November 11, 2024
Sunetra Vijay Joshi article on Beautifulness
Home » सुंदरता…
मुक्त संवाद

सुंदरता…

Sunetra Joshi

जग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची नाती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर नजर तुमच्याकडे हवी. सुंदरता ही कुठल्याही बाह्य प्रसाधनाने येत नाही तर ती आतच असते.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी, मोबाईल 9860049826

सुंदरता शिर्षक वाचून डोळ्यासमोर सुंदर सुंदर गोष्टी आणि व्यक्ती आल्या असतील ना. आता हेच बघा रेखा, रीना, मधुबाला, मीनाकुमारी अशा अनेक नट्या सुंदर आहेत. पण तरी कुणाला रेखा आवडते तर कुणाला मधुबाला. तर सगळ्याच सुंदर असून असे का होत असावे ? सुंदरता नक्की कशात असते ?

सुंदरता ही व्यक्तीत किंवा वस्तूत नसते तर ती बघणार्‍याच्या नजरेत असते असे म्हणतात. बहुतांशी ते खरेही असावे. एखादी व्यक्ती निखालस सुंदर असतेही. किंवा एखादी वस्तू पण. तसेच एखादे दृश्य सुध्दा. त्याबद्दल दुमत नसते. पण कधीतरी आपलाच मुड चांगला नसतो, मग ते दृश्य किंवा ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटत नाही. समुद्र किनारा आपण दोघे मग तो किनारा सुंदर वाटतो. पण विरहात तोच नकोसा वाटतो. खरे तर दृश्य तेच असते पण परिस्थिती वेगळी.

प्रियासोबत जी संध्याकाळ सुंदर सांज असते तीच संध्याकाळ एकटेपणात कातरवेळ वाटते. शिवाय लैलाको देखो तो मजनुकी आखोंसे… असही ऐकलय. खरेच आहे. असेही उपरोधात्मक ऐकले आहे की दिल आया गधीपे तो पद्मिनी क्या चीज है… यातला अतिशयोक्तीचा भाग सोडा… पण खरेच कधीकधी प्रेमात पडलेल्या जोडीला बघून आपण भलेही मनातल्या मनात म्हणतो, पण म्हणतो की काय बघितले याच्यात किंवा हिच्यात कुणास ठाऊक ना रंगरुप ना पैसाअडका ना कुठला विशेष गुण… तरीही ते दोघे मात्र एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले असतात. म्हणजेच त्यांना एकमेकांतील काही तरी सुंदरता नक्कीच दिसलेली असेल. कदाचित मनमोकळा स्वभाव किंवा टापटीप किंवा निगर्वीपणा किंवा हुशारी किंवा शांतपणा वागण्याबोलण्यात असलेली विनम्रता. पण ते फक्त त्यांनाच दिसलेले असते.

कधीकधी काही व्यक्ती त्यांच्या साधेपणानेही उठून दिसतात. कुणाचा आवाज छान असतो, तर कुणाचे नृत्य सुंदर, कुणी सुंदर चित्र काढतो, तर कुणी उत्तम पदार्थ बनवतो असे काही ना काही गुण प्रत्येकाकडे असतात. आणि या प्रत्येक गुणांचा कुणी ना कुणी पारखी असतो. तसेच त्याच्या लेखी ती गुणात्मक सुंदरता त्याला महत्वाची वाटते. आणि असे आहे म्हणुनच प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.

सगळ्यांना एकच गोष्ट आवडली असती तर हे जग चालूच शकले नसते. जसे की आपले बाळ हे प्रत्येक आईला जगातले सगळ्यात सुंदर मुल वाटते. आणि खरच पिल्लू मग ते कुणाचही अगदी कुत्रा मांजराचे किंवा माकडांचे ते सुंदरच दिसते. खरे तर आपण कुणी विचित्र दिसत असेल तर काय माकडासारखे दिसतो असे म्हणतो. तर आपले बाळ हे काळे चपटे नकटे कसेही असले तरी छानच दिसते. इतके छान की त्याला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आई आवर्जून तीट तर लावतेच पण रोज दृष्ट काढायला सुध्दा विसरत नाही.

तर अशी ही सुंदरता आणि त्याच्या प्रेमात पडणारे आपण. मृत्यू खरे तर कुणालाच आवडत नाही. पण एखादे कृतार्थ वय झालेल्या व्यक्तीला जेव्हा काही त्रास न होता सहज मरण येते तेव्हा आपण म्हणतोच ना की मरण देखील सुंदर झाले हो. तेच अवेळी अर्धा संसार झालेला किंवा अपघाती मृत्यू आला तर तो भयंकर वाईट मरण आले असेही म्हणतो.

जग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची नाती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर नजर तुमच्याकडे हवी. सुंदरता ही कुठल्याही बाह्य प्रसाधनाने येत नाही तर ती आतच असते. आपण जसे आहोत तसेच छान आहोत हा आत्मविश्वास असेल तर तो चेहर्‍यावर झळकणार. आणि जगण्याची कला जर तुम्हाला अवगत असेल तर मग  अजून काय हवे ? सुंदर जीवनाचा सुंदर दृष्टीने आस्वाद घ्या. आणि इतरांचे जीवन पण सुंदर होऊ द्या.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading