March 29, 2024
Home » मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।
विश्वाचे आर्त

मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।

घेणे देणें सुखचिवरी । हो देई या जगी ।। 16 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणे देणे होऊ दे.

ज्ञानदानाची भाषा व्हावी

कोणतिही भाषा टिकण्यासाठी किंवा त्या भाषेच्या विस्तारासाठी ती ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. असे भाषा अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानभाषा असेल तर त्या भाषेचा विकास झपाट्याने होतो. यासाठी तशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती त्या भाषेत होणे तितकेच गरजेचे आहे. आज पृथ्वीतलावर अनेक भाषा बोलल्या जातात. त्यातील 7117 भाषा आजही वापरात आहेत. त्या बोलल्या जातात. पण यांची संख्या आता झपाट्याने घसरू लागली आहे. काही भाषा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही लुप्तही झाल्या आहेत. भाषा टिकायची असेल तर ज्ञानदानाची भाषा व्हावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

सक्ती करून विकास अशक्य

नव्या तंत्रज्ञानामध्ये ही भाषा किती लोक वापरतात किती प्रमाणात वापरतात यावर ही भाषा घ्यायची की नाही त्याचा वापर नव्या तंत्रज्ञानात करायचा का नाही हे ठरवले जाते. फायदा नसेल तर भाषा कोण वापरणार हे सुद्धा महत्त्वाचेच आहे. सक्ती करून भाषेचा समावेश केला तर ते फायद्याचे ठरणारे नाही. सक्ती करून भाषेचा समावेश होईल खरा पण तिचा वापरच झाला नाही तर काय उपयोग. यासाठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची नितांत गरजेचे आहे. मराठी भाषेची सक्ती करून मराठी भाषेचा विकास होणार नाही हे विचारात घ्यायला हवे.

आत्मज्ञानाने मराठीला अमरत्व

मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे. ज्ञानेश्वरीतील आत्मज्ञानाने ही भाषा अमर झाली आहे. या भाषेतील आत्मज्ञानाची ओळख जगाला करून देण्याची गरज आहे. या आत्मज्ञानावरून ही भाषा जागतिक भाषा म्हणूनही विकसित होऊ शकते याचा विचार करायला हवा. यासाठी ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे या मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करायला हवा. ही ब्रह्मविद्या विकसित करायला हवी. तो विचार मनामनात रुजवायला हवा. तसे झाले तर ही भाषा जगभरात बोलली जाईल जगभरात ही भाषा विकसित होईल. याचा वापर जगभर होईल. हे विचारात घ्यायला हवे. तसे प्रयत्न भाषेच्या विकासासाठी करायला हवेत. असे झाले तर मराठीचिये नगरी हे विश्वची माझे घर होईल. विश्वात मराठीच्या आत्मविद्येचा ब्रह्मविद्येचा सुकाळ होईल.  

Related posts

प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

बेधडक वळणाची कोल्हापुरी बोली

अश्वगंधा (ओळख औषधी वनस्पतींची )

Leave a Comment