मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे आश्वासक नेतृत्व निलेश राणेंच्या पाठीशी आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ‘शिवसेनेचा वाघ’ असा उल्लेख केला. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांची घोडदौड चालू आहे. १७ मार्च हा निलेश राणे यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा !
डॉ. सुकृत खांडेकर
गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाला लागला आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश नारायण राणे आणि नितेश नारायण राणे दोघेही बंधू विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून आले. सख्खे भाऊ एकच जिल्ह्यातून एकाच निवडणुकीत विजयी होतात असे महाराष्ट्रात प्रथमच घडले असावे. त्यांचे पिताश्री नारायण राणे हे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतून भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. एकाच जिल्ह्यातून वडील खासदार, दोन्ही पुत्र आमदार व त्यातील एक म्हणजे नितेश राणे हे राज्यात कॅबिनेटमंत्री आहेत. तिघांकडे आपल्या कार्यकर्त्यांची फौज आहेच तसेच जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांची केडर आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राणे परिवार हे समीकरण आहे.
निलेश राणे हे पंधराव्या लोकसभेत २००९ ते २०१३ या काळात खासदार होते, त्याच मतदारसंघातून आज नारायण राणे लोकसभेवर कोकणाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
नारायण राणे हे स्वत: मैदानात उतरले म्हणूनच कोकणात भाजपचे कमळ प्रथमच फुलले. राणे परिवाराला राजकारणात अनेक विरोधक आहेत पण त्यांनी त्यांचा कधी दुस्वास केला नाही मात्र जर कोणी अंगावर आले तर त्यांना कधी सोडले नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर निलेश राणे म्हणाले – आता विधानसभेत राणे बंधूंचा आवाज घुमणार आहे. विधानसभेत कोणी काही वेडंवाकडं बोललं तर त्याला आम्ही जागेवरच धडा शिकवू. आपण स्वत: दहा वर्षांनी लोकप्रतिनिधी झालो आहोत. हे पद मिरविण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी आहे, हीच आपली भावना आहे.
निलेश राणे यांचा पराभव करण्यासाठी उबाठा सेनेने चंग बांधला होता. निवडणुकीच्या काळात रोज काही ना काही बनावट रचलेली कथानके आणि अफवा पसरविण्याचे उबाठा सेनेने बरेच उद्योग करून बघितले. पण वैभव नाईक यांचा निलेश यांनी दणदणीत पराभव केलाच आणि गेल्या दोन निवडणुकीतील वचपाही काढला…. खरं तर नारायण राणे यांनीच कोकणात विशेषत: सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचे बीज पेरले आणि शिवसेना वाढवली. मात्र ते स्वत: शिवसेना सोडून बाहेर पडल्यावर त्यांनी वाढविलेल्या पक्ष संघटनेचा लाभ इतरांनी घेण्याचा प्रयत्न केला. सन २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला मतदारांनी साफ नाकारले त्याचे सर्व श्रेय राणे परिवाराला आहे.
निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढले व धनुष्यबाण या चिन्हावर त्यांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना जागा वाटपात कुडाळ-मालवणचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. येथून निलेश राणे निश्चित निवडून येणार याची खात्री एकनाथ शिंदे यांना तर होतीच आणि मतदारसंघातील कामामुळे आपण विजयी होणार असा आत्मविश्वास निलेश यांना होता. निलेश यांनी आपल्या कामातून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा विश्वास संपादन केला आहे. महायुतीचे आमदार म्हणून ते आपली भूमिका विधानसभेत आणि मतदारसंघात बजावताना दिसत आहेत.
निलेश राणे यांची निवडणूक प्रचार काळात सोशल मीडियावर एक छान क्लिप फिरत होती. सरकारी रुग्णालये ही अत्यावश्यक सेवा समजली जातात. प्रत्यक्षात तिथली वैद्यकीय सेवा म्हणजे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना शिक्षा वाटते. महिनोन् महिने आणि वर्षानुवर्षे रुग्णांवर उपचार चालू असतात पण तो बरा होत नाही. नर्स वेळेवर येत नाही तर डॉक्टर कुठे असतात हे ठाऊक नाही. सलाइन नाही म्हणून कोमट पाणी प्या, असा सल्ला दिला जातो. शेवटी रुग्णाचा नातेवाईक डॉक्टर आल्यावर त्यांना नारळ देतो व हात जोडून म्हणतो, आता बदल घडवायला हवा. इतकी वर्षे आमचीच चूक झाली. आता धनुष्यबाण आणू या.…
विधानसभेत आमदार म्हणून निलेश प्रथमच निवडून आले. मैदानावर त्यांची प्रतिमा आक्रमक आणि लढाऊ असते. पण विधानसभेत भाषण करताना ते अतिशय शांत व मुद्देसूद बोलताना दिसतात. आपली भूमिका प्रभावीपणे मांडतात. आपण जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असलो तरी जनतेच्या भावना व लोकांचे प्रश्न सरकारकडे जोरदार मांडले पाहिजेत, ही त्यांची कार्यपद्धती आहे.
सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात देवबाग किनारपट्टीसाठी १५८ कोटींची तरतूद केली आहे ती निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळेच. पंचवीस वर्षांपूर्वी देवबागला वाचविण्याचे काम नारायण राणे यांनी केले होते. आता तेच काम निलेश राणे करीत आहेत. महाराष्ट्र पर्यावरणपूरक किनारा व संरक्षण व्यवस्थापन विभागामार्फत मालवण तालुक्यातील देवबागसाठी ही तरतूद आहे. या प्रकल्पांमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल, असे निलेश यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारने ६४०० कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी घेतली. निलेश राणे यांचे त्यावर बारीक लक्ष होते. ते म्हणाले, चर्चा फक्त ६९१ कोटींच्या मागण्यांवर होते आहे, ५९०० कोटींच्या मागण्यांवर चर्चाच होत नाही. चर्चेविना हजारो कोटींच्या मागण्या मंजूर होतात, हा कोणता कायदा आहे? निलेश राणे यांचा सरकारला बिनतोड सवाल होता. गेल्या पंचवीस वर्षांत कोकणात अनेक ठिकाणी गाळ काढण्यात आलेला नाही, त्यासाठी पुरेशी तरतूद करावी, असा महत्त्वाचा मुद्दा मांडणारे निलेश राणे हे एकमेव आमदार असावेत.
अभ्यासू पण आक्रमक व्यक्तिमत्त्व असलेल्या निलेश यांच्यात वडिलांचे गुण आहेत. त्यांची विधानसभेतील भाषणे ऐकताना त्यांच्या वडिलांच्या भाषणांची आठवण होते. स्वत: नारायण राणे यांची अर्थसंकल्पावरील भाषणे अत्यंत अभ्यासू व उत्तम विश्लेषण करणारी असायची. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी विधानसभेत सदस्यांची, वार्ताहर गॅलरीत पत्रकारांची आणि अधिकारी गॅलरीत नोकरशहांची हाऊसफुल्ल गर्दी असायची. आपल्या भाषणांकडे कोणी राजकीय दृष्टिकोणातून बघू नये, असे सांगत निलेश राणे वास्तव मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतात, ही त्यांची खासियत आहे.
विशेषत: कोकणातील जनता व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार डोळ्यांपुढे ठेऊन ते सभागृहात तळमळीने बोलताना दिसतात. कोकणातील रस्ते, किनारपट्टीवरील लोक, मच्छीमार यांच्या प्रश्नांवर ते आग्रही असतात. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे ते मनापासून कौतुक करतात.
केंद्र सरकारच्या एका अहवालात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३९ हजार कोटी परकीय गुंतवणूक आली असल्याची नोंद आहे, त्याचा निलेश राणे यांनी सभागृहात अभिमानाने उल्लेख केला.
गड-किल्ले हा शिवरायांकडून महाराष्ट्राला मिळालेला मौल्यवान वारसा आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन उत्तम राखले जावे याकडेही निलेश यांनी सरकारचे लक्ष वेधले. एमआयडीच्या दुरवस्थेकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले तसेच लोकसंख्येचा निकष लावून नगर परिषदा व नगरपंचायत यांना निधी कमी मिळत असेल, तर निकषांत बदल करणे गरजेचे आहे, असेही सांगितले.
विधानसभेत वैभव नाईक यांचा निलेश राणेंकडून पराभव झाला हे काही जणांच्या पचनी पडले नसावे. निलेश राणे निवडून आल्यावर ते भेटत नाहीत, आमची कामे कोण करणार, अशी कुजबुज मोहीम काहींनी सुरू केली. मुंबईतील वृत्तत्रांतून तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. हे सर्व कोण करतयं याची माहिती निलेश यांना होतीच. ज्यांचा हवाला देऊन अशी मोहीम काहींनी चालवली तेच लोक आम्ही निलेश यांच्या बरोबर आहोत, त्यांना आम्ही कधीही भेटू शकतो, असे जाहीरपणे बोलू लागले. आपल्या विरोधातील कुजबूज मोहिमेला निलेश यांनी कोणतेही महत्त्व दिले नाही, कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने ती विरोधी मोहीम दोन दिवसांतच बंद पडली.
निलेश यांचा मतदारसंघात संपर्क नियमित आहेच पण लहान-सहान प्रश्नांचीही समाधानकारक सोडवणूक व्हावी यासाठी त्यांचे बारीक लक्ष असते. ओरस बुद्रुकला शवपेटी, घंटागाडी, संगणकाचे लोकार्पण असो, पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे असोत, मालवण बंदरावर जेटी, कचरा व्यवस्थापन, पर्यंटकांसाठी प्रसाधन गृहे, बंदरावरील स्वच्छता व सुरक्षितता यावरही त्यांचे लक्ष असते. मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी नेहमी त्यांच्याबरोबर असतात, पण भाजपाचे पदाधिकारीही त्यांच्या बरोबर दिसतात.
निलेश राणे कुणाच्या पुढे पुढे करताना दिसत नाहीत. एकनाथ शिंदे तर पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना हाक मारून पुढे बोलावतात, असे अनेकदा घडले आहे. निलेश हे उच्चशिक्षित आहेत. डॉक्टरेट आहेत. स्वत:चा आब राखून ते काम करीत असतात. भेटायला आलेल्या लोकांचे ते प्रश्न समजावून घेतात. दुसऱ्याशी नेहमी ते आदराने बोलतात. भास्कर जाधव यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांचे वस्त्रहरण केले होते, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला निलेश राणे म्हणजे अँग्री यंग मॅन असे दर्शन घडले होते. कोणी त्यांच्या वडिलांचा अवमान केला, तर ते कधीच सहन करणार नाहीत. पण मतदारसंघात ते नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरताना दिसतात.
नारायण राणे यांना अभिमान वाटेल असे निलेश यांचे काम चालू आहे. वडिलांचे त्यांच्या पाठिशी आशीर्वाद आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य आणि उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे आश्वासक नेतृत्व निलेश राणेंच्या पाठीशी आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ‘शिवसेनेचा वाघ’ असा उल्लेख केला. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील महायुतीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांची घोडदौड चालू आहे. १७ मार्च हा निलेश राणे यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.