संस्कृतीत असलेला गोडवाच ज्यांना समजलेला नाही ते टिंगल-टवाळी करणारच. वात्सल्य या शब्दाचा अर्थ वासना असा लावणाऱ्यांना ग्रामीण संस्कृती कशी समजेल. कशी रुचेल. ग्रामीण तरुणांनी हा विचार करायला हवा. संस्कृती हा एक उच्च विचार आहे. तो विचार त्या चळवळीत रुजला आहे. हा विचार बदलू पाहणारेच बदलतील. इतके सामर्थ्य या ग्रामीण संस्कृतीत दडले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
अहो वासरूं देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।
मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ।।40।। ज्ञानेश्वरी अध्याय 11 वा
ओवीचा अर्थ – अहो, वासरूं पाहिलें की लागलीच प्रेमानें गाय खडबडून उभी राहतें, मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय ?
हुर…हुर..हौशा..हे शब्द ऐकताच बैल उठून उभा राहतो. मालकाचा मान तो राखतो. इतके प्रेम, माया त्याच्यामध्ये सामावलेली असते. इतका तो इमानदार असतो. शेळी, मेंढी असो किंवा गाई, म्हशी, बैल ही जनावरे असोत. त्यांना हे प्रेमाचे शब्द लगेच समजतात. शेतात राबणारे हे शेतकऱ्याचे सोबती, उत्पन्न वाढविणारे हे सहकारी शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार असतात. यासाठीच या जनावरांची पूजा केली जाते. पोळा हा सण यासाठीच असतो.
धर्म हा स्नेह वाढविण्यासाठी आहे. धर्माचे नियम हे स्नेह उत्पन्न करण्यासाठी आहेत. हिंदुधर्मामध्ये या मुक्या जनावरांची पूजा केली जाते. त्यांच्या सहकार्याची जाणीव व्हावी हा यामागचा उद्देश आहे. यामुळेच खेड्याकडील लोकांमध्ये प्रेम भरलेले असते. आपुलकी असते. हे प्रेम राहावे, वाढावे मनामध्ये सात्त्विक भाव जागृत व्हावा हाच उद्देश या सणांमध्ये आहे. पोळ्याच्या सणाला बैलांना सजविले जाते. त्या दिवशी त्यांना कामास जुंपले जात नाही. गोड पोळीचा नैवेद्य भरविला जातो. सुवासिनी बैलांची पूजा करतात. दीपावलीच्या आदल्यादिवशी वसुबारसदिवशीही या जनावरांची पूजा केली जाते.
वर्षभर राबून घरात धनधान्य आणण्यात शेतकऱ्यांचे सहकारी असणारे हे सोबती हे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पूजनीय आहेत. ग्रामीण संस्कृतीत हे संस्कार पाहायला मिळतात. काळानुसार यामध्ये आता बदल झाला आहे. विचारसरणी बदलत चालली आहे. नव्या विचारांमध्ये हे वात्सल्य, प्रेम दिसून येत नाही. यांत्रिकीकरणामुळे ही माणसाचे मनही यंत्रच झाले आहे. राजकीय चढाओढीमुळे ग्रामीण वातावरण बिघडत चालले आहे. स्पर्धेच्या युगात जुन्या विचारांना गावंढळ म्हटले जाते. या विचारांची टिंगलही केली जात आहे. यासाठी या नव्या पिढीत जुने ग्रामीण संस्कार रुजविण्याची गरज आहे.
या संस्कृतीत असलेला गोडवाच ज्यांना समजलेला नाही ते टिंगल-टवाळी करणारच. वात्सल्य या शब्दाचा अर्थ वासना असा लावणाऱ्यांना ग्रामीण संस्कृती कशी समजेल. कशी रुचेल. ग्रामीण तरुणांनी हा विचार करायला हवा. संस्कृती हा एक उच्च विचार आहे. तो विचार त्या चळवळीत रुजला आहे. हा विचार बदलू पाहणारेच बदलतील. इतके सामर्थ्य या ग्रामीण संस्कृतीत दडले आहे. सर्वत्र प्रेमाचा वर्षाव व्हावा असा विचार आजही या संस्कृतीत जोपासला जातो.
शेतकऱ्यांच्या घरात आजही या प्रेमाचा महापूर पाहायला मिळतो. पाहुण्यांचे आदरातिथ्य हा त्यांचा स्थायीभाव आहे. वासरू पाहिल्यावर गायीलाही पान्हा फुटतो. तसे हे प्रेम ओसंडून वाहत आहे. या प्रेमात डुंबायला शिकावे. हे वात्सल्यच प्रगतीच्या वाटा दाखवते. झटपट श्रीमंतीची स्वप्ने दाखविणारे विचार हे प्रेम कधीही समजू शकणार नाहीत. कष्टाच्या भाकरीची गोडी कशी असते हे कष्टकरी झाल्याशिवाय कळत नाही. अध्यात्मात साधना केल्याशिवाय साधनेतील आनंद समजत नाही. गुरूप्रेम त्याशिवाय उमजत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.