प्रभाकरने चितारलेली व्यक्तीचित्रे खूप काही शिकवून जातात. पडेल ते काम करण्याची चिकाटी, जिद्द आणि धमक असेल तर परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग हे निघतातच हा आशावाद त्यांच्या विविध कथानकातून सिद्ध होतो.
दीपक जगदाळे, कोल्हापूर. ✒️
उगवत्या सुर्याला तर सर्वजण नमस्कार करतात; पण मावळत्या सुर्याचासुध्दा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे…! कारण त्यानंतरची शीतलता मनाला शांती देऊन जाते. दिवसभराचा सारा शीन घालवते. तद्वतच ज्या आईवडिलांनी दिवसरात्र एक करुन मुलांना वाढवलेले असते त्या मुलांनी मातापित्यांना त्याच्या उतारवयात सूर्यास्तानंतरची शितलता द्यायला हवी..! सूर्यास्त या कथेचा आणि ठिगळ या कथासंग्रहाचा शेवट करत लेखकाने माणूसकी जपण्यासाठी केलेलं आवाहन मन हेलावून टाकतं.
आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते तसं जगण्याची आवश्यकता आहे. मागे वळून जरा पाहा तरी; आपल्याच आयुष्यातील अनेक घटना, प्रसंग ताजे होतील आणि मग त्याची सुंदरता अजून वाढत जाईल. कधी भीती, कधी माया, कधी प्रेम तर कधी संघर्ष ठायीठायी उफाळून येईल.
दररोज होणारा सुर्योदय आणि सुर्यास्त हा नुसता दिनक्रम नसतो तर अनेक आठवणी, शिकवणी, अनुभव यांनी भरलेला असतो. सूर्याने या साऱ्या आठवणी शब्दबद्ध केल्या तर काय आनंद होईल..? काल्पनिक वाटेल ना? पण या सूर्याने अर्थात प्रभाकरने त्यांना मूर्त स्वरूप दिलं आहे. अवतीभवती घडलेल्या सहजसूलभ घटनांना, प्रसंगांना अगदी हळुवारपणे हाताळत, कुरवाळत शब्दबद्ध करणं आणि वाचकाला त्या वाचण्यासाठी प्रवृत्त करणं एवढं सोप्पं नसतं;पण प्रभाकरने हे दिव्य यशस्वीपणे पार पाडलं आहे.
प्रभाकरने चितारलेली व्यक्तीचित्रे खूप काही शिकवून जातात. पडेल ते काम करण्याची चिकाटी, जिद्द आणि धमक असेल तर परिस्थिती कितीही वाईट असो मार्ग हे निघतातच हा आशावाद त्यांच्या विविध कथानकातून सिद्ध होतो. प्रेम, मातृ प्रेम, देशप्रेम या साऱ्या भावनांना गुफत अनेक प्रसंग कळतनकळतपणे प्रभाकरने लिलया हाताळले आहेत.
यातील विविध प्रसंग अनेकदा डोळ्यांच्या कडा ओलावून टाकतात. भावविवष होण्यास भाग पाडतात तर काही अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देतात. समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यास मदत करणारे काही काल्पनिक प्रसंग नकळतपणे हे काही खरं नसतं याची आठवण करून देतात. गल्लीतील, गावातील राजकारणापासून ते शिक्षकांचं काम आणि त्यांची होणारी अवहेलना मनाला नकळत हळवे करतात. अनेक कथानकांना एकत्र गुंफत एक सुंदर कलाकृती तयार झाली आहे जशी की अनेक ठिगळं जोडून आईच्या मायेनं तयार होणारी गोधडी, वाकळ…! इथं आवर्जून मला माझ्या आईची आठवण येते, तिनही माझ्यासाठी अशीच एक वाकळ तयार करून त्यावर धाग्यांनीच लिहून ठेवलंं आहे, ‘आईची माया’.
असे अनेक प्रसंग आपल्या साऱ्यांच्या जीवन घडून गेले असतील, अनुभवले असतील किंवा कदाचित तुम्ही ते जगलाही असाल. असं आपलसं वाटणारं हे पुस्तक ठिगळ सर्वांनी आवर्जून वाचावं असंच आहे.

पुस्तकाचे नाव: ठिगळ
लेखक : प्रभाकर कमळकर.
किंमत: ₹125
सवलतीचा दर : 100 रु
Google pay नंबर : 8605204545
प्रकाशक: ज्ञानसंवर्धन प्रकाशन.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.