November 12, 2025
बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे राजकीय भविष्य भाजपच्या निर्णयावर अवलंबून. एनडीए आघाडीत असतानाही मुख्यमंत्रीपदाचा तुरा कोणाला हे निकालानंतर ठरणार.
Home » नीतीश कुमारांचे भविष्य भाजपच्या हाती
सत्ता संघर्ष

नीतीश कुमारांचे भविष्य भाजपच्या हाती

स्टेटलाइन –

राजकारणात जेव्हा तरूण नेतृत्व येते तेव्हा जुने व नव्यांचा संघर्ष तीव्र होत जातो. लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, प्रशांत किशोर किंवा सम्राट चौधरी अशा तरूणांचा बिहारच्या राजकारणात बोलबोला अधिक आहे. सत्तेच्या राजकारणापासून लालूप्रसाद यादव दूर गेले आहेतच आता नीतीश कुमारही त्याच वाटेवर आहेत असे अनेकांना वाटते. मतदारांवर आर्थिक सवलतींचा नीतीश कुमार यांनी यावेळी मुबलक वर्षाव केला आहे. जर भाजपने त्यांना पाटण्याच्या सिंहासनावर बसू देण्यास अटकाव केला तर ते पुन्हा पलटूराम च्या भूमिकेत जातील का ? प्रकृती त्यांना साथ देईल का ? त्यांचे राजकीय भविष्य आता भाजपच्या हाती आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

बिहार विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान दोन टप्प्यात होणार आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीए निवडणूक लढवत आहे. निवडणुकीनंतर एनडीएला बहुमत मिळाले तर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे भाजपने उशीरा का होईना जाहीर केले आहे. तरीही निवडणुकीतील जर तरच्या राजकारणात गेली वीस वर्षे मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ७४ वर्षे वयाच्या नीतीश कुमार यांचे काय होणार हा कळीचा मुद्दा ठरला आहे. नीतीश कुमार यांच्या जनता दल यु पक्षाची गेल्या काही वर्षात घसरण चालू आहे. मोदींच्या वलयामुळे राज्यात भाजप मोठा होतो आहे. वलय मोदींचे आणि सत्तेचा लाभ नीतीश कुमार यांना हे फार काळ चालणार नाही. एनडीएला बहुमत मिळाले तर भाजप आपल्याकडे मुख्यमंत्री ठेवेल आणि फार तर नीतीश कुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देईल अशी चर्चा आहे.

नीतीश कुमार हे बिहारमधे एनडीएचे मुख्यमंत्री आहेत आणि जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुखही आहेत. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातात, तोच मुख्यमंत्रीदाचा उमेदवार असतो असा सर्वसाधारण समज असतो. पण अशा संकेताला भाजपने अनेक राज्यात छेद दिला आहे. बिहारमधे भाजपकडे तगडा नेता नाही. प्रदेश पातळीवरचा पक्षाकडे चेहरा नाही. मोदी – शहांचे ज्याला आशीर्वाद मिळतील तो राज्यात पुढे जाणार हे सामान्य कार्यकर्त्यालाही समजते. जर संधी मिळाली व भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर भाजप बिहारला आपला मुख्यमंत्री देईल असे अनेकांना वाटते.

बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे उदाहरण दिले जात आहे. सन २०१९ च्या निवडणुकीत सर्वाधिक आमदार भाजपचे आले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला सोडून दिले व काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करून सरकार स्थापन केले व त्याची किमत म्हणून ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडवल्यावर अवघ्या अडीच वर्षातच ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांचा गट व भाजप मिळून युतीचे सरकार स्थापन झाले.

खरे तर भाजपचे राज्यातील नंबर १ चे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळायला पहिजे होते, पण मोदी – शहांनी मुख्यमंत्रीपदाचा मुगूट एकनाथ शिंदे यांच्या मस्तकावर चढवला व देवेंद्र फडणवीस यांना अनिच्छेने उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागले. २०२४ मधे झालेली विधानसभा निवडणक महायुतीने शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवली. महयुतीचे सर्वाधिक विक्रमी २३५ आमदार विजयी झाले. पण भाजपच्या आमदारांची संख्या सव्वाशेच्याघरात पोचल्याने मुख्यमंत्रीपदावर भाजपाने दावा केला आणि शिंदे यांना दूर सारून फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो याला आता फारसे महत्व राहिलेले नाही. निकालानंतर विजयी आमदारांचे संख्याबळ काय असेल त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला हे ठरते हेच भाजपने दाखवून दिले आहे.

सन २०२० मधे बिहारमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ७४ व जनता दल यु चे ४३ आमदार विजयी झाले. आपले आमदार जास्त निवडून आल्यावरही भाजपने नीतीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. २०२२ मधे एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार कमी असतानाही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र नंतरच्या निवडणुकीत भाजपने हे सर्वोच्च पद देवेंद्र फडणवीसांकडे सोपवले व शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर राजी केले.. तोच फॉर्म्युला भाजप बिहारमधे वापरणार का ? एनडीएला सत्ता मिळाली व भाजपचे जास्त आमदार निवडून आले तर नीतीश कुमार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी होतील का ? बिहारमधे भाजप नीतीश कुमार यांचा एकनाथ शिंदे करतील का ?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप व जनता दल यु हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १०१ जागा लढवत आहेत. आम्ही तुल्यबळ आहोत हेच भाजपने जागा वाटपात जनता दल यु ला दाखवून दिले आहे. भाजपने काही जागा मित्र पक्षांना सोडल्या आहेत. सन २०२० च्या निवडणुकीत भाजपने ११० जागा लढवल्या होत्या व जनता दल यु ने ११५ जागा लढवल्या होत्या. जागा निवडून येण्याचा स्ट्राईक रेट हा जनता दल यु पेक्षा आपला जास्त आहे हे भाजपने गेल्या निवडणुकीत सिध्द करून दाखवले आहे व तसेच यंदाच्याही विधानसभा निवडणुकीत अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वयंघोषीत हनुमान असलेले लोकजनशक्ति पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी २०२० ची निवडणूक स्वबळावर लढली होती, त्यांच्या पक्षाने किमान २८ मतदारसंघात जनता दल यु चे नुकसान केले होते. बिहारमधे निवडणुकीच्या राजकारणातील नवे खेळाडू जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर हे यावेळी चिराग पासवान यांची भूमिका बजावतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

नोव्हेंबर २०२३ मधे मध्य प्रदेशात तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वखाली भाजपने निवडणूक लढवली. चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या शिवराजसिंग यांनी निवडणूक जिंकून दिली पण पक्षाने त्यांचा कार्यकाल वाढवला नाही.

बिहारमधे नीतीश कुमार हे भाजपाचे मित्र आहेत. त्यांच्या पक्षाचे आमदार कमी असुनही भाजपने त्यांना बिहारमधे मोठा भाऊ मानले आहे. पण स्वत:ची ताकद वाढल्यानंतर मित्राला किती काळ मोठा भाऊ मानत रहायचे ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री कोण हे ठरवता येईल असे उत्तर दिले होते. हीच खरी भाजपची रणनिती आहे. नीतीश कुमार यांना कोणी चाणक्य म्हणत असले तरी राजकारणात ते पलटूराम म्हणूनच प्रसिध्द आहेत. त्यांनी राजद, काँग्रेस आणि भाजपशी मैत्री करताना अनेकदा खोखो खेळला आहे. याच खेळातून त्यांनी गेली वीस वर्षे आपले मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवले आहे. सन २०१३ मधे त्यांनी भाजपशी नाते तोडले व २०१५ मधे राजद बरोबर महाआघाडी सरकार स्थापन केले. सन २०१७ मधे ते पुन्हा एनडीए मधे परतले आणि सन २०२२ मधे पुन्हा महाआघाडीमधे सामील झाले.

सन २०२४ मधे नीतीश कुमार पुन्हा भाजप प्रणित एनडीएच्या तंबूत दाखल झाले, नीतीश कुमार यांच्याशिवाय आपल्याला बिहारमधे सरकार चालवता येणार नाही, असे भाजप किंवा राजदला वाटू देणे हेच नीतीश कुमार यांचे राजकीय कौशल्य आहे. नीतीश कुमार यांच्या पक्षाकडे आमदारांची संख्या किती आहे, हा मुद्दा बिहारच्या राजकारणात नेहमीच गौण राहिला आहे. गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कायम आहे, म्हणूनच राजद, काँग्रेस किंवा भाजप त्यांना टाळू शकत नाही.

लालूप्रसाद यादव यांनी राज्यातील ओबीसींना सशक्त बनवले पण मागास, अतिमागास व अल्पसंख्यांकांचे मसिहा अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. १९९० च्या दशकात जनता दलाचे नेते शरद यादव यांच्या दिल्लीतील फिरोजशाह रोडवरील निवासस्थानी लालू यादव व नितीश कुमार हे दोघे नेहमी चांगले दोस्त म्हणून ओळखले जायचे. १९९० मधे लालू यादव मुख्यमंत्री झाले. लालू यादव व नीतीश कुमार या दोन नेत्यांनी बिहारला तीन दशकाहून अधिक काळ नेतृत्व दिले.

राजकारणात जेव्हा तरूण नेतृत्व येते तेव्हा जुने व नव्यांचा संघर्ष तीव्र होत जातो. लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव, प्रशांत किशोर किंवा सम्राट चौधरी अशा तरूणांचा बिहारच्या राजकारणात बोलबोला अधिक आहे. सत्तेच्या राजकारणापासून लालूप्रसाद यादव दूर गेले आहेतच आता नीतीश कुमारही त्याच वाटेवर आहेत असे अनेकांना वाटते. मतदारांवर आर्थिक सवलतींचा नीतीश कुमार यांनी यावेळी मुबलक वर्षाव केला आहे. जर भाजपने त्यांना पाटण्याच्या सिंहासनावर बसू देण्यास अटकाव केला तर ते पुन्हा पलटूराम च्या भूमिकेत जातील का ? प्रकृती त्यांना साथ देईल का ? त्यांचे राजकीय भविष्य आता भाजपच्या हाती आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading