December 5, 2024
Nano material coating enhances fertilizer efficiency
Home » नॅनो द्रव्य आवरण वाढवते खताची कार्यक्षमता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नॅनो द्रव्य आवरण वाढवते खताची कार्यक्षमता

नव्याने विकसित नॅनो द्रव्य आवरण खतांच्या झिरपण्याचा वेग कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढवू शकतो

नवी दिल्ली – एक यांत्रिकदृष्ट्या स्थिर, जैवविघटनकारक, हायड्रोफोबिक म्हणजेच पाण्यात न विरघळणारे नॅनोआवरण द्रव्य रासायनिक खतांचा मातीत झिरपण्याचा वेग कमी करून आणि त्यायोगे या रसायनांचा रिझोस्फियर स्तरातील माती, पाणी तसेच जीवाणूंशी संपर्क मर्यादित करुन या रासायनिक खतांच्या पोषक द्रव्य म्हणून वापराची कार्यक्षमता वाढवू शकते. नॅनोक्ले-रिइंफोर्स्ड बायनरी कर्बोदकांपासून तयार होणारे हे आवरण खताची सुचवलेली मात्रा कमी करुन पिकाचे वाढीव उत्पादन राखू  शकते.

हरित क्रांतीचा भाग म्हणून गेल्या 50 वर्षांपासून मातीमधील पोषक तत्वांचे प्रमाण कायम राखण्यासाठी सतत रासायनिक खतांचा वापर करण्याची पद्धत स्वीकारण्यात आली, जेणेकरून पिकांची उत्पादकता वाढवता येणे शक्य होईल. मात्र, रासायनिक खतांचा सततचा आणि अति प्रमाणातील वापर जागतिक शाश्वत विकासासाठी धोकादायक ठरतो. म्हणूनच संशोधक रासायनिक खतांचा अधिक कार्यक्षमतेसह वापर करण्याच्या पद्धतींचा सतत शोध घेत असतात.

आता, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या, मोहाली येथील नॅनो विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतील (आयएनएसटी) वैज्ञानिकांनी पिकांची पोटॅशियमची 80% गरज भागवणाऱ्या  म्युरिएट ऑफ पोटॅश (केसीएल) या खताच्या दाण्यांना चिटोसॅन आणि लिग्निन या बायनरी कर्बोदकांचे आवरण किंवा आच्छादन घातले. या प्रक्रियेत त्यांनी स्थिर समन्वयक बंधांसाठी अनुकूल ठरणारा मजबुतीकारक पदार्थ म्हणून अॅनियोनिक क्लेचा वापर केला.

आयएनएसटीमधील बी.के. साहू,  के.स्वामी,  एन.कपूर,  ए.अग्रवाल,  एस.कटारिया,  पी.शर्मा,  पी.कुंडू,  एच.थंगवेल, ए. वट्टक्कुनिवील, ओ.पी.चौरासिया आणि व्ही.षण्मुगम यांच्या पथकाने खताच्या दाण्यांना एकसमान पद्धतीने आच्छादन करुन खताची वापरविषयक कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रम रोटर पद्धतीचा वापर केला.

पाण्याला रोखण्यासंदर्भात नॅनो आवरणाच्या क्षमतेला अनुसरत,पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतामधील द्रव्ये झिरपण्याची गती निश्चित करण्यात आली. त्याबरोबरच, नव्याने विकसित द्रव्याची जैवविघटनकारकता आणि जीवन चक्राचे केलेले मूल्यमापन यांनी पारंपरिक रासायनिक खतांपेक्षा या नव्या खतांची शाश्वतता सुनिश्चित केली.त्याशिवाय, नॅनो आवरण असलेल्या खतांची प्रत्यक्ष कामगिरी त्यांचा वाहतूक तसेच पुरवठा साखळीतील औद्योगिक वापराची हमी देते.

हळू हळू पोषक द्रव्ये झिरपणारी खते हा पोषक द्रव्यांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पारंपरिक खतांना सक्षम पर्याय ठरू शकेल. कमी प्रमाणात आवश्यक असलेली ही नवी रासायनिक खते आणि त्यांच्या वापरामुळे तांदूळ आणि गव्हाचे वाढलेले उत्पादन यातून कमी सामग्रीच्या वापरातून अधिक चांगले परिणाम मिळणे सोपे झाले आहे. यातून पारंपरिक खतांच्या वापरातून होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत आपल्या देशातील शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती आणि देशाची अर्थव्यवस्था यामध्ये अधिक चांगली सुधारणा होईल. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading