वेळ अद्याप गेलेली नाही. जीवंत असे पर्यंत आपण यासाठी सावध होणे गरजेचे आहे. हा मानव जन्म हा त्यासाठीच आहे हे ओळखून स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. ती झाल्यानंतर तसे जीवन जगायला हवे. यासाठीच हा मानव जन्म आहे. बाकी सर्व भटकंती ही व्यर्थ आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
म्हणोनि अझूनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होई ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – म्हणून अर्जुना , अजुन तरी या अनुचित गोष्टींकडे तूं लक्ष देऊ नकोस, तूं लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो.
सावध होण्याची सुचना सद्गुरु, भगवंत वारंवार करत असतात. साधनेत सावधानतेला महत्त्व आहे. जीवनात सावधानता ही हवीच. आपण सावध नसल्यामुळेच आपणास योग साधत नाही. एकाग्रता होत नाही. एकाग्रता वाढवण्यासाठीच सावध होऊन मनाला खंबीर करण्याची गरज आहे. मनातच हा बदल घडवायला हवा. साधना ही मनापासून, मन लावून करायला हवी. मन साधनेत रमत नाही. मग करायचे काय ? यासाठीच सावधानता ही हवीच. सावध होऊन मनाला साधनेकडे आकर्षित करायला हवे. त्यात गुंतवून ठेवायला हवे. मन भरकटले तरी त्याला ताळ्यावर आपणच आणायला हवे. जपाच्या कितीही माळा ओढल्या तरी त्या सर्व व्यर्थ आहेत. कारण जप हा मनापासून करायला हवा. मनाने तो जपाचा स्वर अनुभवायला हवा. तो स्वर मन लावून कानाने ऐकायला हवा. म्हणजेच त्या स्वराची अनुभुती घ्यायला हवी. तेंव्हाच तो स्वर आपल्या शरीरात संचार करेल. शरीराला त्याची ओळख होईल. शरीर अन् आत्मा वेगळा असल्याची अनुभुती त्यातून येईल. यासाठीच साधना आहे. या साधनेसाठी सावधनता ही हवीच.
वेळ अद्याप गेलेली नाही. जीवंत असेपर्यंत आपण यासाठी सावध होणे गरजेचे आहे. हा मानव जन्म हा त्यासाठीच आहे हे ओळखून स्वतःची ओळख स्वतः करून घ्यायला हवी. ती झाल्यानंतर तसे जीवन जगायला हवे. यासाठीच हा मानव जन्म आहे. बाकी सर्व भटकंती ही व्यर्थ आहे. मनोरंजनाची अनेक साधने आपल्याजवळ आहेत. यातून मिळणारा आनंद हा क्षणिक आहे. आनंदासाठी आपण त्याकडे आकर्षित होतो, अन् त्यात गुंतून पडतो. ही साधने मनाला क्षणिक आनंद जरूर देतात, त्यामुळे त्यात आपण गुंतत जातो. त्याची सवय आपणास लागते. ही सवय व्यसनात रुपांतरीत होते. सध्या अशा साधनांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे मनुष्य शाश्वत आनंदाला मुकला आहे.
जीवनाचा खरा आनंद देणाऱ्या साधनेकडे आपणास पाहायला वेळच नाही. झटपट आनंद त्यात मिळत नाही म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. खरे तर हा आनंद हा आपणास मिळवावा लागतो. तोही आनंदानेच मिळवावा लागतो, फक्त त्यासाठी थोडेफार कष्ट पडतात. हे कष्टही आनंदानेच सोसायचे असतात. मनाची तयारी मात्र यासाठी साधावी लागते. ते साधने शक्य नसल्यामुळेच आपण त्यापासून दूर लोटले जात आहोत. पण क्षणिक आनंद देणारी ही साधने आपणाला आनंदा ऐवजी दुःख देऊ लागतात तेंव्हा आपणास खरा आनंद शोधण्याची ओढ लागते अन् मनुष्य मग अध्यात्माकडे वळतो.
मनाची तयारी व्हावी लागते तेंव्हाच मग खऱ्या आनंदाचा स्वाद घेता येतो. याची गोडीही तेंव्हाच लागते. यासाठी अनुचित गोष्टींकडे लक्ष न देता आवश्यक अन् शाश्वत आनंद देणाऱ्या साधनेवर लक्ष केंद्रीत करायला हवे. हे युध्द हे आपले आपणाशीच आहे. आपल्यातील वाईटाविरूद्ध हे युद्ध आहे. त्यावर मात करण्यासाठी, त्यावर विजय मिळवण्यासाठी आपण सावध होऊन युद्ध करायला हवे. सावधनता ढळली तर तेच आपला पराभव करतील, हे ओळखून आपण सावध होऊन आपले मन साधनेवर केंद्रीत करायला हवे. योग म्हणजे ऐक्य साधने. मनाचे ऐक्य साधत, एकाग्रता साधने. साधनेतील स्वरावर, जपावर एकाग्रता साधने यातूनच मग तो स्वर अनुभवने अन् आत्मज्ञानाची अनुभुती घेणे हे साधते.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.