November 22, 2024
Nanda Pandit empowering women and children
Home » महिला, मुलांना सक्षम करणारी नंदा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

महिला, मुलांना सक्षम करणारी नंदा

ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!

काही मुली लहानपणापासून काही स्वप्न घेऊन प्रचंड अभ्यास, मेहनत व कष्ट घेतात त्यांपैकी पूर्वाश्रमीची नंदा हेमाडे व आजची नंदा पंडित. बी. ए. राज्यशास्त्र करून एल.एल.बी. करत असतानाच महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन पोलिस सब इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती झाली. १९९२ साली महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी मधे १ वर्षाचे कठीण प्रशिक्षण घेऊन मुंबई पोलिस दलात नंदाताई रूजू झाल्या.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे. मो. 9823627244

खरंतर नंदाताईंचे आर्मी जॅाईन करायचे स्वप्न होते. परंतु त्यावेळी आर्मीत फक्त मेडिकल मधेच प्रवेश होता. इतर विभागात महिलांचा समावेश होत नव्हता. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवत ताई लग्नापूर्वीच पोलिस विभागात अधिकारी झाल्या. त्यांच्या सर्व शैक्षणिक प्रवासात त्यांच्या आईवडीलांचा प्रचंड पाठिंबा होता. खास करून वडीलांनी त्यांना मुलाप्रमाणे वाढवले. वडीलच त्यांचे आयडॅाल होते. आज जे त्यांचे ‘डॅशिंग व्यक्तिमत्व’ दिसते त्याची बीजं बालपणात आहेत. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हायला हवे हे त्यांनी सतत ऐकले आहे. वडीलांनी दिलेली संस्काराची शिदोरी ही आज वयाच्या या टप्प्यावर व ज्या क्षेत्रात आज ताई कार्यरत आहेत तेथे फार उपयोगी पडते अशी भावना त्या व्यक्त करतात. पोलिस वर्दीतील योग्य संस्कार देण्याचे काम व त्यांना मिळालेली सामाजिक व नैतिक मूल्ये त्यांचे गुरू श्री. कोल्हटकर सरांनी दिलेली कायम स्मरणात ठेवून ताई त्यांचे ऋण व्यक्त करतात.

पोलिस इन्स्पेक्टर म्हणून ११ वर्ष पोलिस दलात सेवा करून नोकरीचा राजीनामा देऊन ताईंनी आपले पती संतोष पंडित यांचा डेस्कटॅाप आणि लॅपटॅाप विक्री व सर्व्हिसिंगचा व्यवसाय वाढीसाठी मदत सुरु केली. त्याचवेळी मॅारिशस येथील ‘मॅारिशस मराठी मंडळी फेडरेशन’ या संस्थेचे लायझनिंग ॲाफिसर म्हणून भारताबाहेर असलेल्या मराठी वंशाच्या माय बांधवासाठी काम करायची संधी त्यांना मिळाली. ताई गेल्या १८ वर्षापासून दरवर्षी मॅारिशसला जाऊन मराठी बांधवांसाठी बिझीनेस सेमिनार, गणेशोत्सव, प्रदर्शन आणि विक्री, महिला बचतगटांच्या वस्तू व खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे आयोजन प्रतिवर्षी करतात. अशा गोष्टी भारतात राहून करणे शक्य आहे पण मॅारिशसमध्ये जाऊन याचे नियोजन हे आव्हानात्मक असताना ताई ते सहजगत्या करतात याचा त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटतो.

विविध पध्दतीचे सामाजिक काम करत असताना ताई अनेकदा संधीचा फायदा करून घेतात, तशीच एक आनंद व अभिमानाची गोष्ट म्हणजे जुलै २०२३ मधे दिल्लीमधील ICCR च्या मदतीने मॅारिशस मराठी मंडळी फेडरेशनच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा साडेबारा फुटाचा ब्रांझचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचे भाग्य नंदा व संतोष पंडित यांच्या प्रयत्नाने त्यांना लाभले आहे.

ताई बालपणापासून राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात मोठ्या झाल्या आहेत. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शन व सहवासात वाढल्या आहेत. तसेच रामकृष्ण मठातील स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस व माताजी यांच्या ज्ञानवर्धक पुस्तक वाचनाने ताईंचे व्यक्तिमत्व घडायला व समृध्द व्हायला खूप मदत झाली. राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारामुळे समाजसेवेचे व्रत ताईंच्या अंगी बाणले होतेच. त्यात पतीची साथ लाभल्याने ते वृध्दींगत झाले. ताई लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ताई ८ वी ते १० वीच्या मुलांना मार्गदर्शन, सुजाण नागरिक बनण्याची ओळख करून देण्याचे काम करतात. अनेक सेवाभावी संस्था, वृध्दाश्रम, आश्रमशाळा अशा ठिकाणी त्यांचे अन्नदानाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. पोलिस सेवेतून राजीनामा दिला असला तरीही पोलिसांच्या मदतीने समाजातील तळागाळातील मुलामुलींसाठी ताई अनेक उपक्रमांचे आयोजन करतात. आपणही देशाचे काही देणे लागतो या भावनेने बॅार्डरवरील जवानांसाठी राखी व दिवाळी फराळ पाठवण्याचे कार्य गेली १२ वर्ष सातत्याने चालू आहे. यापुढील काळात ताई ‘अवयवदान’ साठी समाजजागृती करायचा मनोदय व्यक्त करतात. अव्याहतपणे समाजसेवा हेच आता ताईंचे उद्दिष्ट आहे.

ताईंना नोकरीत असताना ७ पाकिस्तानी खोट्या पासपोर्टसहित पकडल्यामुळे त्या कामाचे त्यांना ॲवॅार्ड मिळाले. अन्नदान, रक्तदान, इंटरनॅशनल युथ एक्स्जेंज, मानवतावादी विविध कामासाठी लायन्स सेवा पुरस्कार, मॅारिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे छ. शिवाजीराजे भोसले आंतरराष्ट्रीय पारितोषिक, नवदुर्गा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहे. आयुष्यात संघर्ष बराच करावा लागला परंतु संघर्षातूनच आपण घडत असतो, यशस्वी होत असतो या भावनेने त्या सतत कार्यरत आहेत.

आपल्या अंगी असलेल्या धाडसी, कष्टाळू, समाजासाठी सतत काहीतरी करायचे स्वप्न उराशी बाळगून सतत कार्यरत असणाऱ्या अनेक महिला व मुलांना सक्षम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा नंदाताईंना मानाचा मुजरा..!!

नंदा पंडित – 93700 56665


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading