- शिरूर येथे ‘झाडीबोली साहित्य आणि संस्कृती’ विषयावर व्याख्यान संपन्न
- मागील पिढीच्या ज्ञानाचे संचित बोलीभाषेत – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर
पुणे – शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मराठी विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर यांच्या संयुक्त सहकार्याने झाडीबोली साहित्याचे अभ्यासक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते होते तर उपप्राचार्य एच. एस. जाधव, मराठी विभाग प्रमुख डॉ. बाळकृष्ण लळीत, ज्येष्ठ पत्रकार सतीश धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात बोलणारी झाडी बोली ही झाडीपट्टीचा प्राण आहे. मागीलपिढीतील ज्ञानाचे व अनुभवांचे संचित बोलीभाषेत साठवलेले असते. त्यामुळे आपली संस्कृती समजून घेण्यासाठी आपल्या प्रांतातील लोकनाट्य, लोकगीते, लोककथा यांचा नीट अभ्यास भाषा शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी करावा. बोलीला उर्जितावस्था यावी, बोली शब्दांचे संकलन केले जावे आणि बोलीचा प्रचार प्रसार व्हावा, याकरिता नवयुवकांनी सांस्कृतिक लोकदूत म्हणून पुढे यावे, असेही ते म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता ग्रंथाचे अनुषंगानेही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.बाळकृष्ण लळीत यांनी प्रास्ताविक करताना मराठीच्या विविध बोलीची माहिती देत त्यांनी झाडीपट्टीतील आनंदवन, डॉ. प्रकाश आमटे यांचे लोकबिरादरी हेमलकसा प्रकल्प,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गुरूकुंज आश्रम यावर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ.काकासाहेब मोहिते म्हणाले की, मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी असे बोली भाषाविषयक व्याख्यानं होणे गरजेचे असून यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, असे ते म्हणाले.
शिरूर चे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सतीश धुमाळ यांनीही याप्रसंगी समयोचित विचार व्यक्त करून महाविद्यालयीन उपक्रमास शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.