मातीतलं सोनं या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. मातीत मळलेल्या माणसांचा श्वास म्हणजे दिगंबर जाधव यांची कविता आहे.
रामदास केदार
मोबाईल – ९८५०३६७१८५
मातीत राबणाऱ्या हातांनी आपल्या हाडाचे मातेरं केल्याशिवाय मातीतलं सोनं पदरात पाडून घेता येणार नाही. माता, माती आणि मातेरं हे आयुष्य घडवणार आणि जीवनाला कलाटणी देणारे रसायनच आहे. कवी दिगंबर जाधव यांची मातीतलं सोनं ही कविता जगण्याला बळ आणि नव्याला उभारी देणारी नक्कीच आहे. प्रस्तावना डॉ सुरेश सावंत यांची आहे तर कवितेला न्यायात्मक अशी पाठराखण फ. मु. शिंदे यांनी केली आहे. या कविता संग्रहातील कविता वाचत असताना डोळ्यासमोर मातीत राबणारे अनेक हात, शेतकरी उभे टाकतात. निसर्गाच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या केविलवाण्या शेतकऱ्यांची काव्यगाथाच जणू कवीने रचलेली आहे. आलेल्या भोगाला भोगल्याशिवाय शेतकरी राजाला आनंदाने जगता येत नाही.
आलं गेलं पीक तरी
सहन करतो तोटा
जिवंतपणी जाळतात
त्याला कर्जाच्या नोटा
मातीत पैसे टाकणारा भूमिपुत्र तो जगामध्ये साधाभोळा वावरतो. ओंजळभर पिकाला पाणी मिळाले तर आनंदाने मान आपली डोलावतो. तर भारतीय संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन कवी कबिराचे उदाहरण देऊन लिहितो.
एकतेचे दर्शन घडवितात
संत कबीरदासाचे दोहे
मित्रत्वाशी नातं सांगतात
सुदाम्याचे मूठभर पोहे
मुठभर पोटासाठी काळ्या ढेकळात राबणारी माणसं मातीतील मातेरं शोधून त्यातील जगण्याचा सार बाहेर काढण्यात आपली हयात घालतात.
बारमाही अन्नदात्याचं
फाटक्या लक्तराचं जिणं
तरीही जगासाठी पिकवितो
सदैव मातीतून सोनं
माय, झोपडी, जखमी वाघीन, वादळ, मातरं, तडा, कणीस, नदीमाय, धरणीमाय इत्यादी कविता वाचनिय आहेत. जन्मापासून मरणापर्यंतचा मधला काळ काबाड कष्ट करण्यात गेला. दुष्काळातही ताठ मानेने जगायला शिकवणारी ती मायचं असते.
पसापसा मातरं जमा करून
पुढच्या वर्षी माय पेरायची
रात्रंदिवस बापासोबत
काळ्या मातीत झुरायची
खावी कणसाची भाकर
त्याचे गुणगान गावे
आले कितीही वादळ
ताठ मानेने जगावे
शेतं पिकलं नाही म्हणून कधी आत्महत्या करु नये. आत्महत्या केल्याने समस्या सुटत नसते हे तत्त्वज्ञान सांगणारी आत्महत्या ही कविता राबणाऱ्या हाताला उर्जा देणारी आहे. अति पावसाने नदीला पूर येऊन कुटूंब उध्वस्त होतात. त्या भूतकाळातला आठवत कवी नव्या पिढीच्या भविष्यासाठी वर्तमानाला सोबत घेऊन जगतो आहे.
साथ तुमची, कष्ट आमचे
दुःख सोडून जगणं आहे
नव्या पिढ्यांसाठी
फाटक आभाळ शिवणं आहे.
या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. मातीत मळलेल्या माणसांचा श्वास म्हणजे दिगंबर जाधव यांची कविता आहे.
पुस्तकाचे नाव – मातीतलं सोनं
कवी – दिगंबर जाधव
प्रकाशक – इसाप प्रकाशन, नांदेड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.