खऱ्या प्रेमातूनच जीवन फुलत असते. आई-वडीलांचे प्रेमाचे चार शब्द जीवनातील इतर दुःखे सहज घालवतात. आपल्या लाडक्या, आवडत्या प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यानंतर आपल्याला हायसे वाटते. आपले शारीरिक हावभावही बदलतात. बोलण्यातही मृदुता येते. फक्त भेटल्याने इतका बदल होतो. अशा व्यक्तीच्या नित्य सहवासाने जीवन आनंदाने का फुलणार नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजें जी ।। ५९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहांत. म्हणून तुम्ही भेटल्यावर मी लडिवाळपणा करतों. महाराज, जो लडिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय, असे आपण समजावें.
माहेर म्हणजे आई-वडिलांचे घर. महिलांना माहेरची अधिक ओढ असते. सासरी कितीही प्रेम मिळाले, कितीही संपन्नता असली तरी माहेरच अधिक प्रिय असते. काही झाले तरी लगेच माझ्या माहेरी, असे नाही. माझे माहेर तसे होते अशी उदाहरणे, टोमणेबाजी सुरू होते. माहेरविषयी कोणी वाईट बोललेले त्यांना सहन होत नाही. माहेरचे कौतुक त्यांच्या तोंडी नेहमीच असते. माहेरसारखे प्रेम या जगात कोठेच नाही, असे त्यांना वाटते. असे प्रेम सासरी असले तरी माहेरची बरोबरी होत नाही, असे त्यांना वाटते.
माहेरमध्ये सर्व हक्काचे असते. आपलाच अधिकार असतो. सासरी आल्यावर तसा अधिकार सासरी मिळत नाही. काही स्त्रिया आपला अधिकार राहावा, वचक राहावा यासाठी माहेरकडचाच एखादा गडीमाणूस खास कामासाठी नेतात. सासरचा गडीमाणूस त्यांना फारसा आवडत नाही. माहेरकडची सर्व माणसे त्यांना प्रेमळ वाटतात. हवीहवीशी वाटतात. बदलत्या काळात आता असे माहेरचे प्रेमही बदलत चालले आहे. झपाट्याने बदलणाऱ्या या संस्कृतीत माहेरविषयीच प्रेम राहिले नसेल तर सासरविषयी प्रेमाची कशी स्थिती असेल, हा मोठा प्रश्न आहे.
प्रेमविवाह करणाऱ्यांना तर सासर-माहेर हा नातेसंबंधच राहात नाही. त्यांना दोन्हीही नकोशी वाटतात. हे परखड सत्य आहे. अशा बदलत्या काळात खऱ्या या प्रेमाची ओळखच बदलत चालली आहे. खरे प्रेम लुप्त होत चालले आहे. काळाच्या ओघात माणसामधील स्वार्थी वृत्ती वाढल्याने हा फरक पडला आहे, पण समाधानासाठी माहेरसारखे सुख कोठेच नाही. खरे प्रेम हे माहेरीच असते. तेच खरे प्रेम आहे. तीच खरी प्रेमाची ओढ आहे. तीच खऱ्या प्रेमाची ओळख आहे. तेथेच खरे प्रेम मिळते.
खऱ्या प्रेमातूनच जीवन फुलत असते. आई-वडीलांचे प्रेमाचे चार शब्द जीवनातील इतर दुःखे सहज घालवतात. आपल्या लाडक्या, आवडत्या प्रेमळ व्यक्तीची भेट झाल्यानंतर आपल्याला हायसे वाटते. आपले शारीरिक हावभावही बदलतात. बोलण्यातही मृदुता येते. फक्त भेटल्याने इतका बदल होतो. अशा व्यक्तीच्या नित्य सहवासाने जीवन आनंदाने का फुलणार नाही. संत हे आपल्या आई वडीलांसारखे आहेत. त्याचा नित्य सहवास लाभला तर आपले जीवन निश्चितच सुखकर होईल. तसे ते नित्य आपल्या जवळ असतात. फक्त त्यांची जाणीव प्रेमाने होते. अनुभूतीने ते आपले जीवन सुखकर करत असतात. फक्त आपले अवधान असायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.