जागरूकताही नाही.
नैसर्गिक वनशेती धोक्यात आल्याने कृत्रिम वनाची गरज भासत आहे. पण वनांच्या निर्मितीचे नियोजनच ढासळल्याने पर्यावरणाचा समतोलही आता ढासळत आहे. नैसर्गिक पिकलेल्या फळाची गोडी ही कृत्रिम फळास नाही. हे माहीत होऊनही त्याला नैसर्गिकरीत्या फळे पिकविण्यास वेळ नाही. फळ जलद पिकविण्यावरच त्याचा भर आहे. झाडाला फळ लागल्यानंतर ते झपाट्याने पिकावे यासाठी प्रयत्न होत आहेत. अशाने मानवाचा जन्मही तसाच झाला आहे. ऐन तारुण्यातच आता त्याला वृद्धाप्य येऊ लागले आहे. थांबायलाच वेळ नाही तर तो काय करणार? माणसाचा विचार बदलला आहे. तारुण्यात डोक्याचे केस पांढरे पडू लागले आहेत. फळाला लवकर पक्वता आणण्याच्या तंत्राने मानवी आरोग्यावरही परिणाम होतो आहे. याकडे पाहायलाही मानवाला वेळ नाही.
आता कोण त्याला समजावणार? आणि तो कोणाचे ऐकणार? चुका होत आहेत हे त्यालाही समजते पण काळच असा आला आहे. विकासाचा वेग त्याला साद देत आहे. यातच तो गुरफटला आहे. विकासाच्या वेगाचा मोह केव्हा जाणार? आणि कसा जाणार? हाच मोठा प्रश्न आहे. विकास हवा, विकास हवा पण कसला विकास हेच तर नेमके त्याला समजत नाही. निसर्गाशी सुरू असलेल्या या स्पर्धेत त्याचा पराभव निश्चित आहे. पण तरीही तो लढतो आहे. आपण का लढतो आहोत? कशासाठी लढतो आहोत? याचे भानच त्याला नाही.
निसर्ग हा आपला शत्रू नसून मित्र आहे हे त्याच्या लक्षातच नाही. जग चंद्रावर गेले. तुम्ही अद्याप सुधारला नाहीत. असे म्हणून दुसऱ्यांना नावे ठेवण्यात आपण आघाडीवर आहोत. अहो पण, सुधारलो नाही म्हणजे नेमके काय केले व सुधारलो म्हणजे नेमके काय केले. जग चंद्रावर गेले. पण ते कशासाठी गेले. तेथे काय आहे हे तपासण्यासाठी गेले. पृथ्वीची या विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधण्यासाठी ते गेले. निसर्ग निर्मित हे विश्व आहे. यातील प्रत्येक सजिवाला येथे जगण्याचा अधिकार आहे. यासाठी त्याला नैसर्गिकरीत्या संरक्षणही निसर्गाने दिले आहे. कोणत्याही जीव घ्या त्याला निसर्गाने ही देणगी दिली आहे. संशोधनही मानवाच्या भल्यासाठीच केले जात आहे. पृथ्वीच्या विनाशासाठी कोणतेही संशोधन नाही. पण मानसाच्या तामसीवृत्तीस विनाशच हवा आहे. हव्यासापोटी तो विनाश करू पाहत आहे. मग निसर्गाचे संरक्षण करणारे सुधारणावादी विचाराचे नाहीत असे कसे? सुधारणा कशाला म्हणायचे हेच आधी समजून घ्यायला हवे. विकासही विचारात घ्यायला हवा.
आरोग्य धोक्यात जात आहे हा विकास कसा असू शकेल? विकासाच्या नावाखाली विध्वंस होत आहे. हे मानवाला समजतच नाही. आरोग्याला घातक रसायने फवारून पिकातून विषाचे उत्पन्न काढत आहोत. असे शेतकऱ्यांना का वाटत नाही? हेच आपण खात आहोत. आपल्या पुढच्या पिढ्याही यामुळे धोक्यात आल्या आहेत. याचे भानही त्याला नाही. कमीत कमी स्वतःच्या कुटुंबासाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक उत्पादने घ्यायला नकोत का? निसर्गाचा विचार जर प्रत्येकाने केला तर निसर्गाचे संवर्धन निश्चितच होईल. पठारावर उगवणाऱ्या वनस्पतींची कोणी पेरणी करत नाही. तरीही त्या दरवर्षी फुलतात. निसर्गाची ही किमया जाणून घेऊन नैसर्गिक शेतीचा, सेंद्रिय शेतीचा विकास शेतकऱ्यांनी करायला हवा व निसर्गाचा हा ठेवा जपायला हवा. अनेक उद्योग उभे राहतील पण ते बंदही पडतील. पण शेती हा असा उद्योग आहे. जो कधीही बंद पडत नाही. तो कधी तोट्यात जाईल पण नफ्यातही राहील. पण हव्यासापोटी अधिक नफा कमविण्यासाठी विषारी उत्पादने घेणे हे गैर आहे. याचा फटका स्वतःलाही बसतो याचा विचार हवा. यासाठीच नैसर्गिक शेतीचा अवलंब हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.