May 19, 2024
lucky-to-be-elected-to-the-lok-sabha-unopposed
Home » लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…
सत्ता संघर्ष

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

सन २०१९ मध्ये केंद्र शासित प्रदेश होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आजवर चार जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश व सिक्किममधून एकापेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध खासदार झाले आहेत. आजवर काँग्रेसचे सर्वाधिक २० जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात विविध राज्यांत मतदान चालू आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे, पण एकेठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे व दुसरीकडे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्यामुळे मध्य प्रदेशातील इंदूर व गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार लोकसभेवर बिनविरोध निवडून आले. आपले उमेदवारच ज्यांना संभाळता आले नाहीत, त्याला भाजप तरी काय करणार? अब की बार ४०० पार असा संकल्प भाजपने जाहीर केलाय. भाजपने आपल्या पक्षाचे ३७० खासदार निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून प्रमुख विरोधी पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घ्यावी ही पक्षाला मोठी नामुष्की आहे. इंदूरमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताच राज्यातील कॅबिनेट मंत्री व भाजपचे दिग्गज नेते कैलाश विजयवर्गीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये बाम यांचे स्वागत आहे, असे
ट्वीट केले.

काँग्रेसने मात्र बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर मोठा दबाव आणण्यात आला तसेच त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे बाम हे भाजपचे आमदार रमेश मेंडोला यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात गेले व तेथे त्यांनी रितसर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. सुरतमधील काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंदूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाम यांनी आपला अर्ज मागे घेतला, याला योगायोग म्हणावा काय?

सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर सुचक अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या करणाऱ्या तिघा जणांनी प्रतिज्ञापत्रे सादर करून त्या स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा छाननीच्या वेळी दावा केला. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. तसेच अन्य आठ उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग सुकर झाला.

इंदूरमधील घटनेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रितू पटवारी यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वीच बाम यांच्यावर आयपीसी ३०७ कलमान्वये (खुनाचा प्रयत्न) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आदल्या रात्री त्यांना धमक्या दिल्या गेल्या व दबाव आणण्यात आला. काँग्रेसचे नेते बाम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराला पोलिसांचा वेढा होता व घरावर फडकणारा काँग्रेसचा झेंडाही गायब होता. बाम व अन्य उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपचे शंकर लालवाणी हे लोकसभेवर बिनविरोध निवडून आले.

काँग्रेस उमेदवारांच्या माघारीने भाजपला लाभ झाला असला तरी असल्या लेच्यापेच्या लोकांना काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी दिलीच कशी ? निवडणुकीत ते निवडून आले असते तरी ते नंतर भाजपमध्ये गेले नसते कशावरून ?

गुजरात व मध्य प्रदेशातील काँग्रेस उमेदवार कोणत्या आमिषाला बळी पडले की घाबरून त्यांनी माघार घेतली हे आज ना उद्या उघड होईल. सुरत किंवा इंदूर येथे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले ही काही प्रथमच घडलेली घटना नाही. गेल्या सतरा लोकसभा निवडणुकांमध्ये २८ अशा घटना घडल्या आहेत की, निवडणुकीच्या मैदानातून अन्य उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे कोणाला तरी बिनविरोध निवडून येण्याचे भाग्य लाभले आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण, सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनाही लोकसभेवर बिनविरोध निवडून येण्याचे भाग्य लाभले होते.

१९५२ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा पाच उमेदवार खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले होते. १९६२ मध्ये दोन, तर १९७६ मध्ये पुन्हा पाच उमेदवार बिनविरोध खासदार म्हणून निवडून आले. चौथ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सतरा जणांना बिनविरोध खासदार होण्याचे भाग्य लाभले.

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील नाशिकमधून, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला श्रीनगरमधून, नागालँडचे माजी मुख्यमंत्री व चार राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केलेले व माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडामधून के. एल. राव यांना लोकसभेवर बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली. लोकसभेवर बिनविरोध निवडून आलेले अनेक दिग्गज आहेत.

आनंद चांद या अपक्ष उमेदवारालाही हे भाग्य प्राप्त झाले. १९५२ च्या निवडणुकीत आनंद चांद हे बिनविरोध खासदार म्हणून विजयी झाले. आनंद चांद हे विलासपूरच्या राजघराण्यातील ४४ वे शासक होते. तेव्हा विलासपूर लोकसभा मतदारसंघ हिमाचल प्रदेशच्या कार्यक्षेत्रात होता. काँग्रेस पक्षाने चांद यांच्याविरोधात उमेदवार उभा केला, पण आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पुरेसा निधी नाही, असे सांगत त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आनंद चांद यांच्या बिनविरोध निवडीला काँग्रेस पक्षाने न्यायालयात आव्हान दिले होते, पण जिल्हा न्यायालयान चांद यांची बिनविरोध निवड वैध ठरवली.

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री हरेकृष्ण महताब हे ओरिसातील अंगुल मतदारसंघातून मैदानात उतरले व बिनविरोध म्हणून निवडले गेले. ते त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्कल केसरी म्हणून ओळखले जायचे. अंगुल मतदारसंघात खरे तर प्रादेशिक पक्ष असलेल्या गणतंत्र परिषदेचा प्रभाव होता. परिषदेने त्यांचा उमेदवारही रिंगणात उतरवला होता. पण एवढ्या दिग्गज नेत्याच्या विरोधात निवडणूक लढवणे म्हणजे वादळाशी टक्कर देण्यासारखे होईल, असे लक्षात असल्याने गणतंत्र परिषदेने माघार घेतली.

१९६२ च्या निवडणुकीत गढवाल (आता उत्तराखंड)मधून काँग्रेसचे उमेदवार मानवेंद्र शाह यांची लोकसभेवर बिनविरोध निवड झाली. गढवाल राजघराण्याचे ते शेवटचे शासक होते. त्यांनीच १९४९ मध्ये गढवाल संस्थान भारतात विलिन करण्यासाठी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. ते या मतदारसंघातून तब्बल आठ वेळा विजयी झाले. १९७१ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर आर्यंलंडमध्ये त्यांनी भारताचे राजदूत म्हणून काम केले.

१९७७ मध्ये सिक्किम व अरुणाचल प्रदेशमधून दोन उमेदवार लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले. १९८५ मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत सिक्किममधून दिल कुमारी भंडारी यांची बिनविरोध निवड झाली. सिक्किममधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. १९८९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता. तेथील प्रादेशिक पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. तीन लोकसभा मतदारसंघांपैकी श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे मोहंमद शफी भट्ट हे बिनविरोध विजयी झाले, तर अन्य दोन मतदारसंघात पाच टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले.

समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून डिम्पल यादव यांना २०१२ मध्ये कन्नोज लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी म्हणून घोषित केले होते. त्याच वर्षी उत्तर प्रदेशात सपाचे सरकार स्थापन होण्याची संधी प्राप्त झाली म्हणून अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला व पोटनिवडणुकीत पक्षाने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल यांनी उमेदवार उभे केले नाहीत. भाजपा व काही अपक्षांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली. एका अपक्ष उमेदवाराने व संयुक्त समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. कन्नोज हा १९९८ पासून सपाचा गड राहिला आहे. आपल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव आणला गेला, असा आरोप भाजपने तेव्हा केला होता.

सन २०१९ मध्ये केंद्र शासित प्रदेश होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आजवर चार जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश व सिक्किममधून एकापेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध खासदार झाले आहेत. आजवर काँग्रेसचे सर्वाधिक २० जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

Related posts

महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण

संपत्ती अन् दया जेथे, त्याच्यातच भगवंताचे रुप

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती – श्रीराम पेंडसे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406