मुंबई कॉलिंग –
नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती. नवी मुंबई उभारताना शेतकरी व भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले होते.
डॉ. सुकृत खांडेकर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महामुंबईचा कायापालट होणार आहेच, पण भारतीय व्यवसायाचे भविष्य घडविणारे ते केंद्र ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जागतिक प्रतिष्ठेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत, असा मान देशात केवळ मुंबई महानगर प्रदेशाला मिळालेला आहे. अत्याधुनिक सेवा, सुविधा व तंत्रज्ञान असलेली वास्तू भविष्यात देशाचे वैभव म्हणून ओळखले जाईल. भविष्यात नऊ कोटी प्रवाशांची ये जा होईल. एअर इंडिया, इंडिगो, अकासा या मोठ्या कंपन्यांची विमाने लवकरच उड्डाणे करू लागतील.
गेली दोन दशके अनेक अ़डथळे व संकटांवर मात करून या भव्य विमानतळाचे शानदार उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. नवी मुंबईच्या उभारणीत रायगड जिल्ह्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान सर्वात मोठे आहे. शेतकऱ्याच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोठी होती. नवी मुंबई उभारताना शेतकरी व भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले होते. म्हणूनच या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे उचित ठरेल अशी भूमिका लोकनेते रामशेठ ठाकूरांसह सर्वच राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी आग्रहाने मांडली. नवी मुंबई विमानतळ उभारतानाही मोठा संघर्ष बघायला मिळाला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी रायगड जिल्ह्यात अनेकदा मोठी आंदोलने झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे अशीही मागणी सुरूवातीला होती पण स्थानिक जनतेचा रेटा दिबांच्या नावासाठी प्रचंड होता व आजही आहे. दि. बा. पाटील यांची शेकाप पक्षाचा लढाऊ नेता अशी प्रतिमा होती. विधिमंडळात आणि रस्त्यावर लोकांसाठी व भूमिपुत्रासाठी लढणारा हा नेता होता. वातानुकुलीत आणि पंचतारांकीत संस्कृतीला त्यांनी कधी स्पर्शही केला नाही. अहंकार तर मनाला कधी शिवला नाही. खणखणीत आवाजात ते सरकारला जाब विचारत असत. प्रश्न मांडताना मुख्यमंत्री कोण आहे व सरकार कोणत्या पक्षाचे आहे, याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई उभारली गेली आणि आता छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावरचा ( सांताक्रूज ) बोजा कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी झाली.
दि. बा. पाटील हे पनवेल- उरण भागातून शेकापक्षाचे आमदार होते. सिडकोने नवी मुंबई उभारणीसाठी भू संपादन सुरू केल्यापासून त्यांना शेतकऱ्यांवरील संकटाची जाणीव झाली. शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी मोठे लढे दिले. वसंतदादा पाटील, शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा संघर्ष केला. १९८४ मधे जासईमधे झालेल्या आंदोलनाने सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. जमलेल्या पन्नास हजार शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व गोळीबारात पाच जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर सरकार नमले व दिबांनी केलेली मागणी प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली. मोबदला म्हणून एकरी भाव आणि साडे बारा टक्केचा विकसित भूखंड प्रकल्पग्रस्तांना देण्याचे सरकारने मान्य केले. दिबा म्हणजे प्रकल्पग्रस्तांचा मसिहा बनले. ते उत्तम वकिल होते. पण शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आयुष्यभर वाहून घेतले. आगरी समाजाला त्यांनी प्रगतीची दिशा दाखवली. रायगडमधील दिबा पाटील व दत्ता पाटील ही जोडी विधिमंडळात सरकारला सळो की पळो करून सोडत असे. एन. डी. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सीमा प्रश्नावर आवाज उठवला. सीमेवर आंदोलन करून तुरुंगवास भोगला. तब्बल पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेले दिबा आणीबाणीनंतर १९७७ मधे लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. ते दोन वेळा खासदार झाले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. १९८३- ८४ मधे विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कामगिरी सरकारला घाम फोडणारी होती. आजारी असतानाही सिडको किंवा सरकारबरोबर बैठकांसाठी ते रूग्णवाहिकेतून आल्याची उदाहरणे आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर सांगतात. दि. बा. पाटील याचे २४ जून २०१३ रोजी निधन झाले आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला. रायगडमधील जनता त्यांचे काम विसरू शकत नाही. विमानतळाचे उद्घाटन झाले पण दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण होण्याची सारे वाट पाहत आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
